संबंधित कंपनीला ६४ लाखांच्या दंडाची नोटीस पालिका पाठविणार

ठाणे :  घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गेल्या काही वर्षांपासून मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू आहे. या कामाचा एक भाग म्हणून विद्युतवाहिनी टाकण्यासाठी संबंधित कंपनीने कासारवडवलीच्या दिशेने जाणारा सेवा रस्ता खणला आहे. ऐन पावसाळ्यात पालिकेच्या परवानगीविनाच खणलेला ८०० मीटपर्यंतचा सेवा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता संबंधित कंपनीला ६४ लाख रुपये दंडाची नोटीस पाठविण्याची तयारी सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरील भार कमी व्हावा तसेच ठाणेकरांचा भविष्यातील प्रवास सुखकर व्हावा या उद्देशातून ठाणे शहरात एमएमआरडीच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. ठाणे आणि घोडबंदर भागातून जाणाऱ्या महामार्गावरून मेट्रो मार्गिका तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामामुळे आधीच महामार्गावरील रस्ता अरुंद झाला असून यामुळे शहरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी ठाणे आणि घोडबंदर भागातून जाणाऱ्या दोन्ही महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांची काही वर्षांपूर्वी दुरुस्ती केली होती. हे सेवा रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्याने येथील कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी झाली होती. यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु ऐन पावसाळ्यात मेट्रोच्या विद्युतवाहिनीसाठी संबंधित कंपनीने पालिकेच्या परवानगीविना सेवा रस्ता खणला असून यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने येथे कोंडीची समस्या वाढल्याचे चित्र आहे.

कापुरबावडी येथून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्याखाली मेट्रोची विद्युतवाहिनी टाकावी लागणार असून त्यासाठी सूरज वॉटर पार्क भागातील २३०० मीटरचा सेवा रस्ता खोदण्यास परवानगी देण्याची मागणी संबंधित कंपनीने पालिकेकडे मे महिन्यात पत्राद्वारे केली होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमी वर पालिकेने रस्ता खोदण्यास परवानगी दिली नव्हती. तसेच या कामासाठी ५ कोटी १९ लाख रुपये जमा करावे लागतील, असे पालिकेने कंपनीला कळविले होते. पालिकेने परवानगी दिलेली नसतानाही संबंधित कंपनीने गेल्या आठवडय़ात सूरज वॉटर पार्क परिसरातील ८०० मीटरचा सेवा रस्ता खणला असून हे काम पालिकेने आता थांबविले आहे. या संदर्भात महापालिकेचे नगर अभियंता रवींद्र खडताळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.