पाण्यापासून हायड्रोजन मिळवण्याची सर्वात स्वस्त, स्वच्छ व पुनर्नवीकरणीय ऊर्जा पद्धत वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. ग्लासगो विद्यापीठातील रसायनशास्त्रज्ञांनी एक शोधनिबंध ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध केला असून, त्यात आजच्या सर्वात प्रगत पद्धतीपेक्षा ३० पट वेगाने हायड्रोजन तयार करण्याची पद्धत शोधण्यात आली आहे. सौरवात व तरंगऊर्जा, पुनर्नवीकरणीय ऊर्जास्रोत यांच्यापासून ऊर्जानिर्मितीचा प्रश्नही सुटला आहे. पाण्यापासून इलेक्ट्रोलिसिस पद्धतीने हायड्रोजन तयार करता येते. त्यात विजेचा वापर पाण्याच्या घटकातील म्हणजे हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे बंध तोडण्यासाठी केला जातो व त्यातून हायड्रोजनची निर्मिती होते. हायड्रोजनच्या ज्वलनातून ऊर्जा निर्माण करताना पर्यावरणावर वाईट परिणाम होत नाही. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून प्रदूषण होते. शाश्वत ऊर्जास्रोतापासून हायड्रोजन तयार केला जातो तसेच पर्यावरणस्नेही पद्धतीने विद्युत ऊर्जा साठवता व वितरित करता येते. सध्या हायड्रोजनचे उत्पादन हे जीवाश्म इंधनावर अवलंबून आहे. ते इलेक्ट्रोलिसिस पद्धतीने केले तर फायदा होतो. या पद्धतीला प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन इलेक्ट्रोलायझर्स असे म्हणतात. ग्लासगो विद्यापीठातील ली क्रोनिन यांनी या संशोधनाचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितले, की यात एक द्रव वापरला जातो त्यामुळे हायड्रोजन हा द्रवाधारित अकार्बनी इंधनात अडकून राहतो. द्रव स्पंजाच्या मदतीने म्हणजे रेडॉक्स मेडिएटरच्या मदतीने इलेक्ट्रॉन व आम्ल शोषून घेतले जातात. पाण्याच्या इलेक्ट्रोलिसिसनंतर एका कक्षात अतिरिक्त ऊर्जा न वापरता हायड्रोजन निर्माण करता येतो. दर मिलिग्रॅम उत्प्रेरकाच्या पातळीवर पीइएमइ पद्धतीपेक्षा ३० पट वेगाने हायड्रोजनचे उत्पादन यात होते.