खाद्याच्या तुटवडय़ामुळे गिधाडे घटली; रामाशीष जोशी यांचे निरीक्षण
स्वच्छतेचा दूत अशी ओळख असलेल्या गिधाडांचे मुख्य खाद्य मेलेली जनावरे. गावाबाहेर टाकण्यात आलेल्या मेलेल्या प्राण्यांच्या मांसावर गुजराण करणाऱ्या या पक्ष्यांच्या खाद्यावर स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गदा आली. ग्रामस्वच्छता अभियानासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी मेलेली जनावरे उघडय़ावर टाकण्याचे बंद केले. त्यामुळे खाद्याचा तुटवडा निर्माण होऊन कोकण किनारपट्टीच्या परिसरातील गिधाडांची संख्या कमालीची घटली आहे. कोकण किनारपट्टीवरील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांचा विचार करता केवळ ६ ठिकाणी गिधाडांची घरटी आढळून येत असून केवळ २ प्रकारच्या गिधाडांचा वावर या भागामध्ये असल्याचे निरीक्षण सह्य़ाद्री निसर्ग मित्र संस्थेचे कार्यकर्ते रामाशीष जोशी यांनी ठाण्यात व्यक्त केले.
ठाण्यातील फर्न संस्थेच्या वतीने टाऊन हॉलच्या कट्टय़ावर पर्यावरणविषयक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी या व्याख्यानमालेचे तिसरे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘ठेवू दूरदृष्टी रक्षू निसर्गसृष्टी’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या चिपळूणच्या ‘सह्य़ाद्री निसर्ग मित्र’ संस्थेचे कार्यकर्ते रामाशीष जोशी यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. समुद्री कासव संवर्धन, पक्ष्यांचे संवर्धन आणि पर्यावरणीय घटकांविषयी अभ्यास करणाऱ्या या संस्थेचे १९९२ पासून भाऊ काटदरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कार्याची ओळख जोशी यांनी करून दिली.
गिधाडे बचाव मोहीम
सह्य़ाद्री निसर्ग मित्र संस्थेने २००३ पासून कोकणात गिधाडे वाचवण्यासाठीच्या मोहिमा सुरू केल्या आहेत. कोकणकिनारपट्टीवरील परिसराचा अभ्यास करत असताना येथील ६ ठिकाणी गिधाडांच्या प्रजाती आढळून आल्या. गिधाडांच्या एकूण ९ प्रजातींपैकी या परिसरात पांढऱ्या पाठीचा आणि लांब चोचीचा अशा दोन गिधाडांचे प्रकार आढळून येत असल्याचे त्यांनी सांगितले. गावोगाव सुरू झालेल्या स्वच्छता आभियानामुळे उघडय़ावर गुरे टाकण्याचा प्रकार बंद झाला आणि गिधाडांचे खाद्य बंद झाले. खाद्याच्या कमतरतेमुळे गिधाडांनी विणीच्या हंगामामध्ये अंडी घालणे बंद केल्याचे निष्कर्ष या संस्थेच्या अभ्यासातून पुढे आले. त्यामुळे या गिधाडांना खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम खाद्यपुरवठा केंद्र सुरू करून त्या माध्यमातून गिधाडांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न संस्थेने सुरू केला आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी प्रयत्न
श्रीवर्धन भागात गिधाडे आढळून येत असून नारळाच्या झाडावर ते घरटी बांधत असतात. तेथील शेतकऱ्यांनी त्यांना हुसकावून लावू नये यासाठी संस्थेच्या वतीने त्या शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसानभरपाई देण्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात आले. याबरोबरच कासव महोत्सवाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेला पर्यटन व्यवसाय, समुद्री पाकोळ्या, समुद्री गरूड आणि अन्य प्राण्यांच्या संशोधनाची माहिती यावेळी जोशी यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डायक्लोफिनॅक’चे आव्हान..
डायक्लोफिनॅक हे वेदनाशामक औषध गुरांना दिल्यानंतर त्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास व त्या प्राण्याच्या मांसाचे खाद्य ७२ तासांत गिधाडांनी खाल्ल्यास ती मरतात. त्यामुळे गुरांना डायक्लोफिनॅक हे औषध न देण्यासाठी जनजागृती या मंडळींनी सुरू केली आहे. सरकारने या औषधावर बंदी घातली असली तरी त्याचा वापर होत असून लोकांना सांगून ते टाळण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. गुरांचा बाजार भरत असलेल्या परिसरामध्ये ही मंडळी जनजागृती करून हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे जोशी यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vultures number decline due to food shortage
First published on: 20-11-2015 at 01:53 IST