अमेरिकेच्या तुलनेत भारतातील किरणोत्सर्गाचे प्रमाण खूपच अधिक आहे. सामान्यपणे भारतीय नागरिकाला अमेरिकी नागरिकापेक्षा पाच ते दहा पट अधिक प्रमाणात किरणोत्सर्गाचा सामना करावा लागतो, असे मत नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या देवरा डेव्हिस यांनी व्यक्त केले आहे. ‘सेल टॉवर आणि मोबाइल किरणोत्सर्ग : भूमिका, धोके आणि उपाययोजना’ या विषयावर बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
तंबाखूसेवनाबरोबर सेलफोन्स, अ‍ॅस्बेस्टॉस आणि अन्य कर्करोग होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींचा वापर यामुळे भारतीयांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच सातत्याने मोबाइलमुळे होणाऱ्या किरणोत्सर्गापासून भारतीय माणसाचे आरोग्यच धोक्यात आले आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.
डॉ. देवरा डेव्हिस यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणीय आरोग्य आणि रोग प्रतिबंधन या विषयावर गौरवास्पद कामगिरी केली असून, किरणोत्सर्ग आणि आरोग्य याबाबतीतील भारतातील चित्र स्पष्ट करताना त्यांनी किरणोत्सर्गाचा धोका भारतीय माणसाला अमेरिकन माणसाच्या तुलनेत तब्बल पाच ते दहापट अधिक आहे.
या कार्यक्रमाला अभिनेत्री जुही चावला तसेच सिनर्जी एन्व्हायरोनिक्सचे संचालक प्रणव पोद्दार उपस्थित होते. किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम आणि नकारात्मक ऊर्जा या क्षेत्रात पोद्दार कार्यरत आहेत.
तज्ज्ञांच्या मते जगभरातील सेलफोन्स आणि वायरलेस दूरसंचार सुविधेसाठी बसविण्यात आलेले टॉवर्स यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम खूप भयावह आहेत.
यासंदर्भातील अभ्यास, संशोधन करणारा जगभरातील १४ देशांमधील ३१ शास्त्रज्ञांचा गट २०११ साली स्थापन करण्यात आला आहे.
रेडिओ वारंवारिता व विद्युत चुंबकीय क्षेत्र यापासून आरोग्याला निर्माण होणारे संभाव्य धोके या विषयावर अभ्यास करीत आहेत.