19 September 2018

News Flash

उष:काल होता होता..

धरणाखालच्या नद्या कोरडय़ा पडल्या, धरणात साठलेल्या पाण्यात मासेमारी करण्यासंबंधात ‘परवानाधारकाचे राज्य’ आले.

ब्रिटिशांविरुद्धच्या बंडात उठावदार काम केल्यामुळे त्यांच्या कायद्याने त्यांना गुन्हेगार ठरवले आणि केवट समाजाच्या वाटय़ाला भुकेकंगाल लोकांचे तुच्छतापूर्ण जीवन प्राप्त झाले. केवट, कहार, धीमर, भोई या भटक्या जमातींच्या आधीच्या बंधमुक्त व स्वेच्छा मच्छिमारांचे रूपांतर आज रोजगाराच्या शोधात असलेल्या बेकार व लाचार मजुरात झाले आहे. त्या जमातीविषयी..
‘न द्या-नाल्यांतून मासेमारी करत गरजेनुसार नदीकाठाने भटकणे हा आमच्या केवट जमातीचा हजारो वर्षांपासूनचा परंपरागत व्यवसाय होय. तागापासून दोर, दोरखंड, माशांचे जाळे तयार करणे, चट्टय़ा (गोणपाट) तयार करणे, ताग काढणे, डोक्यावर माशांची टोपली घेऊन गावात घरोघर फिरून मासे विकणे ही कामे महिला करायच्या. हा व्यवसाय कष्टाचा होता खरा, परंतु त्यात स्वातंत्र्य होते, एवढे स्वातंत्र्य की जणू काय नदीवर, माशांवर आमचाच मालकीहक्क होता. लोकांचा आधार होता, दोन वेळा पोटभरून जेवण मिळण्याची हमी होती. परंतु स्वराज्यातल्या विकास प्रक्रियेने आमचे जगण्याचे हे परंपरागत साधनच हिरावून घेतले आहे. पर्याय मिळालेले नाहीत. सिंचन व्यवस्थेच्या विकासासाठी नद्या-नाले अडविणारी धरणे, तलाव बांधले गेले. धरणाखालच्या नद्या कोरडय़ा पडल्या, धरणात साठलेल्या पाण्यात मासेमारी करण्यासंबंधात ‘परवानाधारकाचे राज्य’ आले. नवीन कायदे आले. तिथे आम्ही मासेमारीसाठी गेलो तर आम्हास चोर-गुन्हेगार समजतात. केवट, कहार, धीमर, भोई या भटक्या जमातींच्या आधीच्या बंधमुक्त व स्वेच्छा मच्छिमारांचे रूपांतर आज रोजगाराच्या शोधात असलेल्या बेकार व लाचार मजुरात झाले आहे. परिणामी आम्ही वरचेवर जास्त गरिबीत ढकलले जात आहोत.’’ केसरबाई सीताराम परसने, शामकोरबाई परसने, केसरबाई मानसिंग दध्रे, प्रयागबाई रूपचंद देव्हारे, वच्छलाबाई बिलघे आणि इतर अनेक केवट जमातींच्या महिलांचे हे दुखणे आहे. आमची बोलणी चालू होती, गाव चिखली, जिल्हा बुलढाणा येथील केवट वस्तीतल्या महिलांच्या बैठकीत.
