अंबरनाथ येथे सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे पाण्याच्या भूमिगत वाहिन्या फुटण्याचे प्रमाण वाढू लागले असून यामुळे शहराच्या वेगवेगळ्या परिसरात पाणीपुरवठा वारंवार खंडित होऊ लागला आहे. अंबरनाथ पूर्व भागातील बी-केबिन परिसरात भुयारी गटाराचे काम सुरू असताना अशाच प्रकारे जलवाहिनी फुटीची घटना घडली. त्यामुळे पूर्व भागातील विविध परिसरातील नागरिकांना सलग दोन दिवस पाण्यापासून वंचित रहावे लागले. अंबरनाथ शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद ठेवला जातो. जलवाहिनी फुटीच्या घटनांमुळे सलग दोन किंवा तीन दिवस अनेक भागांमधील पाणीपुरवठा खंडित होऊ लागल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे.
बी-केबिन परिसरात भुयारी गटाराचे काम सुरू असताना येथील १४ इंचांची जलवाहिनी जेसीबी यंत्रामुळे फुटली. अंबरनाथ शहरातील पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केला जातो. भुयारी गटार योजनेची कामे नगरपालिकेमार्फत केली जातात. प्राधिकरण आणि नगरपालिकेत पुरेसा समन्वय नसल्यामुळे खोदकामे करताना या वाहिन्या फुटू लागल्या आहेत. खोदकाम करताना जीवन प्राधिकरणाकडून भूमिगत जलवाहिन्यांचे सविस्तर आराखडे मिळवण्याची आवश्यकता यापूर्वीही व्यक्त करण्यात आली आहे. प्रत्यक्षात समन्वयातील अभावामुळे तसे होत नसल्याचे चित्र पुढे येत आहे. बी-केबिन परिसरातील जलवाहिनी फुटल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांना रात्री १२ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम करावे लागले. त्यामुळे बुधवारपासून कानसई, शिवगंगा नगर, शिवमंदिर परिसर, खेर सेक्शन आणि बी-केबिन भागाला ५० टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागले. शुक्रवारी सकाळी काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या.
भुयारी गटार योजनेचा फटका
शहरातील भुयारी गटार योजनेची कामे अत्यंत मंदगतीने सुरू असून या कामांमुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. वाहिन्यांच्या या फुटीमुळे कचरा व माती गेल्याने पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रकार यापूर्वी घडले असून या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारीदेखील येऊ लागल्या आहेत. त्यामुळे पाण्याच्या गळतीत वाढ झाल्याची बाबदेखील समोर आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या एका अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रस्ते खोदकाम करताना पाणी पाइपलाइन तुटल्यास ती दुरुस्त करण्याची जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराची असून, ठेकेदाराने वेळीच हे काम करणे अपेक्षित आहे. परंतु या कामाकडे ठेकेदार व पालिका दुर्लक्ष करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water crisis due to underground drainage in ambernath
First published on: 13-06-2015 at 12:52 IST