सुटी लागली की पुस्तकही नाही आणि शाळाही नाही, अशा मनाजोगत्या मोसमात मुले एवढी हरवून जातात की, खेळ खेळून दिवस पुरा पडत नाही. बाबांकडे आईच्या माध्यमातून मग रोज नवा खेळ आणून देण्यासाठी हट्ट सुरू होतो. पण मुलांना दररोज नवीन खेळणी आणून देणे शक्य नसल्याने मुलांचा हिरमोड होतो. मुलांचा हट्ट पुरवायचा की खिशाला कात्री लावायची, अशा विवंचनेत असणाऱ्या डोंबिवलीतील पालकांची सोय खेळणीघराने (टॉय लायब्ररी) केली आहे. दीड वर्षांपासून आठ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी नाना प्रकारच्या खेळण्यांचे भांडार असलेल्या पांडुरंगवाडीतील ‘चाणक्य टॉय लायब्ररी’त जाताच खरोखर एखाद्या ‘टॉय टाऊन’मध्ये गेल्याचे जाणवते.
पेशाने अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या हर्षल वगळ यांनी जानेवारी २०१३ मध्ये चाणक्य टॉय लायब्ररी सुरू केली. या लायब्ररीत केवळ पुस्तके मिळत नाहीत तर वेगवेगळ्या प्रकारची खेळणी, गाडय़ा, पझल गेम आणि सीडीही मिळतात. हवी तेवढी खेळणी, ती घरी नेण्यास असलेली मूभा आणि मुलांसोबत समरस होऊन खेळणारे कर्मचारी या साऱ्यामुळे आजघडीला या ‘टॉय लायब्ररी’त १८० चिमुरडे सभासद जमले असून यात ३० विशेष मुलांचाही यात समावेश आहे.   
‘कार्टून्सच्या सीडी नाहीत. टी.व्ही., संगणक, मोबाइल यामध्ये मुलांना न अडकवता त्यांना खेळांच्या माध्यमातून चालना मिळेल, असे खेळ देण्याकडे कल आहे. त्यामुळे मुले पझल गेम किंवा काही कोडय़ांचे गेम घेऊन जातात,’ असे वगळ यांनी सांगितले.
शर्मिला वाळुंज, डोंबिवली

* लाकडी खेळणी, सॉफ्ट टॉइज, गाडय़ा, कोडय़ांवर आधारित खेळणी, सायकल, घसरगुंडी, चार्ट्स, फ्लॅश कार्ड्स
* सभासदांना दर आठ दिवस आणि १५ दिवसांच्या मुदतीवर खेळणी, पुस्तके, सीडी घरी नेण्यास परवानगी