03 December 2020

News Flash

नेटवर्किंगमधील कनेक्ट!

आरती यांना घरगुती व्यवसायाचं ‘व्यासपीठ’ आयतंच तयार होतं.

आरती नाईक यांनी ‘स्मार्टलिंक’ नेटवर्क सिस्टीम्सच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक नेटवर्किंगमधील व्यवसायाचं मोठं जाळं विणलं आहे. अवघ्या सात वर्षांच्या कार्यकाळात ‘स्मार्टलिंक’ ही या क्षेत्रातील उपकरणे निर्माण करणारी पहिली ‘मेक इन इंडिया’ कंपनी ठरली आहे. ‘स्मार्टलिंक’ने बहुविध उपकरणांच्या जोरावर भारतीय बाजारपेठ काबीज करणं सुरू केलं आणि गेल्या पाव दशकापासून भांडवली बाजारातही उतरली. तोपर्यंत तिची भारतात तीन निर्मिती केंद्रे झाली होती.. ‘स्मार्टलिंक’ च्या मुख्य परिचलन अधिकारी (सीओओ) आरती नाईक यांच्याविषयी.

कॉम्प्युटर, मोडेम, राऊटर, ब्रॉडबॅण्ड, डोंगल, डिजिटल व्हिडीओ कॅमेरा, अ‍ॅडॉप्टर, इंजेक्टर, इथरनेट स्विच.. अशी इंग्रजी नावांची छोटेखानी अनेक उपकरणे आणि त्यांच्या काही ‘प्रजाती’. नावांइतकंच त्यांचं तांत्रिक अंगही किचकट. कशाला कुठलं उपकरण लागतं आणि अधिक जलद व सुलभ परिणामकारक होण्यासाठी उपकरणात काय लागेल असा भविष्यातील अंदाज बांधणं तर आणखी अवघड पण हे सर्व एक तरुणी एकहाती करत असेल तर?
त्या आरती नाईक. मुख्य परिचलन अधिकारी (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर-सीओओ). आरती यांनी ‘स्मार्टलिंक’ नेटवर्क सिस्टीम्सच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक नेटवर्किंगमधील मोठं व्यवसाय जाळं विणलं आहे. अवघ्या सात वर्षांच्या त्यांच्या येथील वास्तव्यात ‘स्मार्टलिंक’ ही या क्षेत्रातील उपकरणे निर्माण करणारी पहिली ‘मेक इन इंडिया’ कंपनी ठरली आहे. तसेच आव्हानात्मक स्थितीतूनही ती वेळीच बाहेर पडली. नाईक मूळचे कारवारचे, आरती यांचे वडील मुंबईत आले आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या विक्री क्षेत्रात उतरले. आरती यांचा जन्म आणि सुरुवातीचे शिक्षणही मुंबईतच झाले. ८०च्या दशकात संगणकाशी संबंधित अन्य छोटय़ा-मोठय़ा उपकरणांची अन्य नाममुद्रांची विक्री ते येथे करत. अशाच सहकार्य व्यवसायातून मूळच्या तैवानच्या ‘डी-लिंक’बरोबर कंपनीची चांगलीच नाळ जुळली होती. एमटीएनएलद्वारे घर-कार्यालयात पोहोचलेलं ‘डी-लिंक’चं नाव ‘स्मार्टलिंक’चं यश मानलं जातं. डी-लिंककरिता उत्पादननिर्मिती करतानाच स्वत:ची उपकरणे बाजारात आणून ‘स्मार्टलिंक’ही या गटात भक्कम पाय रोवू पाहत होती. अखेर ‘डी-लिंक’ला वेगळं व्हावं लागलं आणि ‘स्मार्टलिंक’नेही मग बहुविध उपकरणांच्या जोरावर भारतीय बाजारपेठ काबीज करणं सुरू केलं. गेल्या पाव दशकापासून नेटवर्किंग क्षेत्रात कार्यरत असलेली ‘स्मार्टलिंक’ मग भांडवली बाजारातही उतरली. तोपर्यंत तिची भारतात तीन निर्मिती केंद्रे झाली होती.
आरती यांना घरगुती व्यवसायाचं ‘व्यासपीठ’ आयतंच तयार होतं. पण ऐन स्पर्धेच्या वेळी एकटय़ा पडलेल्या ‘स्मार्टलिंक’ला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचं श्रेय आरती यांचंच. एवढंच नव्हे तर वडिलांच्या कारकीर्दीत ज्या कंपन्यांची विक्री जबाबदारी ‘स्मार्टलिंक’कडे होती पुढे त्यांच्याच उत्पादनांची निर्मिती करून त्याला स्वतंत्र बाजारपेठ मिळवून देण्यात आरती यांचा सिंहाचा वाटा. किंबहुना त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कंपनीची अनेक उत्पादने ही कधी मागणी-संख्या तर कधी गुणवत्ता, किंमत याबाबत अव्वल राहिली आहेत.
