दिवसभरात आठ तासानंतर वाहने उभी करण्याची जागा बदलणार; दोन आठवडय़ांत निर्णयाची अमलबजावणी
ठाणे शहरातील रहदारीचा व गजबजाटीचा परिसर असलेल्या नौपाडा भागात बेकायदा व बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी वाहने उभी करण्याच्या नियमांत मोठा बदल केला आहे. त्यानुसार दिवसभरात आठ तासांनंतर नौपाडय़ातील रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करण्याच्या बाजूमध्ये बदल होणार आहे. ठाण्याच्या बाह्यभागातून आपली वाहने घेऊन ठाणे स्थानकाकडे येणारे नौपाडय़ाच्या रस्त्यांवर वाहने उभी करतात. ही वाहने सकाळपासून रात्रीपर्यंत त्याच ठिकाणी उभी राहत असल्याने या ठिकाणी पार्किंगचा मोठा पेच निर्माण होतो. या पाश्र्वभूमीवर येत्या दोन आठवडय़ांत हा नवीन नियम अमलात आणण्यात येणार आहे.
ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीसाठी गोखले मार्ग महत्त्वाचा मानला जातो. तसेच शहरातील व्यावसायिक केंद्र म्हणून या मार्गाला ओळखले जाते. या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून वाहनांचा भार वाढल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या मार्गावर दुचाकी वाहनांसाठी सम-विषम अशी पार्किंची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली आहे. मात्र, व्यापारी तसेच ठाणे स्थानकातून दररोज कामानिमित्त प्रवास करणारे अनेक प्रवासी येथील पार्किंगमध्ये दिवसभर वाहने उभी करतात. त्यामुळे या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या अनेकांना वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने ते रस्त्यावर इतरत्र वाहने उभी करतात. या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली होती. ही बाब लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षीपासून येथील पार्किंग व्यवस्थेत मोठे बदल केले. त्यानुसार या ठिकाणी सकाळी ७ ते ३ या वेळेत रस्त्याच्या उजव्या बाजूला तर दुपारी ३ ते १२ या वेळेत रस्त्याच्या डाव्या बाजूला वाहने उभी करण्यात येतात. व्यापारी, स्थानिक रहिवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही पोलिसांवर झाले होते. मात्र, त्यानंतरही पोलिसांनी हा बदल कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
गोखले मार्गापाठोपाठ संपूर्ण नौपाडा भागात अशाच प्रकारचा पार्किंग बदल लागू करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी या वृत्तास दुजोरा दिला. नौपाडा परिसरातील विविध रस्त्यांवर दिवसभरात आठ तासानंतर पार्किंगचा बाजुबदल करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यामध्ये कोणत्या रस्त्यांवर नेमकी कुठे पार्किंगची व्यवस्था करायची, याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे येत्या दोन आठवडय़ांत या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. नौपाडय़ातील विविध रस्त्यावरील पार्किंगच्या जागेमध्ये अनेक जण दिवसभर वाहने उभी करत असल्यामुळे या ठिकाणी अन्य वाहनांना पार्किंगसाठी पुरेशी जागा मिळत नाही. दिवसभर पार्किंगची जागा अडविली जाऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
बदल असा?
नौपाडा भागातील राम मारुती रोड, घंटाळी रोड तसेच इतर अंतर्गत प्रमुख रस्त्याच्या उजव्या बाजूला सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत तर डाव्या बाजूला दुपारी ३ ते १२ या वेळेत वाहने उभी करण्याची अधिसूचना वाहतूक पोलिसांकडून लवकरच काढली जाणार आहे. दुपारी ३ वाजल्यानंतर या मार्गावर वाहतूक पोलीस कारवाई करण्यास सुरुवात असून हा निर्णय नोकरदार वर्गासाठी मात्र गैरसोयीचा ठरण्याची शक्यता आहे.