scorecardresearch

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणीसाठा ९१ टक्क्यांवर

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण भरण्याचा वेग वाढला

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणीसाठा ९१ टक्क्यांवर
(संग्रहीत छायाचित्र)

जुलै महिन्याच्या अखेरीस आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून धरण भरण्याचा मंदावलेला वेग वाढला आहे. ठाणे जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्वाचा असलेल्या बारवी धरणात मंगळवारी ३०९.४० दशलक्ष घनमीटर इतका पाठीसाठा होता. त्यामुळे धरण ९१.३१ टक्के इतके भरले आहे. त्यामुळे असाच पाऊस सुरू राहिल्यास येत्या आठवडाभरात धरण भरण्याची आशा आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मिरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या महापालिका, अंबरनाथ नगरपालिका आणि विविध गावांना बारवी धरणातून पाणी पुरवठा होता. सोबतच ठाणे जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वर्षाचे नियोजन होण्यासाठी बारवी धरण आपल्या पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे आहे. यंदाच्या वर्षात पावसाने जून महिन्यात दांडी मारली. त्यामुळे धरणाचा पाणी साठा मोठ्या प्रमाणावर खालावला होता. जुलै महिन्याच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जुलै महिन्यात पाऊस पडला नसता तर ऐन पावसाळ्यात पाणी कपातीची परिस्थिती ओढावली असती. मात्र जुलै महिन्यात बारवी धरणात समाधानकारक पाऊस पडला. सुरूवातीच्या दोन आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बारवी धरण झपाट्याने भरले.

….तर याच आठवड्यात भरण्याची आशा –

२२ जुलै पर्यंत धरणाचा पाणीसाठा ७८ टक्क्यांपर्यंत आला होता. मात्र त्यानंतर पावसाचा वेग मंदावला. त्यामुळे २८ जुलै रोजी धरणात ८५ टक्के इतके पाणी होते. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दांडी मारली. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात संथपणे वाढ होत होती. ३ ऑगस्ट रोजी बारवी धरणात २९६.४१ दशलक्ष घनमीटर इतके पाणी होते. एकूण क्षमतेच्या हे पाणी ८७ टक्के होते. मात्र रविवारपासून पुन्हा पावसाने जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. परिणामी बारवी धरणात पाणीसाठा वेगाने सुरू झाला. ५ ऑगस्ट रोजी ८७.८७ टक्के इतका असलेला पाणीसाठी ८ ऑगस्ट रोजी ९० टक्क्यांवर पोहोचला. तर मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी धरणात ९१.३१ टक्के इतका पाणीसाठा होता. धरणात सध्याच्या घडीला ३०९.४० दशलक्ष घनमीटर इतके पाणी आहे. तर धरणाची पाणी पातळी ७१.६८ मीटरवर आहे. गेल्या तीन दिवसांपासून पडणारा पाऊस कायम राहिल्यास बारवी धरण याच आठवड्यात भरण्याची आशा व्यक्त होते आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.