महापौरांचा आग्रह
ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर वर्षांनुवर्षे थकविणाऱ्या थकबाकीदारांच्या मुसक्या आवळण्याऐवजी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही दंडाची रक्कम आणि प्रशासकीय आकारावर सवलत द्यावी, अशा स्वरूपाचा आग्रह महापौर संजय मोरे यांनी धरला आहे. गेल्या वर्षी या सवलत योजनेमुळे थकबाकीदारांनी मोठय़ा प्रमाणावर कराचा भरणा केला आणि त्यामुळे तिजोरीत काही कोटी रुपयांची भर पडली. त्यामुळे यंदाही ही सवलत योजना राबविल्यास थकीत रकमेची वसुली होईल, असा महापौरांचा दावा आहे. या योजनेसंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले असून, आयुक्त संजीव जयस्वाल या आदेशाची कितपत अंमलबजावणी करतात याविषयी उत्सुकता आहे.
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तीन शहरांमधून आजही कोटय़वधी रुपयांचा मालमत्ता कर थकविण्यात आला आहे. कर थकविणाऱ्यांविरोधात गेल्या अनेक वर्षांत प्रभावीपणे कारवाई झालेली नाही. कारवाई होत नसल्याने कर का भरावा, अशी मुजोर मानसिकता गेल्या काही वर्षांत वाढीस लागली आहे. ठाणे महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू झालेले संजीव जयस्वाल यांनी गेल्या काही महिन्यांपासून उत्पन्न वाढीसाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजनांचा एक भाग म्हणून मालमत्ता कर थकविणाऱ्या थकबाकीदारांना प्रशासकीय आकार माफ करण्याचा निर्णय गेल्या आर्थिक वर्षांत घेण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ नसल्यामुळे महापालिकेची आर्थिक घडी बिघडल्याचे चित्र सातत्याने पुढे येत आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने मालमत्ता तसेच विविध करांची वसुली करण्यावर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. तसेच मागील काही वर्षांपासून अनेक मालमत्ताधारकांनी कर थकविला असून, त्याची वसुली करण्यासाठी महापालिकेने करात सवलत देऊ केली होती. गेल्यावर्षी संपूर्ण शहरात ही योजना राबविण्यात आली. या योजनेस जवळपास १७,८२९ इतक्या मालमत्ताधारकांनी प्रतिसाद दिल्यामुळे थकीत कराची मोठी वसुली झाली होती.
सवलतींची लयलूट
या योजनेमुळे थकीत कराची चांगली वसुली होत असली, तरी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रशासकीय आकारात सूट मिळावी याकडे थकबाकीदारांची नजर आहे. गेल्या वर्षी थकीत मालमत्ता करासह यंदाच्या आर्थिक वर्षांची रक्कम जानेवारीअखेपर्यंत भरणाऱ्या नागरिकांच्या करावरील प्रशासकीय आकार शंभर टक्के माफ करण्यात आला होता. त्याच धर्तीवर ही योजना राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.