मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी २४०० मीमी व्यासाची जलवाहिनी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील किसननगर भागात शनिवारी दुपारी फुटल्याने परिसरातील आसपासच्या घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान झाल्याची घटना घडली. या घटनेत १८ जण जखमी झाल्याचा दावा स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आला. मात्र ठाणे महानगरपालिकेकडून या वृत्तास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. तसेच एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी २४०० मीमी व्यासाची जलवाहिनी ठाण्यातील किसननगर भागातून जाते. शनिवारी दुपारी अचानक ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे जलवाहिनीला दोन्ही बाजूने खेटून उभ्या असणाऱ्या शेकडो झोपडय़ांमध्ये पाणी घुसून परिसर जलमय झाला. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने अनेक झोपडय़ांमध्ये नागरिक अडकून पडले होते.
सुमारे ७०० घरांमध्ये अडकलेल्या पाच हजार रहिवाशांना ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागाने आणि अग्निशामन दलाने सुखरुप बाहेर काढले. या घटनेमध्ये तीन ते चार मुले वाहून गेल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होती. मात्र शोधाशोध सुरु केल्यानंतर ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. घटनेमुळे आजुबाजूच्या झोपडय़ांमध्ये पाणी तुंबल्याने चिखल तयार झाला होता. घटनास्थळी पाणी साचल्याने दुचाकी पाण्याखाली बुडाल्या होत्या. या घटनेत अशोक यादव हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि बचाव कार्याची पाहणी केली.  
साफसफाई तातडीने
जलवाहिनी फुटल्याच्या घटनेमुळे परिसरात रोगराई पसरु नये म्हणून कचरा साफसफाईचे तसेच औषध आणि पावडर फवारणीचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदिप माळवी यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water pipeline leakage in thane
First published on: 29-03-2015 at 04:46 IST