अंबरनाथ : अंबरनाथ येथील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात तातडीचे दुरुस्ती काम शनिवारी सकाळी हाती घेण्यात आल्याने निम्म्या ठाणे जिल्ह्यात पाणीपुरवठा खंडित झाला. मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने हे काम हाती घेण्यात आले होते. जवळपास बारा तास हे काम चालल्याने रविवारीही अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ आणि औद्योगिक क्षेत्रांना अंबरनाथजवळील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. तब्बल ५० वर्षांपूर्वी या केंद्रातून जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. या केंद्रातील शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला शनिवारी सकाळच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी तातडीचे दुरुस्ती काम हाती घेतले. जवळपास बारा तास हे दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामामुळे रविवारीही पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याची माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली आहे.