क्रिकेटच्या जगतात पंचविशीतील एक सलामीवीर तसेच एका पंचाचा उसळत्या चेंडूंनी बळी घेतला, पण तंत्रज्ञान इतके पुढे गेले असतानाही हेल्मेट वापरूनही खेळाडूंचे प्राण कसे जाऊ शकतात, हा एक प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे हेल्मेट तंत्रज्ञानात आमूलाग्र सुधारणेची गरज आहे. क्रिकेटपटूंसाठी सुरक्षित हेल्मेट तयार करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. क्रिकेटच्या चेंडूने थोडय़ा कालांतरात दोन क्रिकेटकर्त्यांना प्राण गमवावे लागले, त्यानिमित्ताने सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या हेल्मेट या विषयाचे विच्छेदन..

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्य़ूजेस हा क्रिकेटमधील बाउन्सरसारख्या जीवघेण्या प्रकाराने अवघ्या पंचविशीत जीव गमावून बसला. दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून न्यू साउथवेल्सच्या विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात ही घटना नुकतीच घडली. त्यापाठोपाठ आता भारतीय वंशाचे इस्रायली पंच हिलोल आवसकर यांनाही मानेलाच चेंडू लागून त्यांचा मृत्यू झाला. ते मुंबईचे होते. ह्य़ूजेसला निरोप देण्यासाठी पाच हजार लोक अंत्ययात्रेला उपस्थित होते. त्या वेळी कर्णधार क्लार्कला अश्रू आवरले नाहीत, पण ह्य़ूजेसच्या बहिणीने मात्र धीरोदात्तपणा दाखवत भावाला निरोप दिला. या दोन्ही घटना क्रीडा जगताला चटका लावणाऱ्या होत्या व क्रिकेटमधील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या होत्या. क्रिकेटमधील सुरक्षितता व हेल्मेटचा उपयोग असे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. बाऊन्सरच्या बाबतीत सांगायचे तर १९९१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने षटकात किती बाऊन्सर असावेत याची मर्यादा घालून दिली होती.

क्रिकेटमध्ये हेल्मेट केव्हा आले?
क्रिकेटमध्ये इंग्लंडचा कर्णधार माइक ब्रेअर्ली याच्या काळापासून म्हणजे १९७० पासून हेल्मेटचा वापर सुरू झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी क्रिकेटमध्ये हेल्मेटच्या रचनेत बदल करण्याची गरज बोलून दाखवली होती, पण इंग्लंडचा फलंदाज ख्रिस टेलर याने खेळाडूला हेल्मेटमुळे पूर्ण संरक्षण मिळणे अशक्य आहे, असेच म्हटले होते. हेल्मेटने मान झाकायला सुरुवात केली तर मानेची हालचाल कठीण होईल असे त्याचे म्हणणे आहे. हेल्मेट जास्तीतजास्त मजबूत बनवा असेच टेलरचे म्हणणे आहे. सध्या जी क्रिकेट हेल्मेट मिळतात ती मानेचा भाग संरक्षित करीत नाहीत.

हेल्मेटमुळे सुरक्षा
साडेपाच औंस वजनाचा चेंडू जेव्हा ९० मल वेगाने अबॉटने टाकला, तेव्हा यापेक्षा आणखी वेगळे काय होणार होते. ह्य़ूजेसला मानेच्या ज्या भागावर चेंडू बसला, तिथे हेल्मेटचे संरक्षण नव्हते. त्याच्या कवटीतील रक्तवाहिनी फुटली व तो कोमात गेला. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू ब्राइस मॅकगेन याने काही वर्षांपूर्वी एक नवेच हेल्मेट परिधान केले होते, तेव्हा त्यांना समालोचकांनी व खेळाडूंनी वेडय़ात काढले. ते हेल्मेट सुरक्षित होते असे मॅकगेन यांचे म्हणणे आहे. त्यांनी २००९ मध्ये परिधान केलेले हेल्मेट फ्युचिरिस्टिक म्हणजे पुढचा विचार करून बनवलेले होते असे ते म्हणतात. त्या वेळी लोक त्यांना रोबोकॅप डार्थ वॅडर म्हणाले होते. अल्बियन स्पोर्ट्स प्रा. लिमिटेडने तयार केलेले ते हेल्मेट शेवटी कंपनीने बंद केले, कारण ते दोनच जण वापरत होते. त्यात मान फिरवता येत होती, सुरक्षितता होती तरी ते बंद करावे लागले. आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांअभावी क्रिकेटमध्ये हेल्मेट तंत्रज्ञान सुधारलेले नाही, त्यामुळे ह्य़ूजेसचा बळी गेला. क्रिकेटच्या पारंपरिक सौंदर्याला जपण्यासाठी जीव गमावण्याला कितपत अर्थ आहे, याचा विचार आता जुन्या-नव्या जाणत्यांनी करायला हवा. काही क्रिकेटपटूंच्या श्रद्धाही याला कारण ठरतात. सचिन तेंडुलकरने त्याचे हेल्मेट लकी म्हणून कधी बदलले नाही. शोएब अख्तरचा चेंडू हेल्मेटवर बसून ते खराब झाले होते. हेल्मेट उत्पादन संस्थेचे अमित देसाई यांनी सचिनला ते बदलून द्यायची तयारी दर्शवली होती.