‘स्मार्टलिंक’मधील सुरुवातीच्या प्रवासाबाबत आरती सांगतात, लहानपणापासून मी वडिलांचा व्यवसाय अनुभवत होते. डीलरशिप करताना वडिलांची व्यवसाय गणितं हेरत असे. नेहमी वडिलांबरोबर फिरत असे. तेव्हा त्यांची विक्रेते, ग्राहकांबरोबरची वर्तणूक पाहत असे. विविध विदेशी कंपन्यांच्या उपकरणांकरिता येथे बाजारपेठ उपलब्ध करून देत असताना वडिलांची कार्यपद्धती लक्षात घेई. घरी असतानाही वडिलांबरोबर कंपनी, उत्पादन, बाजारपेठ याच विषयांवर चर्चा होई.
वडिलांच्याच व्यवसायात येण्याचं आरती यांनी निश्चित केलं असल्यानं या क्षेत्राचं तांत्रिक ज्ञान त्यांना आवश्यक वाटत होतं. त्या सांगतात, ‘‘तेव्हा इथं याबाबतचं शिक्षण, अभ्यासक्रम काहीच उपलब्ध नव्हतं. मग मी ब्रिटनमध्ये इलेक्ट्रॉनिकमधील साडेचार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. तांत्रिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणही अवगत करण्यासाठी तिथेच पदव्युत्तर व्यवसाय व्यवस्थापनाचे धडेही घेतले. काही अनुभव असावा म्हणून मी तिथे सुरुवातीला अन्य कंपन्यांमध्ये नोकरीही केली. पण मला तिथं राहायचं नव्हतंच. फक्त इथं जे उपलब्ध नव्हतं ते शिकून आपल्या कंपनीसाठी काही तरी उपयोगी पडेल असं करावंसं वाटत होतं.
२००८ मध्ये आरती भारतात आल्या तेव्हा या क्षेत्रातील व कंपनीतील चित्र आव्हानात्मक बनलं होतं. त्यांनी जे इथून जाण्यापूर्वी अनुभवलं होतं ते सारं कालबाह्य़ ठरलं. शिवाय आतापर्यंतचं विदेशी कंपन्यांचं पाठबळंही कमी होत होतं. ‘डी-लिंक’बरोबर असतानाच स्वत:चीही उपकरणं असावीत आणि ती उत्तम असावीत या हेतूने ‘स्मार्टलिंक’ने उत्पादन निर्मिती सुरू केली. या व्यवसायातीलच म्हणून इथं कुठली उत्पादने चालू शकतात याची जाण असल्यानं बाजारपेठ अन् ग्राहकोनुकूल उपकरणनिर्मितीवर आरती यांनी लक्ष केंद्रित केलं. अर्थात तोपर्यंत डी-लिंक बाजूला झाली होती व ‘स्मार्टलिंक’चं स्वत:चं अस्तित्व निर्माण होऊ पाहत होतं.
‘‘डी-लिंकबरोबर होतो तेव्हा आमची मक्तेदारी २५ टक्के बाजारपेठेवर होती,’’ आरती सांगतात. ‘‘आम्हाला स्वत:ची उत्पादनं आणायची होती. पण किंमत आणि गुणवत्तेत तडजोड करायची नव्हती. विक्रेते, ग्राहक यांच्याशी आमचा संपर्क होताच. मग नव्याने व्यवसायाची मांडणी केली. ’’
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उपकरणे दर तीन वर्षांला बाद होतात. तेव्हा त्यात कालानुरूप अद्ययावतता आणली नाही तर त्याची उपयोगिताही संपते. हे हेरून संशोधन व विकासावर भर देत काळाचे भान ठेवत उपकरणे तयार केली जातात. किंबहुना भविष्यातील गरज ओळखून उपकरणांची मांडणी करावी लागते. स्मार्टलिंककरिता आरती यांनी ते सारं केलं.
त्या म्हणतात, ‘‘तंत्रज्ञानाने मला खूपच प्रभावित केलं आहे. त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात करून अधिक सुलभ कसं जगता येईल, यावर माझा भर राहिला आहे. बरं, एकूणच माहिती तंत्रज्ञान, नेटवर्किंग आदींबाबत तरुण वर्ग अधिक जाणकार असतो. हे लक्षात घेता बाजाराला साजेसा बदल म्हणून कंपनीनं तिच्या उत्पादनांकरिता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला करारबद्द केलं.’’
शिकत राहण्याचं त्यांचं असं तत्त्वज्ञान आरती सांगतात, ‘‘शिक्षण हे कधीच संपत नाही. त्याला वयाची अट नाही. त्यात इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात तर रोजच नवं काही तरी येत असतं. त्याबाबत आपण काळाच्या मागे राहणं योग्य नाही..’’
म्हणूनच की काय गोव्यातील उत्पादननिर्मिती, बंगळुरूतील संशोधन आणि मुंबईतील कॉर्पोरेट कार्यालय अशी तिहेरी जबाबदारी सांभाळतानाच, तांत्रिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्याकरिता आरती या सध्या आयआयएम, बंगळुरूत व्यावसायिक धडेही गिरवताहेत!

