या महिन्यापासूनच जलपुरवठा आक्रसण्याचे संकेत

यंदा सरासरीइतका पाऊस पडून जुलै महिन्यातच धरणे तुडुंब भरली असली तरी मंजूर कोटय़ापेक्षा उचल अधिक असल्याने ऑक्टोबर महिन्यापासूनच ठाणे जिल्ह्य़ातील शहरांमध्ये पाणीकपात करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ऑक्टोबरच्या उकाडय़ातच शहरातील नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.

पाणीकपात तातडीने लागू होणार असली तरी सणांच्या दिवशी ही कपात शिथिल केली जाणार आहे.    जिल्ह्य़ातील वाढती लोकवस्ती विचारात घेऊन भविष्यकालीन पाणीपुरवठय़ासाठी प्रस्तावित करण्यात आलेला एकही नवीन धरण प्रकल्प अद्याप मार्गी लागलेला नाही. त्यामुळे पाण्यासाठी संबंधित यंत्रणांना कसरत करावी लागत आहे.

एकूण स्रोतांमधून विविध प्राधिकरणांना १२४० दशलक्ष लिटर्स पाणी उचलण्याची परवानगी आहे. मात्र प्रत्यक्षात दररोज १५२१ दशलक्ष लिटर्स पाणी उचलले जाते. ठाणे जिल्ह्य़ात एकूण जलसाठा ३९२.४६ दशलक्ष घनमीटर आहे.१५२१ दशलक्ष लिटर्स या प्रमाणात दररोज पाणी उपसले तर ५०३ दशलक्ष घनमीटर इतके पाणी लागेल. पाणीपुरवठय़ातील तुटीचे हे प्रमाण २२ टक्के असून त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत शहरांमध्ये काटेकोर पाणीकपात करण्याव्यतिरिक्त  पर्याय नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आठवडय़ात निर्णय..

यंदा जलतुटीचे प्रमाण २२ टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे पुढील वर्षी १५ जुलैपर्यंत उपलब्ध जलसाठा पुरविण्यासाठी लवकरच जिल्ह्य़ातील शहरांमध्ये आठवडय़ातील एक दिवस पाणीकपात केली जाण्याची शक्यता आहे. पाणी कपातीचा हा निर्णय लवकरात लवकर म्हणजे आठवडाभरात घेतला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

  • मंजूर कोटा : १२४० दशलक्ष लिटर
  • प्रत्यक्ष उचल : १५२१ दशलक्ष लिटर