ch13केवट ही एक व्यावसायिक जमात आहे. मासेमारी आणि माणसांची होडीतून नदीपार ने-आण करणे हा त्या जमातीचा प्राचीन काळापासूनचा परंपरागत व्यवसाय होय. संस्कृत शब्द कैवर्तपासून केवट हा शब्द आला. कैवर्त हे विष्णू देवांचे नाव आहे. राजा वेणूचा वंशज निषादपासून झालेल्या विस्तारापैकी एक भाग म्हणजे केवट जमात असे प्राचीन ग्रंथ सांगतात. मरुकातर (अरब, सीरिया), अल्लसण्डरा (अलेक्झेंडिया, काहिरा), परमयौना (रोम), सुवर्णकुट (मलय), स्वर्णभूमीज्ञ (बर्मा), जावा, वीरापथ (बारबेट), सुमात्रा, युनान, मिश्र आदी देशांशी सागर, महासागर, बंगालची खाडी या मार्गाने निषादांचे व्यापारी संबंध होते. ते उत्कृष्ट नाविक व पट्टीचे नावाडी होते. यास्क मुनीने ‘निरुक्ती’ लिहून ठेवले आहे की, ‘‘चात्वरो वर्णो पंचमो निषाद:’’ चार वर्णाव्यतिरिक्त निषाद हा पाचवा वर्ण आहे. बौद्धायानमध्ये या पाचव्या वर्णाचे महत्त्व वर्णन करताना म्हटले आहे की, निषादांपासून जी जी संतती उत्पन्न होईल ते पाचव्या वर्णाचे श्रेष्ठ लोक असतील. मोहनजोदडो, हडप्पा, अलीमुराद, सुस्कमैंडोर आदी उत्खननातून मिळालेल्या अवशेषांवरून इतिहासकार रायबहाद्दूर आणि दयाराम सहानी यांनी लिहिल्याप्रमाणे आणि इतिहासतज्ज्ञ सुमित कुमार चॅटर्जी व फादर हेरास यांनी दिलेल्या समर्थनाप्रमाणे, मध्य आशियातून आलेल्या आर्याच्या टोळ्या आणि स्थानिक अनार्यात म्हणजेच स्थानिक निषादात तीव्र संघर्ष झाला. आर्य जिंकले. आर्यानी निषादांना दस्यू, दास, राक्षस अशी नावे ठेवली. या पराभवामुळे त्यांच्यापैकी काही पूर्व व दक्षिण भारतात विखुरले गेले. गंगा नदीच्या बंगाल व बिहार प्रदेशातलेही ते मूळ निवासी होत. निषादचा अर्थ, नि: म्हणजे पाणी (जल), षाद म्हणजे शासन, वर्चस्व किंवा सत्ता असणे. पाण्यावर शासन करणारे ते निषाद. सडका व रस्त्यांची सोय नसताना प्राचीन काळी वाहतुकीसाठी जलमार्ग हाच एक प्रमुख मार्ग उपलब्ध होता, जो पूर्णत: निषादांवर अवलंबून होता.
मानववंशशास्त्रानुसार केवट ही जमात अनार्य. म्हणजेच निषाद समाज घटकातील प्राचीन जमातींमध्ये झालेल्या संकरातून निर्माण झालेली आहे. क्षत्रिय पिता आणि वैश्य माता यांच्यापासून झालेला विस्तार म्हणजे केवट जमात असेही समजले जाते. सध्या हिंदू वर्णव्यवस्थेतील सर्वात खालच्या ‘शूद्र’ वर्णात ही जमात मोडते. राज्याराज्यांत वाहणाऱ्या अनेक नद्यांच्या काठाकाठाने तात्पुरत्या वस्त्या करून देशातले करोडो लोक कष्टाळू भटके जीवन गुण्या गोविंदाने जगत होते. इ.स. ११९७ मध्ये मोहमद घोरीतर्फे या जमातींना अनुभवांती ‘मल्लाह’ हे नाव दिले गेले. मल्लाह हा अरबी शब्द आहे. मल्ल म्हणजे ‘योद्धा’ व आह म्हणजे ‘म्हटले गेले.’
