महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण हटवण्याचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी वर्तकनगर परिसरातील पाहणी दौऱ्यादरम्यान दिलेले असतानाही त्याकडे पालिका अधिकारी कानाडोळा करीत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. सर्वसामान्य ठाणेकरांसाठी आरक्षित असलेल्या मैदानावर न्यू होरायझन शाळेने अनधिकृतरित्या ताबा घेतला असून प्रशासनाच्या बोटचेपी धोरणामुळे हे मैदान अडवल्याचा आरोपही मनसेने केला आहे. हे मैदान उन्हाळी सुटीच्या काळात मुलांसाठी खुले करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी मैदान खुले केले नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

ठाणे महापालिकेच्या मंजूर विकास आराखडयानुसार वसंत लॉन्सजवळील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलशेजारी ६६०० चौमी (१.६१ एकर) क्षेत्रफळाचा भुखंड खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे. या मैदानाला शाळेने संरक्षित भिंत उभारून ते बंदिस्त केले आहे. या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या गांधीनगर, सुभाषनगर, माजिवडा गाव, साईनाथ नगर, चिरागनगर, हरदासनगर या मध्यमवर्गीय लोकवस्तीमधील मुलांना त्यांच्या हक्काचे खेळाचे मैदान खुले नसल्यामुळे त्यांना रस्त्यावरच खेळावे लागते. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर या जागेवर न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलने अतिक्रमण केलेले असून संबंधित मैदान सर्वसासामान्यांसाठी खुले करावे अथवा महापालिकेस सात दिवसात हस्तांतरित करावे, असे स्पष्ट आदेश पालिकेने दिले होते. तरीही या शाळा व्यवस्थापनाने हे मैदान खुले केलेले नाही. दोन दिवसांपूर्वी वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत केलेल्या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी पालिकेच्या विविध आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण हटवण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलला वेगळा न्याय कशासाठी असा प्रश्न संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसात हा भूखंड खुला केला नाहीतर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे उपायुक्त यांच्या दालनाबाहेर क्रिकेट खेळले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आयुक्तांनी एकीकडे आदेश दिले आहेत की आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण तात्काळ हटवा. परंतु दौरा करताना त्यांना मुद्दाम अशा ठिकाणी नेले जात नाही. न्यू होरायझन शाळा व्यवस्थापनाने सार्वजनिक वापराकरिता आरक्षित मैदानावर अनधिकृतरित्या ताबा घेतला आहे. मुलांना शालेय सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुलांना त्यांच्या हक्काचे मैदान मिळालेच पाहिजे – संदीप पाचंगे, ठाणे जिल्हाध्यक्ष, मनविसे