बाउन्सरवर बंदी हवी
पूर्वीच्या काळी बॉडीलाइन गोलंदाजी केली जात असे. १९३३ मध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉडीलाइन गोलंदाजीचा वाद चागंलाच गाजला होता. एक प्रकारे गोलंदाजाकडे कसब नसल्याचेच ते लक्षण आहे, कारण भीती दाखवून विकेट काढण्याचा तो प्रकार आहे. १९३२-३३ च्या सुमारास मिशेल जॉनसन याने इंग्लंडविरुद्ध अशी गोलंदाजी केली, जॉर्डनही तशीच गोलंदाजी करायचा. नंतर १९८० मध्ये केवळ टोपी घालून क्रिकेटपटू खेळत असत. फलंदाजांच्या संरक्षणाचे कायदे आहेत, पण त्याकडे पंचांनी लक्ष दिले पाहिजे, पण येथे सांगितलेल्या दुसऱ्या घटनेत पंचच मरण पावले आहे. एका षटकात दोनपेक्षा जास्त बाउन्सर टाकता येत नाहीत. ती संख्या एकवर आणावी किंवा त्यावर बंदी घालावी. कारण तो फलंदाजावरचा शारीरिक हल्लाच असतो. पाकिस्तानचा शोएब अख्तर, ऑस्ट्रेलियाचा जेफ थॉमसन व ब्रेट ली, श्ॉन टेट हे ताशी १०० मल वेगाने गोलंदाजी करीत असत.

सुरक्षित हेल्मेटसाठी प्रयत्न
रॅनसन, निकोलस पिअर्स व मार्क यंग यांनी हेल्मेट घालून बॅटिंग करत असतानाच्या ३५ जखमांचा २००३ ते २०१२ दरम्यान अभ्यास केला व त्यांच्या मते हेल्मेट व ग्रिल यांच्यात ५५ मि.मी. अंतर असताना ७३ मि.मी. व्यासाचा चेंडू आत घुसतो. याचे कारण खेळाडूंच्या काही हालचालींमुळे तो खाली किंवा वर घुसून जखमी करतो. हेल्मेटने संपूर्ण ओसायपिटल भाग झाकला तरच सुरक्षित हेल्मेट बनू शकेल व त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फलंदाजाच्या अगदी निकट असणारे क्षेत्ररक्षक फेसमास्क वापरतात, तसाही हेल्मेटमध्ये अंतर्भूत करता येऊ शकतो. मटेरियल सायन्समध्ये पीएचडी असलेले पोर्टर नावाचे गृहस्थ सुरक्षित हेल्मेट बनवण्याचे प्रयत्न करीत आहेत. सिडनी विद्यापीठाचे बायोमेकॅनिस्ट एदोआर्द फर्डिनंड यांच्या मते हेल्मेटमध्ये स्कलकॅपचे कुशन असायला हवे.

सामान्यांची हेल्मेट
हेल्मेटची रचना, वजन, संरक्षण करण्याची क्षमता यात बरीच सुधारणा गरजेची आहे. कमी किमतीत जास्तीतजास्त मजबूत व वजनाने हलकी हेल्मेट आली तरच लोक ती वापरतील. भारतातील रस्त्यावर हेल्मेट घालून गाडी चालवल्यास स्पाँडीलिसीस असलेल्यांचा तो वाढू शकतो व नसलेल्यांना होऊ शकतो. कारण रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे आपली मान हेल्मेटचे वजन घेऊन मागेपुढे होत असते, असे क्रीडा वैद्यकांचे मत आहे. कंपन्यांनी त्यासाठी पायाभूत संशोधन करण्याची गरज आहे. आता मजबूत पण हलके कार्बन फायबर वापरून चांगली हेल्मेट तयार करता येतील का याचाही विचार व्हायला हवा, कारण कार्बनच्या काही रूपातील घटकांचे धागे पोलादापेक्षा मजबूत असतात. मटेरियल सायन्समधील संशोधकांनी यात लक्ष
घालायला हवे.

हेल्मेटचे काय..?
हेल्मेट घालणाऱ्या व्यक्तीला सुरक्षित वाटत असते, पण ते फसवे असते. शिवाय तो त्या सुरक्षेमुळे गाडी जोरात चालवतो. त्यामुळे बाजूने जाणारे आपल्यासारखे मच्छर त्याला दिसत नाहीत, तेच तत्त्व क्रिकेटमध्ये आहे. हेल्मेट घातले म्हणजे संपले, सुरक्षितता आली, आपण अमर झालो असे नाही.

