लशींचा साठाच उपलब्ध नसल्याने लसीकरणाबाबत पालिकेला चिंता

विरार : गुरुवार १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील वयोगटातील सर्वाना कोविड लस देण्याचा कार्यक्रम शासनाकडून राबविला जाणार आहे. यासाठी वसई-विरार महापालिकेने तयारीसुद्धा केली आहे. पण लशींचा साठाच शासनाकडून उपलब्ध झाला नसल्याने हा कार्यक्रम पालिका कसे राबविणार असा प्रश्न महापालिकेला पडला आहे.  सध्या पालिकेकडे केवळ गुरुवापर्यंतचा कोव्हिशिल्डचा साठा उपलब्ध आहे. तर कोव्हॅक्सिन पालिकेने आधी दिलेल्यांना दुसऱ्या फेरीसाठी जतन करून ठेवले आहे.

वसई-विरार शहरात मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या  झपाटय़ाने वाढत आहे. यात पालिकेच्या चिंता वाढत आहेत त्यात आता नव्याने तयार लस तुटवडय़ाच्या समस्येचा सामना पालिकेला करावा  लागत आहे पालिकेने मागील महिन्यातच शासनाकडे  एक लाख लस उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते. पण वारंवार स्मरणपत्र पाठवूनही शासनाने अजूनही लशींचा साठा पाठवला नाही. यामुळे गुरुवारपासून सुरू होणारा लसीकरणाचा कार्यक्रम लांबणीवर पडणार आहे. तूर्तास पालिकेने नालासोपारा तुळींज आणि विरार बोळींज येथे लसीकरण सुरू ठेवले आहे. तर खासगी रुग्णालयात कोव्हाक्सिन लस दिली जात आहे. पण त्याचा साठासुद्धा कमी आहे.

सध्या शहरात करोना रुग्णांची संख्या जलद गतीने वाढत आहे.  बुधवारी शहरात २१९ रुग्ण सापडले आहेत. तर १ हजार ९०६ रुग्ण उपचार घेत आहेत. पालिकेने शहरात ३०० हून अधिक प्रतिबंधक क्षेत्र तयार केले असून, हजार खाटांचे रुग्णालयसुद्धा सुरू केले आहे. सध्या पालिकेकडे सरकारी रुग्णालयामध्ये १३५० खाटा उपलब्ध आहेत तर १५० अतिदक्षता विभागांत खाटा आहेत. २० शासकीय  व्हेंटिलेटर  असून खाजगी रुग्लायात ५७  व्हेंटिलेटर राखीव ठेवले आहेत.  पालिकेने ११ खासगी रुग्णालयांना कोविड उपचार करण्यासाठी परवानगी  दिली असून त्यात ९१२ खाटा उपलब्ध आहेत. तर १८० अतिदक्षता विभागात खाटा आहेत.  तर पालिकेकडे ऑक्सिजनचे  १० क्रायो सिलेंडर  २०० जम्बो सिलेंडर आणि १०० लहान सिलेंडर उपलब्ध आहेत. पालिका दिवसाला दररोज ४०० जणांच्या चाचण्या करत आहे. पालिकेने अशी करोना लढय़ासाठी अशी तयारी केली असतानाही लसीच्या तुटवडय़ाने पालिकेच्या चिंता वाढत आहेत.

आतापर्यंत ५१,२३४ जणांचे लसीकरण

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५१ हजार २३४ लाभार्थ्यांना लस दिली आहे. यात ८ हजार ६९९ आरोग्य सेवकांना पहिला डोस तर ५ हजार ८३९ जणांना दुसरा डोस दिला आहे. पहिल्या फळीतील ७ हजार २४१ सेवकांना पहिला तर २ हजार १८ सेवकांना दुसरा डोस दिला आहे. तर ४५ ते ५९ वयोगटातील ४ हजार ८९८ नागरिकांना पहिला डोस तर केवळ १० नागरिकांना दुसरा डोस दिला आहे.  तर ६० वरील वयोगटातील २२ हजार ५२२ ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस दिला तर केवळ ७ नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे.

सध्या लशींचा साठा उपलब्ध नाही आहे, आम्ही शासनाकडे वारंवार मागणी करत आहोत. सध्या कोव्हॅस्क्सिनचे काही डोस आम्ही जतन करून ठेवेले आहेत. पण कोव्हिशिल्डचा साठा पूर्णत: संपला आहे. यामुळे लसीकरणाच्या कार्यक्रमावर परिणाम होऊ शकतो, पण पालिकेने दोन रुग्णालयात लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत – डॉ. सुरेखा वाळके, वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महानगर पालिका