कल्याण – गप्पा मारत असताना आपल्या जवळच्या मित्रावर बंदुकीतून गोळी झाडून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरूणाला कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री शहाड रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल, काडतुसे असा २१ हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीत जलवाहिनी फुटली

मोहने परिसरातील शहाड बंदरपट्टा भागातील रहिवासी सुशील मोहंतो हा तरुण आपल्या पाच मित्रांसह बुधवारी रात्री सार्वजनिक ठिकाणी गप्पा मारत बसला होता. गप्पा सुरू असताना वडवली गावातील उमेश प्रमोद खानविलकर (३०) याने जवळील बंदुकीतून सुशीलवर बंदुकीचा रोख धरून त्याच्यावर गोळी झाडली. सुरूवातीला सुशीलला उमेश गम्मत करत आहे, असे वाटले. उमेश गोळी झाडत आहे म्हणून सुशीलने हाताचा पंजा चेहऱ्यावर धरला. उमेशने जवळून सुशीलच्या तोंडाच्या दिशेने गोळी झाडली.

हेही वाचा >>> ठाण्यात भुमिगत जलवाहिनी फुटली; वागळे इस्टेटच्या काही भागांचा पाणी पुरवठा ठप्प

गोळी सुशीलच्या हाताच्या पंजामधून आरपार होऊन तोंडातून जीभ फाटून घशात जाऊन अडकली. या घटनेनंतर इतर मित्रांनी सुशीलला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे डाॅक्टरांनी प्राथमिक उपचार केले. अधिक उपचारासाठी सुशीलाल कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात पाठविले. सुशीलच्या घशात बंदुकीची गोळी अडकली आहे. या घटनेनंतर गोळीबार करणारा उमेश घटनास्थळावरुन पळून गेला. खडकपाडा पोलीस ठाण्यात या गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल झाला. कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तातडीने या गोळीबार प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. उमेश रेल्वेने बाहेरगावी पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल म्हस्के, उपनिरीक्षक संजय माळी यांच्या पथकाने शहाड रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी मध्यरात्री सापळा लावून उमेशला अटक केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth arrested from shahad for firing in kalyan zws