परमबीर सिंग, पोलीस आयुक्त
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे ते बदलापूपर्यंतच्या सर्वच शहरांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना वाढू लागल्याने महिलांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान होते. गेल्या वर्षांत सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ात कार्यरत असलेल्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच त्यांचे मनपरिवर्तन करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली. परिणामी, या सर्वच शहरातील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे चित्र आहे. याशिवाय, शहरातील व्यावसायिकांना खंडणीसाठी धमक्या देणाऱ्या कुख्यात गुंड रवी पुजारी आणि सुरेश पुजारी टोळीच्या अनेक हस्तकांना जेरबंद केले आहे. कायदा सुव्यवस्था राखणे हे आमचे मुख्य काम असून ते आम्ही समर्थपणे करत आहोतच. तरीही ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच भिवंडी या शहरामधील वाहतूक कोंडी भेदण्याचे मोठे आव्हान आमच्यापुढे आहे. ही कोंडी कशी भेदता येऊ शकेल याचा विचार केला जात असून त्याच्या नियोजनाकरिता ठोस पावले उचलण्याचे लक्ष्य यंदाच्या वर्षांत आखण्यात येत आहे.
मुंबईला खेटूनच असल्यामुळे ठाणे शहर महत्त्वाचे मानले जात असून राज्यात मुंबईपाठोपाठ ठाणे पोलीस दलाकडे पाहिले जाते. परंतु मुंबईच्या तुलनेत ठाण्यात पुरेसे पोलीस बळ नाही. मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील लोकसंख्या आजच्या घडीला सुमारे सव्वा कोटींच्या घरात असून या शहराच्या सुरक्षेकरिता ४५ हजारांचे पोलीस बळ आहे. तर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील लोकसंख्या ८० ते ८५ लाखांच्या आसपास पोहचली असून या क्षेत्रात पाच महापालिका, दोन नगर पालिकांचा समावेश आहे. त्यांच्या सुरक्षेकरिता सुमारे नऊ हजारांचा पोलीस फौजफाटा आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पोलीस बळ वाढवायचे असेल तर शासनाला आर्थिक मर्यादेची अडचण आहे. टप्प्याटप्प्याने या संख्येत वाढ होऊ शकते, पण एकाच वेळी इतके मनुष्यबळ वाढविणे शक्य होणार नाही. तसेच या कर्मचाऱ्यांचा पगार, विविध भत्ते, निवृत्तीची देयके या सर्वाचा विचार करावा लागतो. या सर्वाचा खर्च खूपच असल्यामुळे आíथकदृष्टय़ा परवडणारा नसतो. यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरांच्या सुरक्षेसाठी टेक्नॉलाजीचा वापर करण्यावर अधिक भर देण्याचे सुचविले आहे. त्यानुसार, शहरातील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी नवनवीन टेक्नॉलाजीचा वापर करण्यात येत आहे. मुंबई शहरात सहा हजार कॅमेरे बसविण्यात येणार असून या शहराच्या तुलनेत ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी या तिन्ही शहरांना जवळपास तीन हजार सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची गरज आहे. असे असले तरी, सद्य:स्थितीत या तिन्ही शहरांना एक हजार कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन विभाग तसेच लोकप्रतिनिधींच्या निधी मिळत असून त्यातून या शहरांमध्ये सीसी कॅमेऱ्यांचे जाळे विणण्याचे काम सुरू आहे. या कॅमेऱ्यांमुळे शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवणे तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे शक्य होऊ शकेल. ठाणे तसेच कल्याण रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच कल्याण हे जंक्शन असल्यामुळे तिथे परराज्यातील एक्स्प्रेस थांबतात. यामुळे या प्रवाशांचा आकडाही मोठा आहे. या पाश्र्वभूमीवर या भागातील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बल यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला जातो. याशिवाय, या स्थानक परिसरासह शहरातील अन्य गर्दीच्या ठिकाणी मॉक ड्रिल करून तेथील सुरक्षेचा आढावा घेतला जातो. गेल्या काही वर्षांत शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली असून ती सोडविण्यासाठी वाहतूक विभागाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. मुंबई-नाशिक, मुंबई-अहमदाबाद आणि अन्य महामार्ग आयुक्तालय क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे तेथून वाहनांची ये-जा मोठय़ा प्रमाणात सुरू असते. तसेच शहरांमधील वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. याशिवाय, उरणच्या जेएनपीटी बंदरातून निघणारी वाहने दररोज ठाणे मार्गे ये-जा करतात. या वाहनांचा दररोज आकडा २० हजारांच्या आसपास आहे. यामुळे शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली असून ही समस्या फारच आव्हानात्मक आहे. यामुळे ती कशा पद्धतीने सोडविता येऊ शकेल, यासाठी महापालिकांशी समन्वय साधण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2016 रोजी प्रकाशित
वाहतूक कोंडी भेदण्याचे आव्हान मोठे
शहरांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना वाढू लागल्याने महिलांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान होते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 15-01-2016 at 02:28 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The major challenge to solve traffic congestion problem