पावसाळा जवळ येतोय. खरं तर पाणीटंचाईमुळे केव्हा पाऊस पडेल असे सर्वानाच वाटतंय. पावसाळा जवळ आला की शेतकऱ्यांना ‘टू डू’ लिस्टच दिसू लागते. पण इतरांनासुद्धा झाडं लावायची खुमखुमी येते. खरंतर कुंडीत झाडं लावण्यासाठी पावसाळ्याची वाट बघायला नको. पण बऱ्याच जणांचा तसा ‘माईंड सेट’ असतो. मग पुढचा टप्पा म्हणजे ‘मी कोणती झाडं लावू?’ हा प्रश्न ज्यांनी गृहवाटिकेचे लेख वाचले आहेत त्यांना या प्रश्नाचं उत्तर लगेच देता यावं. पण सगळं रामायण ऐकूनसुद्धा ‘रामाची सीता कोण’ हा प्रश्न असतोच काही जणांना.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मी कोणती झाडं लावू’ या प्रश्नाच्या उत्तरासाठी हा लेख.

आपल्याकडे कुंडीमधे फुलझाड, शोभेचं झाड, औषधी झाड, स्वयंपाकासाठी उपयोगी अशी सर्व प्रकारची झाडं असावीत. जास्त जागा असणाऱ्यांनी फळझाडे पण लावावी.

स्वयंपाकात उपयोगी झाडांमधे आपण कढीपत्ता, पुदिना, पानओवा (भज्यांसाठी), मायाळू (वेल), अळू, गवती चहा, ऑलस्पायसेस इ. झाडे सहज लावू शकतो. यापैकी पुदिना बाजारात मिळणाऱ्या जुडीतील काडी लावून होऊ शकतो. पानओवा फांदीपासून सहज झाड तयार होतं. अळूसाठी त्याचे कंद लावावे लागतात. मायाळू बीपासून नवीन वेल येतो. कढीपत्ता, गवती चहा, ऑलस्पायसेससाठी रोपेच लावावी. तसंच कारलं आणि मिरची ही दोन झाडे घरच्याघरी बियांपासून अगदी सहज करता येतात. घरच्या ताज्या मिरचीचा स्वाद पदार्थाला वोगळीच छान चव देतो, तर कधीतरी खाल्ली जातात म्हणून कारल्याचा वेल लावला, तर नेहमीच कारल्याची भाजी ‘घरच्या’ कारल्यांची असेल.

बारमाही फुलझाडांमधे काही फुले झाडांवर १-२ दिवस राहतात. काही ५-६ दिवस राहतात, तर काही सकाळी उमलून संध्याकाळी मावळतात/ मिटतात किंवा संध्याकाळी उमलून सकाळी मावळतात. या सर्व प्रकारातली फुले आपल्याकडे असावीत. सिझनल फुले मला मात्र जास्त दिवस झाडावर टिकतात.

फुलझाडांमधे अबोली, गुलबक्षी, सदाफुली, बारमाही तेरडा, गोकर्ण ही बियांपासून येणारी झाडे, तसेच तगर, अेक्झोरा, जास्वंद, झेंडू, मोगरा, जाई, कामिनी, कव्हेर, गुलाब, अनंत, अलमिंडा, प्लम्बॅगो (चित्रक), चिनीगुलाब, ऑफिस टाईम (पोर्चुलाका), रसेलिया इ. फांदीपासून येणारी झाडे लावू शकतो.

सोनटक्का, अनेक प्रकारच्या लिली, भुईचाफा, कर्दळ ही कंदांपासून येणारी झाडेही कुंडीत छान होतात. ज्यांच्याकडे ऊन अगदी कमी म्हणजे एक तासापेक्षा कमी येतं त्यांनी शोभेच्या झाडांची निवड करावी. सर्वसाधारणपणे ज्या झाडांच्या पानांवर रंगीत ठिपके, रेषा किंवा छटा असतील त्यांना आपण शोभेचं झाड म्हणत आहोत. यामध्ये मनिप्लँट, क्रोटन, ड्रेसेना, अ‍ॅग्लोनिमा, मरांटा, झिपरी, रंगीत अळू, सर्पपर्णी इ.चा समावेश होईल. यापैकी रंगीत अळू, मरांटा आणि सर्पपर्णी कंदापासून तर बाकीची सर्व झाडे फांदीपासून करता येतात. ऊन कमी असताना काळे मिरे (वेल) आणि ऑलस्पायसेस ही दोन मसाल्याची झाडे पण छान होतात.

या व्यतिरिक्त वड, पिंपळ, औदुंबर, रुई, सोनचाफा, कवठी चाफा ही झाडेही कुंडीत लावून छान होतात.

तेव्हा ‘मी कोणतं झाड लावू’ हा प्रश्न आता सुटला असेल.

drnandini.bondale@gmail

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Witch tree to plant at home gardens
First published on: 04-06-2016 at 01:25 IST