ऋषिकेश मुळे-किशोर कोकणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्ते, इमारतींच्या कडेला बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाकडून सातत्याने होत असलेल्या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी वाहनचालकांनी आता नवी शक्कल लढवली आहे. अनधिकृत ठिकाणी वाहन उभे केल्यानंतर हे चालक स्वत:जवळील ‘जॅमर’ चाकांना लावून खुशाल आपल्या कामाला रवाना होतात. गाडीला ‘जॅमर’ लागल्यामुळे वाहतूक पोलिसांना त्या वाहनावर कारवाई झाल्याचे वाटते आणि ते कारवाई करत नाहीत. अशा प्रकारे ‘जॅमर’द्वारे पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक सुरू आहे. अशा खासगी जॅमरची ठाण्यातील गॅरेज दुकानांत सर्रास विक्री सुरू आहे.

ठाणे महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या शहरांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येने १० लाखांचा आकडा केव्हाच ओलांडला असून ही वाहने उभी करण्यासाठीचे पुरेसे नियोजन मात्र शहरात नाही.  शहरात रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहने धावत असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अंतर्गत मार्गासह मुख्य मार्गावर नियमावलीनुसार नो पार्किंगची ठिकाणे आणि वेळांचे नियोजन वाहतूक विभागाकडून ठरवण्यात आले आहे. या नो पार्किंगच्या ठिकाणी चारचाकी वाहने उभी केल्यास वाहतूक विभागाकडून जॅमर लावून कारवाई करण्यात येते. वाहतूक विभागाच्या या कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी वाहनचालक वाहनाला खासगी जॅमरच लावून वाहन नो पार्किंगमध्ये उभे करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लाल-पिवळ्या रंगाचे हे जॅमर वाहतूक शाखेकडे असलेल्या जॅमरप्रमाणे आहेत. या जॅमरची विक्रीही सुमारे दीड हजार रुपयांना होत आहे. वाहतूक विभागाकडून चारचाकी वाहनावर कारवाई दरम्यान वाहनाच्या चाकाला लावण्यात येणाऱ्या जॅमरप्रमाणेच हे हुबेहूब जॅमर बाजारात विकत मिळत आहेत. नो पार्किंगच्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या वाहनावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांचे कारवाई वाहन आल्यास अगोदरच नो पार्किंगमधील वाहनाला जॅमर

लावले असल्यामुळे वाहतूक पोलिसांची दिशाभूल होऊन कारवाई करण्यात येत नाही. खासगी जॅमर वापरणाऱ्या वाहनचालक नो पार्किंगमधून वाहन काढायचे असल्यास पुन्हा किल्लीच्याद्वारे जॅमर चाकामधून काढता येते.

खासगी ‘जॅमर’ची ठिकाणे

लोकमान्यनगर, सावरकरनगर तसेच वागळे इस्टेट परिसरातील अनेक भागांत रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांना अशा प्रकारे कारवाई करणाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी बनावट जॅमर लावण्यात येत आहेत. माजीवडा येथील फ्लॉवर व्हॅली तसेच वंदना सिनेमा गृहाजवळ असे जॅमर लावून सेवा रस्ते आणि मुख्य रस्त्याच्या कडेला वाहने उभी करत आहेत. यातील अनेक वाहने विक्रीसाठी ठेवण्यात आलेली असतात. वाहतूक पोलिसांकडून याकडे कानाडोळा करण्यात येत आहे.

ऑनलाइन विक्री

संकेतस्थळांवर वाहतूक विभागासारखेच हुबेहूब दिसणारे हे लाल आणि पिवळ्या रंगांचे जॅमर विक्रीसाठी असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑनलाइनसुद्धा हे जॅमर विकत घेण्यासाठी ग्राहक प्रतिसाद दर्शवत आहे. ८०० रुपयांपासून ते २ हजार रुपयांना ऑनलाइन संकेस्थळांवर जॅमरची विक्री होत आहे.

वाहतूक विभागाच्या जॅमरवर आम्ही विशिष्ट सांकेतिक क्रमांक नमूद केलेला आहे. तसेच जॅमर लावण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. मात्र वाहतूक विभागाच्या जॅमरशी साधम्र्य साधणारे जॅमर वाहनांच्या चाकाला लावण्याचे प्रकार  वाहनचालकांकडून होत असतील आणि त्याद्वारे कारवाई टाळण्यासाठी दिशाभूल केली जात असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

– अमित काळे, उपायुक्त, वाहतूक पोलीस

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicle has its own jammer to prevent action abn
First published on: 08-08-2019 at 00:28 IST