२०० हेक्टर जमिनीवर पाच वर्षांत वनीकरणाचा महानगरपालिकेचा निर्धार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई-विरार महापालिकेने शहर परिसरात मानवनिर्मित जंगल विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. वनविभागाच्या सहकार्याने येत्या पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने शहर परिसरात वनीकरण करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी शिरगाव, गास कोपरी आणि नारिंगी येथे ५० हेक्टर जागेवर पहिल्या टप्प्यातील जंगल तयार करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील वनीकरण येत्या पावसाळ्यापासून सुरू केले जाणार आहे. यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या ठिकाणी पर्यटनस्थळ, जंगल पर्यटन, पक्षीअधिवास, हरीण अभयारण्य, औषधी वनस्पती उद्याने विकसित केली जाणार आहेत.

वसई-विरार शहरातील काँक्रीट जंगलाची व्याप्ती लक्षात घेता पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने पथदर्शी ठरणार आहे. वनविकास महामंडळामार्फत वनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी २०० हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली आहे. विरारमधील शिरगाव, गास, कोपरी नारिंगी, चंदनसार, कणेर, विरार, नालासोपारा येथील बिलालपाडा, धानीव, पेल्हार ही ठिकाणे यासाठी निश्चित करण्यात आली आहेत.

गेल्या वर्षी ५० हेक्टर जागेवर ५५ हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. हा परिसर मानवनिर्मित जंगल म्हणून अस्तित्वात येईल, असा दावा पालिकेने केला आहे. यंदा शिरगाव येथील  ६० हेक्टर क्षेत्रापैकी ५४ हेक्टर जागेवर वृक्षरोपांची लागवड करण्यात येणार आहे. या वनजमिनीवर प्रति हेक्टर ११११ प्रमाणे एकूण ९० हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात येईल. त्यानंतर कुंभापाडा ४९ हेक्टर, खंदरपाडा १३ हेक्टर, ५ हेक्टर अवनत वनक्षेत्रावर वनीकरण करण्यात येणार आहे.  त्यासाठी ३ कोटी ६२ लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. यासाठी पालिकेकडून वनविभागाशी करार करण्यात आला आहे. पाच वर्षांत ही वृक्ष लागवड केली जाईल. सात वर्षे वनविभागाच्या सहकार्याने वृक्षांची देखभाल केली जाणार आहे. वनविभागाच्या भूखंडाव्यतिरिक्त जे इतर वनविभागाचे भूखंड पालिकेच्या हद्दीत येत आहेत त्याच्या मंजूर विकास आराखडा (डीपी) नकाशानुसार वनीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात जी वृक्षरोपे जोम धरू शकतील अशाच रोपांची सुरुवातीला लागवड करण्यात येणार आहे. यात पाणी आणि देखभालीच्या खर्चात बचत होणार आहे.

९७ टक्के वृक्षरोपांनी तग धरला

शिरगाव, गास कोपरी आणि नारिंगी येथील ५० हेक्टर जमिनीवर वनीकरण करण्यात आल्याचे पालिकेने सांगितले. या जागेत ५५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यात बांबू, वड, आंबा, पिंपळ, काजू, विलायती चिंच, खैर, बेल, गुलमोहर, सीताफळ, सावर, रिठा, कडुलिंब, करंज. मोहा, जांभुळ, सप्तपर्णी, बकुळ, चिंच, कदंब, मोहगणी, आपटा, ऐन वृक्षरोपांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील वनीकरणासाठी दोन कोटी ९४ लाख रुपये खर्च आला होता. पहिल्या टप्प्यात लावलेल्या वृक्षांपैकी ९७ टक्के वृक्षरोपांनी तग धरल्याचा दावा पालिकेने केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar municipal corporation plan to develop forest on 200 hectares land in 5 year
First published on: 18-04-2018 at 00:55 IST