निम्मा महिना उलटूनही वेतन नाही; अनुदान नसल्याने वेतन रखडले

उल्हासनगर : मालमत्ता कराच्या वसुलीत सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे आर्थिक स्थिती दोलायमान झालेल्या उल्हासनगर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना मार्च महिना निम्मा उलटूनही अद्याप वेतन मिळालेले नाही. शासनाकडून येणाऱ्या अनुदानावर अवलंबून राहिल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा फटका पालिकेतील सुमारे २ हजार २०० कर्मचारी, १२०० निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसला आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

उल्हासनगर शहरात मालमत्ता कराचा भरणा करण्यास नागरिकांनी कायमच अनास्था दाखवली आहे. त्यामुळे पालिकेचा जितका अर्थसंकल्प नाही, त्यापेक्षा अधिकची रक्कम मालमत्ता करापोटी पालिकेला येणे बाकी आहे. पालिका प्रशासन मालमत्ता कराच्या वसुलीसाठी दरवर्षी अभय योजना लागू करते. त्यानंतरही पालिकेला करवसुलीचे उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही. यंदाच्या अभय योजनेत आतापर्यंत अवघे २२ कोटी रुपये वसूल करण्यात पालिकेला यश आले आहे. एकीकडे मालमत्ता कराची वसुली करण्यात येणारे अपयश आणि दुसरीकडे शासनाकडून मिळणारे अनुदान रखडल्याने मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना वेतन मिळू शकलेले नाही.

मार्च महिन्याच्या १७ तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले नव्हते. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. करोनाच्या संकटात यापूर्वीही पालिका प्रशासनाला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात तारेवरची कसरत करावी लागत होती. आजही हीच परिस्थिती कायम आहे. उल्हासनगर महापालिकेला वस्तू व सेवा कर याच्या माध्यमातून १६ कोटींचे अनुदान मिळणार होते. मात्र हे अनुदान अजूनही प्राप्त झालेले नसल्यामुळे वेतन रखडल्याची कबुली पालिकेच्या लेखा विभागातर्फे देण्यात आली. उल्हासनगर महापालिकेत सुमारे २२०० कर्मचारी असून १२०० निवृत्त कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतनापोटी पालिकेला प्रतिमहा १४ कोटी रुपये खर्च करावे लागतात, तर नुकतेच पालिकेने पाणीपट्टी पोटी एमआयडीसीला अडीच कोटी तर वीज बिलापोटी सव्वा दोन कोटी रुपयांची रक्कम अदा केली आहे. त्यामुळे पालिकेचे आर्थिक गणित कोलमडले असून कर्मचाऱ्यांना वेतनासाठी आणखी किती काळ वाट पहावी लागेल,

याबाबत अजूनही स्पष्टता मिळालेली नाही. एकीकडे दररोज वाढणारी महागाई, इंधन दरवाढ यांमुळे सर्वसामान्य हतबल झालेले असताना कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न पालिका कर्मचाऱ्यांपुढे उभा राहिला आहे. याबाबत पालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांना संपर्क केला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

सफाई कर्मचाऱ्यांना अभय

अभय योजनेतून वसूल करण्यात आलेल्या मालमत्ता करातून सफाई कर्मचाऱ्यांना येत्या एक ते दोन दिवसांत वेतन दिले जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. तर अनुदानाची रक्कमही याच आठवडय़ात प्राप्त होईल, अशी आशा लेखा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.