व्यवसायाचा मूलमंत्र
धोरणात्मक निर्णय घेणं केव्हाही आणि कोणत्याही व्यवसायाच्या हिताचं. स्वत:, सहकारी, कर्मचारी आणि कंपनीलाही
पुढे घेऊन जायचं असेल तर नियोजनबद्धरीत्या वाटचाल असणं अभिप्रेत आहे. त्वरित निर्णय ही एक आणखी व्यवसायाच्या हेतूने अनिवार्य बाब. व्यवसायात जोखीम निश्चित आहे. त्याची नस फक्त तुम्हाला पकडता आली पाहिजे.

आयुष्याचा मूलमंत्र
आयुष्यात प्रामाणिकपणाला पर्याय नाही. व्यवसायाप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यातही दीर्घकालीन दृष्टिकोन बाळगावा. अशक्य काही नाही असं म्हणत असताना तुम्हाला जे तडीस न्यायचंय त्यासाठी तुम्ही ठाम असलं पाहिजेत. स्त्री व्यावसायिक म्हणून कमी असणारी त्यांची संख्या आणि त्यांचा मोबदला हा आंतरराष्ट्रीय स्तरावरही भेदभाव करणारा आहेच. पण मल्टिटास्किंगचा गुण अंगभूतच असल्याने स्त्रीला घरून मिळणारं पाठबळही तेवढंच गरजेचं आहे. हे लक्षात कायम ठेवा, स्वप्न तुमचीच आहेत. ती तुम्हीच पाहायची आहेत आणि पूर्णही तुम्हालाच करायची आहेत.

आरती नाईक
एक नाममुद्रा आणि तीन उत्पादननिर्मिती केंद्र अस्तित्वात येताच आरती यांच्या नेतृत्वाखाली ‘स्मार्टलिंक’ने यापूर्वीच्या विदेशी भागीदारांच्या तोडीची एकाहून एक उत्पादने सादर केली. कंपनीला नंतर त्यांनी भांडवली बाजारातही उतरविले. अल्पावधीत कंपनीची दहा प्रमुख शहरांमध्ये विभागीय कार्यालये थाटण्यासह पाच हजारांहून अधिक विक्री व विपणन अस्तित्व निर्माण करण्यामागे आरती यांची दूरदृष्टी आहे.

‘स्मार्टलिंक’ नेटवर्क सिस्टीम्स
डिजिसोल या नाममुद्रेंतर्गत १५०हून अधिक उत्पादने कंपनी तयार करते. राऊटर, अ‍ॅडाप्टर, रिपिटर, केबल आणि आता तर सर्वेलन्स कॅमेरे, आयपी-सीसीटीव्ही या साऱ्यांची निर्मिती कंपनी करते. त्यांचा गोव्यात उत्पादन प्रकल्प असून बंगळुरूत संशोधन व विकास केंद्र आहे. सिस्को, गिगाबाइट, डी-लिंक आदी नाममुद्रा भारतात आपल्या विक्री व विपणन जाळ्याद्वारे विकसित करणाऱ्या स्मार्टलिंकने सुरुवातीच्या काळात अन्य कंपन्यांसाठी भारतीय बाजारपेठ उपलब्ध करून दिली.

veerendra.talegaonkar@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 1:28 am

Web Title: inspirational stories of women entrepreneurs 3
Next Stories
1 वायद्यातील फायदा
2 पर्यटकांच्या स्वप्नपूर्तीसाठी
3 ‘कृति’शील व्यक्तिमत्त्व
Just Now!
X