१८५७ मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात स्थानिकांनी संपूर्ण देशात केलेल्या बंडात निषाद वंशीय केवट, कहार, माझीं, मल्लाह, बिंद, धीमर (धीवर)आदी उपगटांनी केलेला विरोध व संघर्ष खूप उठावदार आहे. कानपूर येथे निषाद वंशीयांनी ३५०० ब्रिटिश सैनिकांना एकाच दिवशी गंगेत जलसमाधी दिली. एकाच दिवसात ब्रिटिश सैन्याचे एवढे मोठे नुकसान कोठेच झाले नव्हते. याचा धसका घेऊन, विरोधकात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने ब्रिटिशांनी १५६ निषादवंशीय पुरुषांना गावातल्या झाडांना जाहीरपणे फाशी देऊन अनेक दिवस प्रेते लटकत ठेवली. राजे-महाराजे, ऋषीमुनींची परंपरा असलेल्या आणि प्राचीन काळापासून मत्स्य व्यवसाय व जल वाहतूक व्यवसाय करणाऱ्या या निषादवंशीय जमातींना ब्रिटिशांनी १८७१च्या गुन्हेगार जमाती कायद्याप्रमाणे उत्तर भारतात जन्मत: गुन्हेगार ठरवले. शिवाय यांची जगण्याची परंपरागत साधने हिरावून घेणारे कायदे केले. १८७८ साली फिशरीज अ‍ॅक्ट, फेरीज अ‍ॅक्ट, माइनिंग अ‍ॅक्ट, फॉरेस्ट अ‍ॅक्ट आदी कायद्यांमुळे त्यांच्या निसर्ग संसाधनांच्या परंपरागत वापरांच्या पद्धतींवर गदा आणली गेली. कायद्यानेच गुन्हेगारीचा कलंक माथी मारून साधन-संपत्तीच्या अधिकारापासून वंचित ठेवल्याने यांच्या वाटय़ाला भुकेकंगाल लोकांचे तुच्छतापूर्ण जीवन प्राप्त झाले. या साधनहीन लोकांपैकी अनेकांनी जगण्याचे मार्ग शोधत मध्य व दक्षिण भारताचा रस्ता धरला. काही महाराष्ट्रात थांबले. त्यापैकीच केवट जमातींची एक वस्ती चिखली जि. बुलढाणा येथे आहे. अशा त्यांच्या अनेक वस्त्या महाराष्ट्रात आहेत. केवट ही जमात भटक्या जमातींच्या यादीत आहे. परंतु भटक्या जमातीसाठी असलेल्या सोयी-सवलतींचा ते लाभ घेऊ शकत नाहीत. कारण त्यांना जातीचे दाखलेच मिळत नाहीत. काहींना मिळाले आहेत पण दाखला पडताळणीत ते फेटाळले जातात. कारणे खालीलप्रमाणे आहेत.
१. या वस्तीत हे प्रकर्षांने जाणवले की कुटुंबातील जी व्यक्ती मासेमारी/नावाडीचे काम करते त्या व्यक्तीला केवट संबोधतात आणि त्यांचे तसे आडनाव पडले. त्याच कुटुंबातील जी व्यक्ती ताग काढून मासेमारीसाठी लागणारे, जाळे, दोर, दोरखंड विणते/तयार करते त्या व्यक्तीला तागवाले/ तागवाली असे संबोधतात व त्यांचे आडनावही तागवाले/ तागवाली असेच पडले. एकाच कुटुंबात रक्तसंबंधांतील (वडील-मुलगा, भाऊ-भाऊ) दोन वेगळ्या व्यक्तींची आडनावे अशी वेगवेगळी दिसून आली. जसे, एकाचे आडनाव केवट तर दुसऱ्याचे तागवाले. तागवाले/ तागवाली ही नावे भटक्या जमातींच्या यादीत नाहीत.
२. एकाच कुटुंबातील व्यक्तींची आडनावे जशी वेगळी आढळली तशी त्यांच्या जातींची नोंदही वेगळी आढळली. उदाहरणार्थ – मधुकर भागाजी केवट, यांची जात त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर ‘केवट’ अशी आहे. तर त्यांचा मुलगा गणेश मधुकर दध्रे याची जात शाळा सोडल्याच्या दाखल्यावर ‘तागवाली’ अशी आहे. तागवाले/ तागवाली ही नावे भटक्या जमातींच्या यादीत नाहीत.
