इंग्रजी माध्यमापासून अद्याप दोन हात दूर; विविध उपक्रमांना सुरुवात

अंबरनाथ व बदलापूरमध्ये दोन गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शाळा असून दोन्ही शाळांमध्ये अद्याप इंग्रजी माध्यमाने प्रवेश केलेला नाही. योगी श्री अरविंद गुरुकुल शाळा, बदलापूर व पंचकोषाधारीत गुरुकुल शाळा, अंबरनाथ या शाळांमध्ये मराठी भाषेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी वाचन, व्यक्ती परिचय, मराठी कवी-लेखकांचा अभ्यास आदी उपक्रमांद्वारे मराठी भाषा संवर्धनाचे काम या शाळांकडून होत आहे. त्यामुळे शहरात इतर अनेक शाळांचे इंग्रजीकरण होत असले तरी, या शाळांच्या माध्यमातून मराठी संवर्धनाचा संदेश व कार्य नेटाने सुरू आहे.

अंबरनाथमधील या पंचकोषाधारित गुरुकुल शाळेतही इंग्रजी माध्यम नसून या शाळेत मुलांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य करण्यात येते. नेहमीच्या व्यवहारात मराठी भाषा कशी वापरता येईल याचे प्रशिक्षणही देण्यात येते. यासाठी बाहेरील वक्त्यांना मुलांशी बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. यात आत्तापर्यंत मंगेश पाडगावकर, शरद पोंक्षे, प्रवीण दवणे, भूषण करंदीकर आदींनी विद्यार्थ्यांशी येऊन संवाद साधला आहे. तसेच, या शाळेतील विशेष म्हणजे येथे वाचनाचे वेगळे तास असतात, ज्यात विद्यार्थ्यांकडून विविध पुस्तकांचे वाचन करून घेण्यात येते. तसेच, साभिनय वर्ग घेण्यात येत असून त्यात उच्चारांचे महत्त्व व बोलताना वापरावयाच्या व्याकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात येते. तरीही भविष्यात इंग्रजी शाळा सुरू झाल्यास त्यामागे अन्य भाषिक मुलांपर्यंत पोहचण्याचा हेतू समोर ठेवण्यात येईल. मात्र सध्या इंग्रजी माध्यम आमच्याकडे नाही.

धनंजय खटावकर, शाळा प्रमुख

बदलापुरातील या गुरुकुल शाळेत अद्यापही इंग्रजी माध्यम सुरू झाले नसून भविष्यातही सुरू करण्याचा विचार नसल्याचे शाळेकडून सांगण्यात येते. कारण, मराठी भाषा संवर्धनाचा हाच मुख्य उद्देश आहे. त्यासाठी शाळेत व्यक्ती परिचय उपक्रमांतर्गत अभिनेते, कवी, लेखक आदींना बोलावण्यात येऊन त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे मार्गदर्शन करण्यात येते. जुन्या लेखकांच्या साहित्याचा पूर्ण अभ्यास करून त्यांच्यावर सादरीकरण करण्यात येते. आजपर्यंत आचार्य अत्रे, वि. दा. सावरकर आदींच्या साहित्याचा अभ्यास करत त्यांच्या आयुष्यावर आधारित उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले आहे. तसेच लहान विद्यार्थ्यांच्या लेखनाला चालना मिळावी म्हणून येत्या ३० व ३१ जानेवारीला शाळेत बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात १ ली ते ९ वीचे विद्यार्थी सहभागी होणार आहे.

रोहिणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका