सप्टेंबर महिना उजाडूनही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्य़ांतील धरणे अद्याप पूर्ण भरलेली नाहीत. त्यामुळे पाणीसाठय़ाचे नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिकेने २० टक्के पाणी कपात लागू केली असून त्यापाठोपाठ आता ठाणे महापालिका क्षेत्रातही पाणी कपातीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांत यापूर्वीच १४ टक्केपाणी कपात असतानाच आता त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या कपातीसंबंधी महापालिका स्तरावर विचार सुरू असून त्यासाठी पाणीसाठय़ाचा आढावा घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. त्यानंतर पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणेकरांवरही पाणी कपातीची टांगती तलवार आहे.ठाणे महापालिकेचे पाण्याचे चार मुख्य स्रोत असून त्यात एमआयडीसी, महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना, मुंबई महापालिका, स्टेम प्राधिकरण आदीचा समावेश आहे. हे चारही स्रोत जिल्ह्य़ातील धरणांमधून शहराला पाणीपुरवठा करतात. या चारही स्रोतांद्वारे ठाणे शहराला प्रतिदिन ४६० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. एका व्यक्तीला प्रतिदिन सरासरी २५१ लिटर्स इतका पाणीपुरवठा होतो. उल्हास नदीतील पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांत यापूर्वीच १४ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र महापालिकेच्या या कपातीसाठी नियोजन केल्यामुळे प्रत्येक विभागाचा पाणीपुरवठा १५ दिवसांतून एकदा बंद ठेवण्यात येतो. जुलै महिन्यानंतर ही कपात बंद होणे अपेक्षित होते. मात्र अपेक्षित पाऊस झाला नसल्याने धरणांच्या पाणीपातळीत पुरेशी वाढ होऊ शकलेली नव्हती. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही शहरामध्ये ही कपात कायम ठेवण्यात आली होती. असे असतानाच सप्टेंबर महिना उजाडला तरीही धरणे अद्याप पूर्ण भरलेली नाहीत. त्यामुळे पुढील काही महिन्यांच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी या कपातीमध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नुकतीच पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीमध्ये पाणी कपातीत वाढ करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली असून यासंबंधीचा प्रस्ताव महापालिका स्तरावर विचारधीन आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सर्वच स्रोतांकडून पाणीसाठय़ांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्याआधारे शहरातील पाणी कपातीमध्ये किती वाढ करायची, याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबईच्या कपातीची झळ ठाण्याला..
ठाणे जिल्ह्यातील धरणांमधून मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा होत असून या वाहिन्या ठाणे शहरातून जातात. या वाहिन्यांमधून ठाणे शहराला सुमारे ६० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबई महापालिकेने २० टक्के पाणी कपात लागू केल्याने त्याचा परिणाम ठाणे शहरातील पाणीपुरवठय़ावर होऊ लागला आहे. मुंबई महापालिकेमार्फत ठाणे शहराला होणाऱ्या अशुद्ध पाणीपुरवठय़ामध्ये ही कपात लागू करण्यात आली आहे. शहरातील काजूवाडी, हाजुरी, अंबिकानगर, नामदेववाडी आदी भागांत कपातीची झळ बसू लागली आहे, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cut schedule increased
First published on: 01-09-2015 at 05:36 IST