ठाणे स्थानकालगत अतिधोकादायक अवस्थेतील रेल्वेची कॉलनी रिकामी करण्यात आली असली तरी इमारती पाडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांच्या डोक्यावर धोक्याची टांगती तलवार असते. या परिसरातून थेट रेल्वे स्थानक गाठता येत असल्याने अनेक जण हा धोका पत्करत आहेत. हा मार्ग रेल्वे प्रशासनाला बंद करणे शक्य न झाल्याने येथून ये-जा करणाऱ्यांच्या हे जिवावर बेतण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वेच्या या जागेत अनधिकृतरीत्या पार्किंग सुरू असूनही रेल्वे पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्याने पार्किंगमाफियांचा सुळसुळाट येथे सुरू आहे.

ठाणे स्थानकाला लागून असलेली ही अतिधोकादायक इमारत काही वर्षांपूर्वीच रेल्वे प्रशासनाने रिकामी केली होती. तसेच येथून ये-जा करण्यासाठी मनाईही करण्यात आली होती. मात्र, रेल्वेने केलेल्या दुर्लक्षामुळे अवघ्या काही दिवसांतच हा मार्ग पुन्हा सुरू झाला. ठाण्यातील नौपाडा परिसरात कल्याण, डोंबिवली, बदलापूर या ठिकाणाहून मोठय़ा प्रमाणात कामगारवर्ग येतो. तसेच येथून महाविद्यालयीन तरुण-तरुणीही मोठय़ा प्रमाणात ये-जा करतात. वेळ वाचावा, तसेच मुख्य रस्त्यावरील गर्दी टाळावी म्हणून या धोकादायक मार्गाचा वापर केला जातो. त्याचबरोबर रेल्वेच्या या जागेत काही व्यक्तींनी दुचाकी पार्किंगचा गोरखधंदा सुरू केला आहे. ठाणे स्थानकात वाहनतळ सुरू झाले असले तरी अवघे १० रुपये वाचविण्यासाठी अनेक जण येथे वाहने पार्क करतात. या कॉलनीपासून हाकेच्या अंतरावर रेल्वे पोलिसांचे कार्यालय आहे. मात्र, या रस्त्यावरील वर्दळ रोखण्यात आणि पार्किंग हटविण्यात त्यांना अपयश आले आहे. नागरिक स्वत:चा जीव मुठीत घालून येथून आजही ये-जा करीत असल्याने रोकता येणे शक्य होत नाही.

हा मार्ग धोकादायक नक्कीच आहे. पण या मार्गावरून कार्यालय लवकर गाठता येते. तसेच कामावरून सुटल्यावर रेल्वे स्थानकही गाठता येते. त्यामुळे आम्ही येथून ये-जा करतो. रेल्वेने जर या मार्गावर रहदारी करण्यास बंदी घातली आणि बंदी घालण्याचे कारण सूचना फलकावर लिहून दिले तर नागरिक नक्कीच येथून ये-जा करणार नाहीत.-

नरेश जाधव

येथून रेल्वे स्थानक गाठणे सहज शक्य होते. त्यामुळे नागरिक येथून ये-जा करतात. तसेच अन्य चांगला पर्यायी मार्ग नसल्याने इथून ये-जा करतो.

सरिता त्रिभुवन