आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील १५ आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून दररोज ५०० लाभार्थ्यांना करोनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी ६५ हजार लस कुप्यांची गरज आहे. अशा कुप्या उपलब्ध झाल्या तर आठवडाभर लसीकरण केंद्र सुरू राहून महापालिका हद्दीतील सर्व वयोगटांतील रहिवाशांचे लसीकरण विहित वेळेत पूर्ण करणे प्रशासनाला शक्य होणार आहे. सध्या लस कुप्यांअभावी लशी केंद्रांवर गाोंधळ उडत आहे. तो पूर्णपणे कमी होईल, अशी माहिती आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

आरोग्य केंद्रांना आठवडय़ातून एकदा ३०० ते ५०० पर्यंत साठा उपलब्ध होतो. ही लस दोन ते तीन दिवसांसाठी पुरते. लस साठा संपला की केंद्र बंद ठेवावे लागते. या कालावधीत शेकडो लाभार्थी लस केंद्र केव्हा सुरू होईल म्हणून विचारणा करण्यासाठी येतात. लस घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या लाभार्थीची ही परवड कमी करण्यासाठी शासनाने कल्याण डोंबिवली पालिकेला दर आठवडय़ाला ६५ ते ७० हजार लस कुप्या उपलब्ध करून दिल्या तर १५ आरोग्य केंद्रांवर दररोज ५०० लाभार्थ्यांना लस देणे शक्य होईल. एका दिवसात सात हजार ५०० लाभार्थीचे लसीकरण पूर्ण होऊ शकेल. अशा प्रकारे आठवडय़ात ६० ते ६५ हजार लाभार्थीचे लसीकरण करणे आरोग्य केंद्रांना शक्य होऊ शकेल. १५ आरोग्य केंद्रे एका वेळी लसीकरणासाठी सुरू असल्याने रहिवाशांना आपल्या भागात लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे शक्य होणार आहे. सध्या १६ आरोग्य केंद्रे सुरू असली तरी ही केंद्रे एक दिवस सुरू राहतात. उर्वरित तीन दिवस ते चार दिवस लस उपलब्ध नाही म्हणून बंद राहतात. सकाळी १० वाजता लसीकरण केंद्र सुरू करून ती पाच वाजेपर्यंत सुरू ठेवली. या कालावधीत दररोज ३०० लस मात्रा उपलब्ध झाल्या तर ४५० ते ५०० लाभार्थीचे विनाअडथळा लसीकरण होऊ शकते.

कोविशिल्ड लशीची मात्रा

पालिका हद्दीतील सोळा करोना प्रतिबंधित लस केंद्रांवर शुक्रवारी कोविशिल्ड लशीची मात्रा देण्यात आली. कोविशिल्ड लस सध्या सर्व केंद्रांवर उपलब्ध असल्याने कोव्हॅक्सिन लस कधी उपलब्ध होईल याची विचारणा करण्यासाठी रहिवाशांनी लसीकरण केंद्रांबाहेर गर्दी केली होती. अनेकांची कोव्हॅक्सिन लशीची दुसरी मात्रा घेण्याची वेळ आली आहे. वेळेत लस मिळते की नाही या विचाराने ही मंडळी अस्वस्थ आहेत. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील रहिवाशांचे लसीकरण लालचौकी येथील आर्ट गॅलरी केंद्रावर करण्यात येत होते. ऑनलाइन नोंदणी करून स्लॉट मिळालेल्या लाभार्थीचे लसीकरण येथे केले जात होते. ४५ वर्षांवरील रहिवाशी तसेच आघाडीच्या सर्व कर्मचाऱ्यांना दुसऱ्या लशीची मात्रा देण्यासाठी नेतिवली येथील प्रबोधनकार ठाकरे शाळा लकीकरण केंद्र, डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याव्यतिरिक्त पालिका हद्दीतील इतर १४ केंद्रांवर कोविशिल्ड लशीची पहिली आणि दुसरी मात्रा देण्याचे काम सुरू होते.