ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या असून पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या कोरम मॉलमधील तळघरातील बेकायदा बांधकामांना सशुल्क करआकारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मॉलमधील तळघरांमध्ये तसेच वाहनतळांच्या जागेत मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकाम झाल्याच्या तक्रारी यापूर्वी पुढे आल्या होत्या. मालमत्ता कर विभागाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार कोरम मॉलमधील तळघरात बेकायदेशीर कार वॉिशग केंद्र उभारले गेल्याची माहिती पुढे आली असून याच मॉलमधील पॅसेजमधील किओस्कचे बांधकामही बेकायदा असल्याचे आढळून आले आहे.
ठाणे शहरात उभारण्यात आलेल्या मॉल्समध्ये मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकाम झाल्याच्या तक्रारी यापूर्वी स्थायी समिती सभेत करण्यात आल्या होत्या. कोरम मॉलमधील तळघरात तसेच वाहनतळांच्या जागेत व्यावसायिक दुकाने थाटल्याचा आरोप करत सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली होती. या बेकायदा बांधकामांना सवलतीच्या दरात कराची आकारणी होत असल्याने महापालिकेला कोटय़वधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत असल्याचा आरोपही या वेळी सर्वपक्षीय सदस्यांनी केला होता.
त्यानुसार मालमत्ता कर विभागाने सर्वेक्षण केले असता, कोरम मॉलमधील तळघरात बेकायदा पद्धतीने कार धुलाई केंद्र सुरू असल्याचे उघड झाले. तळघरातील ४२०० चौरस फूट जागेत बेकायदा कार्यालये आणि १२२६ चौरस फूट जागेत हे कार धुलाई केंद्र चालवण्यात येत आहे. या बांधकामाची नोंद बेकायदा अशी करून त्यास वाणिज्य दराने आकारणी सुरू करण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या रकमेवर १८ टक्के इतका दंडही आकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. मॉलमधील मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या किओस्कच्या उभारणीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून जवळपास २२ किओस्कची नोंद बेकायदा बांधकाम अशी करण्यात आली आहे. या बांधकामांना शहरविकास विभागाने परवानगी दिली आहे का, अशी विचारणा मालमत्ता कर विभागाने मध्यंतरी केली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही शहर विकास विभागाकडून उत्तर मिळत नसल्याचा खुलासा मालमत्ता कर विभागाने यासंबंधी सादर केलेल्या अहवालात केला आहे. या बांधकामाची माहिती देण्यास शहर विकास विभागाकडून होणाऱ्या टाळाटाळीमुळे यासंबंधीचा संभ्रम वाढला आहे. मॉलचे जनसंपर्क अधिकारी एम.पी. जोशी यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांचा मोबाइल बंद असल्याचे उत्तर मिळत होते.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2015 रोजी प्रकाशित
कोरम मॉलच्या तळघरातील बनवाबनवी उघड
ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने उत्पन्नवाढीसाठी प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या असून पूर्व द्रुतगती

First published on: 18-02-2015 at 11:51 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc imposed tax on underground illegal constructions of quorum mall