पालघर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज निवडणूक अधिकाऱ्यांकडे तीन उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. त्यात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अमित घोडा, माकपचे उमेदवार चंद्रकांत वरठा तर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार मनीषा निमकर यांचा समावेश आहे.
शिवसेना, भाजप, आरपीआय युतीचे उमेदवार अमित घोडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, बांधकाम आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तर खासदार अनिल देसाई तसेच भाजपचे आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णू सावरा, खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे याशिवाय शिवसेनेचे उपनेते अनंत तरे, विनोद घोसळकर असे नेते कार्यकर्त्यांसह तहसीलदार कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यांनी दाखल केलेल्या निवडणूक अर्जात अनेक त्रुटी असल्याने त्यात सुधारणा करण्यासाठी बराच वेळ झाला त्यामुळे मंत्र्यांना दीड तास ताटकळत बसावे लागले.
अमित घोडा यांचे शक्तिप्रदर्शन
शिवसेना भाजप आरपीआय युतीचे उमेदवार अमित घोडा यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करताना उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी अनेक नेते उपस्थित होते.