आपल्या आकाशगंगेच्या केंद्राशी कार्बनी रेणू सापडले असून ते सजीवांमधील अमिनो आम्लासारखेच गुंतागुंतीचे आहेत. सुमारे २७ हजार प्रकाशवर्षे दूर असलेल्या ठिकाणी खगोल वैज्ञानिकांना कार्बनचे वेगळेच रेणू सापडले असून त्यांची रचना फांद्यांसारखी आहे. वायूच्या मोठय़ा ढगात ते सापडले आहेत. अवकाशात रेणू शोधणे म्हणजे गवतात सुई शोधण्यासारखे आहे, परंतु आयसोप्रोपिल सायनाईडने सोडलेल्या रेडिओ लहरींमुळे त्यांचा शोध घेता आला. सजीवांच्या निर्मितीसाठी लागणारे गुंतागुंतीचे रेणू अवकाशात आहेत असेच यातून सूचित होते. अटाकाम लार्ज मिलिमीटर सबमिलिमीटर अ‍ॅरे म्हणजेच अल्मा वेधशाळा, मॅक्स प्लांक इन्स्टिटय़ूट ऑफ रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी, कोलोगन विद्यापीठ (जर्मनी) यांच्या वैज्ञानिकांनी सॅगिटारियस बी २ या वायुरूपी ताऱ्यांचे संशोधन केले. कार्बनी रेणू हे ताऱ्यांच्या जन्मस्थानी असतात. तेथे कार्बनचे अणू एका सरळ साखळीत रचलेले असतात. आयसोप्रोपिल सायनाईडचे फांद्यांसारखे रूप हे प्रथमच दिसून आले असल्याचे कॉर्नेल विद्यापीठातील संशोधन सहायक रॉब गॅरॉड यांनी सांगितले. फांद्यांसारखी रचना असलेले आयसोप्रोपिल सायनाईड हे सजीवांसाठी लागणारे महत्त्वाच्या अमिनो आम्लांसारखे आहे. अमिनो आम्ले उल्कापाषाणातही सापडलेले आहेत व ताऱ्यांच्या निर्मितीतही त्यांचा वाटा असतो. पृथ्वी जन्माला येण्याच्या अगोदरपासून त्यांचे अस्तित्व होते. सॅगॅटारियस बी२ भागाच्या रासायनिक रचनेचा अभ्यास करण्यात आला असता तेथे आंतरतारकीय कार्बनी रेणू आढळून आले. अशा रेणूंचा अभ्यास सजीवांची निर्मिती कशी झाली यावर प्रकाश टाकण्यास उपयुक्त आहे, असे अरनॉड बेलोशे यांनी म्हटले आहे. सॅगॅटारियस भागाच्या अल्मा वर्णपंक्तीत आयसोप्रोपिल सायनाईड व साधारण प्रोपिल सायनाईडचे गुणधर्म दिसून आले. हे दोन्ही रेणू तारकाजन्मांच्या ठिकाणी सापडतात हे संशोधन सायन्स नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carbon molecules existence in the galaxy
First published on: 11-10-2014 at 03:52 IST