दोघांनाही मानेला मार
ऑस्ट्रेलियाने त्यांचा उमदा खेळाडू गमावला तर  जन्माने भारतीय असा  अनुभवी इस्रायली पंच गमावला. ज्यांनी हा जेंटलमन्स गेम आणला, त्याच देशातल्या
काही लोकांनी याची अनकॉम्प्लिकेटेड नॅचरल डेथ अशी संभावना केली. असे असते तर ज्याने तो बाउन्सर टाकला तो गोलंदाज सियन अबॉट डिप्रेशनमध्ये गेला नसता. ऑस्ट्रेलियाचा विचार करता त्यांच्यात क्रिकेटचे शिष्टाचार फार रुजले नाहीत व त्यांचा  भर दांडगाई व माकडचेष्टांवर जास्त असतो.  ूजेस फार लवकर चेंडूच्या जवळ आला व त्यामुळे तो त्याच्या मानेच्या खालच्या बाजूला बसला की काय याचा विचार करावा लागेल, असे ऑस्ट्रेलियन ब्रॉडकािस्टग क्रिकेट समीक्षक जिम मॅक्सवेल यांनी म्हटले आहे. घटना काहीही घडली तरी दोन्ही घटनेतला समान धागा एकच आहे तो म्हणजे चेंडू मानेच्या खालच्या भागात बसून सदर सलामीवीर ूजेस व इस्रायलचे पंच आवसकर दुसऱ्या एका घटनेत मरण पावले आहेत. यापूर्वी २००९ मध्ये जेनकिन्स नावाच्या पंचाची चेंडूच्या फटक्याने बोटे तुटली होती, अन्यथा पंचांचा मृत्यू झाल्याची ही घटना दुर्मीळ आहे.  एकतर यात क्रिकेटपटूंची मनोवृत्ती बदलणे किंवा शॉर्ट पीच बॉिलगचे नियम बदलणे हे उपाय आहेत पण हेल्मेटने संरक्षण का केले नाही, असा प्रश्न आहेच. आखूड टप्प्याचा अबॉटने टाकलेला चेंडू जीवघेणा ठरेल असे त्यालाही वाटले नसेल पण झाले ते सत्य आहे. फलंदाजाला घाबरवण्यासाठी बाउन्सरचा वापर केला जातो व तोच घातक ठरतो त्यामुळे डोक्याच्या दिशेने चेंडू टाकताना विचार करायलाच पाहिजे. इंग्लंडचा कसोटी क्रिकेटपटू मॅथ्यू हॉगार्ड याने तर २४८ विकेट (आता बळी म्हणत नाही) घेतल्या आहेत, तरी तो म्हणतो, की चेंडू टाकताना कुणाचा जीव घेऊ नका, तिथे मी गोलंदाज असतो तर कल्पनाच करवत नाही. ूजेसला नेहमीप्रमाणे हूक मारायचा होता पण तो त्याचा जीव घेऊन गेला.

क्रिकेट मदानावर मरण पावलेले खेळाडू
* फिलिप हय़ुजेस -ऑस्ट्रेलिया- २०१४- गोलंदाज सियन अबॉट
* डॅरन रँडॉल- दक्षिण आफ्रिका- २०१३ – यष्टिरक्षण करताना मृत्यू
* झुल्फिकार भट्टी – पाकिस्तान- २०१३-  छातीत चेंडू लागून मृत्यू
* रिचर्ड बेमाँट- इंग्लंड-२०१२- पाच विकेट घेतल्यानंतर हृदयविकाराने मदानात मृत्यू
* अलविन जेटकिन्स- इंग्लंड- २००९- ते पंच होते क्षेत्ररक्षकाने त्यांच्या डोक्यावर चेंडू मारला.
* वसीम राजा- पाकिस्तान- २००६- हृदयविकाराने मृत्यू.
* रमण लांबा- भारत-१९९८- डोक्याला चेंडू लागून ढाका येथील सामन्याच्या वेळी मृत्यू
* आयन फॉली  १९९३- डाव्या हाताला जखम नंतर हृदयविकाराने मृत्यू.
* विल्फ स्लॅक- इंग्लंड १९८९- बहुदा डोळ्यासमोर अंधारी येऊन अचानक मृत्यू
* अब्दुल अझीज- पाकिस्तान- १९५९– फिरकी गोलंदाजाचा चेंडू छातीत लागून मृत्यू
* अँडी ड्युकाट- इंग्लंड-१९४२-लॉर्ड्सवर हृदयविकाराने मृत्यू
* जॉर्ज समर्स- – इंग्लंड- १८७०- वयाच्या २५ व्या वर्षी जॉन प्लॅटसच्या चेंडूवर मृत्यू,  प्लॅट्सने नंतर वेगवान चेंडू टाकण्याचे सोडून दिले.
* प्रिन्स ऑफ वेल्स -इंग्लंड- १७५१- – चेंडू लागून मृत्यू.

हेल्मेटमुळे सुरक्षिततेची चुकीची भावना वाढीस लागते. त्यामुळे प्रत्येक जण चेंडू पूल करायला जातो किंवा हूक तरी करतो. ह्य़ूजेसने चेंडू मान खाली खालून सोडून द्यायला हवा होता.
– इंग्लंडचा माजी फलंदाज जिऑफ बॉयकॉट.