शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी दर्शक यंत्रणा बसवण्याचा निर्णय..
डोंबिवलीतील टिळक चौक ते घरडा सर्कल उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव मंजूर..
कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर भुयारी मार्ग काढता येईल का यावर चर्चा..
शहराबाहेरून जाणारा १९ किलोमीटर लांबीचा वळण रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव..
कल्याणमधील गोविंदवाडी येथे चारशे कोटी रुपये खर्चून बाह्य़ वळण रस्ता..
शहरातील वाहतूक सिंगापूर धर्तीची करण्यासाठी ७ हजार ९६१ कोटींचा एकात्मिक शहर वाहतूक आराखडा २०११ मध्ये मंजूर..
वाहतुकीशी संबंधित हे विषय गेल्या २० वर्षांत टप्प्याटप्प्याने पालिकेने मार्गी लावले असते तर कल्याण डोंबिवली शहरातील वाहतुकीचे आज जे तीन तेरा वाजले आहेत, ते कधीच घडले नसते. पालिका हद्दीत सुमारे ३३५ किमीचे रस्ते आहेत. गेल्या वीस वर्षांत रस्ते तेवढेच, वाहने मात्र अनेक पटींनी वाढली आहेत. आरटीओ कार्यालयात दररोज सुमारे १८० नागरिक प्रशिक्षणार्थी वाहन चालवण्याची परीक्षा देत आहेत. म्हणजे वर्षांला सुमारे दोन हजार नवीन वाहनांची भर शहरात पडत आहे. याशिवाय लाखभर वाहने दररोज शहरातील विविध रस्त्यांवरून धावत असतात. वाहने वाढली पण रस्ते आहेत तितकेच आणि तसेच..
गल्लीबोळातील दुखणे
कल्याण-डोंबिवलीत गेल्या तीस वर्षांपूर्वी धरठोक पद्धतीने इमारती बांधण्यात आल्या. या इमारतींना वाहनतळाची सोय नाही. ज्या ठिकाणी वाहनतळाची सोय होती, ती जागा विकासकाने त्याच वेळी चार भिंती टाकून विकून टाकली आहे. अशा इमारतींमधील रहिवाशांची सगळी वाहने त्यांच्या घराबाहेर रस्त्यावर रांगेत उभी असतात. मुख्य रस्त्यावर काही अडचण आली की अनेक वाहने या गल्लीबोळात घुसतात आणि वाहतूक कोंडी करतात. शहराच्या काही भागांत व्यापाऱ्यांची गोदामे आहेत. त्या ठिकाणी मालवाहू वाहने सतत फिरत असतात. कल्याणमधील झुंजारराव बाजार, डोंबिवलीत रामनगर, टिळकनगर, गोग्रासवाडी, मोठागाव, ठाकुर्ली, रामबाग, पारनाका अशा अनेक भागांत एखादे मोठे वाहन रस्त्यात बंद पडले की अख्खी बाजारपेठ आणि इतर रस्ते ठप्प होतात.
हमरस्त्याचा ‘गम’
मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी सकाळी आठ ते दुपारी अकरा वाजेपर्यंत, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत असते. नाशिक, मुंबईतून येणारी बहुतांशी वाहने भिवंडी वळण रस्त्याने कल्याणमध्ये येतात. शीळ फाटय़ाकडची वाहने याच रस्त्याने भिवंडी वळण रस्त्याकडे येतात. त्यामुळे दुर्गाडी चौक, लाल चौकी, सहजानंद चौक, शिवाजी, बैलबाजार चौक वाहतूक कोंडीने सतत गजबजलेले असतात. अवजड वाहनांना शहरात रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेश द्या, असे सर्वसाधारण सभेने दोन ते तीन वेळा ठराव करून ते वाहतूक विभागाला पाठवले आहेत. मात्र त्यावर पुढे काहीच झालेले नाही.
पालिकेकडून शहर वाहतूक नियोजनासाठी नवीन रस्ते, उड्डाणपूल, पर्यायी रस्ते तयार केले जात नाहीत. त्यामुळे शहरातून येणाऱ्या, जाणाऱ्या वाहनांना हात दाखवून नियोजन करणे एवढेच काम वाहतूक विभागाच्या हातात राहते. या वाहतुकीत रिक्षा, खासगी वाहने, शाळेच्या बस, परमिट संपलेले घुसखोर रिक्षाचालक यांचा भरणा असतो. घुसखोर रिक्षाचालकांचा बंदोबस्त आरटीओ, वाहतूक, पोलीस यंत्रणेने एकत्रित केला तरी बरीच सुसूत्रता येऊ शकते.
वाहतूक कोंडीची ठिकाणे
डोंबिवलीतील मानपाडा रस्ता, घरडा सर्कल ते फडके चौक, टिळक चौक, इंदिरा चौक, बाजी प्रभू चौक, फडके रस्ता, टंडन रस्ता, कोपर पूल रस्ता, पं. दीनदयाळ चौक, विष्णूनगर पोलीस, महात्मा फुले रस्ता चौक .
भगवान मंडलिक