ठाणे जिल्हय़ात औद्योगिक विकास महामंडळाची पाणीकपात तब्बल ५५ टक्क्य़ांवर;
कळवा-मुंब्रा, मीरा-भाईंदर, नवी मुंबई तसेच कल्याण-डोंबिवलीवरही परिणाम
उद्योगांना पाणी पुरविण्याआधी नागरिकांना पाणी द्या, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या ठाणे जिल्ह्य़ातील आमदारांपुढे मान तुकवत लघु पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठय़ात तब्बल ५५ टक्के कपात करण्याचा निर्णय मंगळवारी घेतल्याने जिल्ह्य़ातील सुमारे साडेपाच हजार लघु उद्योगांना जोरदार फटका बसणार आहे. सध्या ही पाणीकपात ३० टक्के होती, तिच्यात २५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फटका कळवा-मुंब्रा, मीरा-भाईंदर, नवी मुंबई तसेच कल्याण डोंबिवली या शहरांच्या पाणीपुरवठय़ालाही बसणार आहे.
महामंडळाने या कपातीविषयी कोणतीही ठोस प्रतिक्रिया देण्याचे मंगळवारी टाळले. यापुढे औद्योगिक पट्टा तसेच शहरी भागांना नेमका किती दिवस पाण्याचा पुरवठा केला जाईल याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती एमआयडीसीतील सूत्रांनी दिली. पाणी बंदचे दिवस कमी करण्याऐवजी दाब कमी करण्याचा एक पर्याय आमच्यापुढे आहे, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे नियोजन करूनही ठाणेकरांचे आणि जिल्ह्य़ातील उद्योगांचे पाणीसंकट अधिकच उग्र होण्याचीच चिन्हे आहेत.
सद्य:स्थितीत उद्योगांना आठवडय़ातील ६० तास पाणी बंद ठेवले जाते. प्रत्यक्षात हे प्रमाण ७५ तासांच्या आसपास पोहोचते, अशी कारखानदारांची तक्रार आहे. अतिरिक्त पाणीकपातीमुळे आठवडय़ातील किमान तीन ते चार दिवस उद्योगांना पाण्याविना काढावे लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे.
गेल्या मोसमात पावसाने ओढ घेतल्याने बारवी तसेच आंद्र धरणात पाण्याचा साठा अत्यंत कमी आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासूनच पाटबंधारे विभागाने पाणीकपातीचे धोरण लागू केले असून जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांना ३० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. मध्यंतरी पाटबंधारे विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सरासरी दैनिक पाणी वापराचा तपशील मागविला होता. त्यानुसार सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था ठरवून दिल्यापेक्षा जास्त पाण्याचा उपसा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या नियमनानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास दररोज ५८३ दशलक्ष लिटर इतके पाणी उसण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असताना महामंडळातर्फे ७०० एमएलडीपेक्षा अधिक पाणी उपसले जात असल्याचा आक्षेप पाटबंधारे विभागाने नोंदविला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेस २६४ एमएलडी पाण्याचा वाटा मंजूर असताना तेथेही दिवसाला ३०५ एमएलडी इतक्या पाण्याचा उपसा केला जात आहे. यामुळे एमआयडीसीवर थेट ५५ टक्के पाणीकपातीचे र्निबध टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2016 रोजी प्रकाशित
पाणीटंचाईच्या झळा तीव्र!
ठाणे जिल्हय़ात औद्योगिक विकास महामंडळाची पाणीकपात तब्बल ५५ टक्क्य़ांवर
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 09-03-2016 at 02:42 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water shortage problem in mumbai