३. पणजोबा आसाराम लालचंद यांची जात ‘केवट’ आहे. त्यांचा मुलगा सीताराम यांच्या जातीची नोंद ‘तागवाले’ अशी आहे. सीतारामच्या तीन मुलांची जात ‘केवट’ आहे आणि एका मुलाची जात तागवाले आहे. तागवाले/ तागवाली ही नावे भटक्या जमातींच्या यादीत नाहीत. ती त्या यादीत समाविष्ट झाली पाहिजेत.
ch14४. या वस्तीतील ५३ कुटुंबांपैकी २६ कुटुंबे ही दारिद्रय़रेषेखालील आहेत. केवळ ९ कुटुंबे छोटय़ाशा पक्क्या घरात राहतात. बाकी सारी झोपडय़ा व कच्च्या घरात राहतात. एकूणच त्यांची परिस्थिती गरिबीची आहे. बहुतांशी लोकांच्या घरात पाणी, वीज, स्वच्छतागृहे यांची सोय नाही. शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. केवळ तीन कुटुंबांमध्ये पदवीधर आढळून आले. बहुतांशी माध्यमिक शिक्षणापेक्षा कमी शिकलेले आहेत.
५. याच भटक्या मच्छीमार जमातीतल्या ४० गरीब व साधनविहिन मजुरांनी एकत्र येऊन ‘गोदावरी मागासवर्गीय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था म., दुसलगाव, ता. गंगाखेड, जि.परभणी’ ही संस्था निर्माण केली. या संस्थेच्या सचिव आहेत संगीता कचरे. या संस्थेस शासनाने तालुक्यातील ४५ हेक्टर क्षेत्राचा मन्नाथ तलावातील मच्छिमारीचा ठेका दिला. तलावात मच्छबीज सोडण्यासाठी आणि मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक सामुग्रीची जमवाजमव करण्यासाठी संस्थेने लाखो रुपये खर्च केले. ‘गंगाखेड शुगर व एनर्जी प्रा. लि.’ या साखर कारखान्यातर्फे या तलावात मळी व इतर टाकाऊ विषारी द्रव सोडले जात असून तलावातील मासे मरत आहेत, अशा संस्थेच्या तक्रारी अनेक वर्षे होत्या. अर्जविनंत्या, मोर्चे, सत्याग्रहाचे मार्ग संपल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने साखर कारखान्यास दोषी ठरवले आहे. परंतु मंत्रालयातील सत्तेकडे जाणारा रस्ता साखर कारखान्याच्या हिरवळीवरून जातो म्हणून संस्थेच्या सदस्यांना पदोपदी मिळणाऱ्या धमक्या, झालेली मारहाण-गोळीबार, त्यांच्यावर केलेले अत्याचार, कराव्या लागलेल्या संघर्षांसाठी खर्च झालेला वेळ-पैसा-शक्ती आणि वर्षांनुवर्षे व्यवसायात झालेले नुकसान या सर्वाचा कटू अनुभव घेता कचरे विचारतात की, कुठे आहे सुरक्षा? कुठे आहे स्वातंत्र्य, बंधुता, समता आणि न्यायावर आधारित लोकशाही? कोणावर विश्वास ठेवून आम्ही मजूर सदस्यांनी सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळेल अशी उमेद जागवावी?

HOT DEALS
  • Moto G6 Deep Indigo (64 GB)
    ₹ 15803 MRP ₹ 19999 -21%
    ₹1500 Cashback
  • Coolpad Cool C1 C103 64 GB (Gold)
    ₹ 11290 MRP ₹ 15999 -29%
    ₹1129 Cashback

निषादवंशीय केवट व इतर उपजमातींच्या चालीरीती थोडय़ा हटकेच आहेत. लग्नात मंगलाष्टके म्हटली जात नाहीत. सप्तपदी केली जात नाही. भटजीला बोलवत नाहीत. जमातीतला ज्येष्ठ किंवा जातपंचायतीतला पंच लग्न लावतो. लग्न हिरव्या वनस्पतीने आच्छादलेल्या मंडपात, खासकरून जांभळाच्या हिरव्या पानाच्या छताखाली लग्न लावले जाते. लग्न झालेल्या महिलेचे प्रमुख लक्षण म्हणजे पायाच्या बोटांतील चांदीची चुटकी (जोडवे.) लग्नात हुंडा पद्धत नाही. मुलीचं ‘नेणं-देणं’ ५१रुपये किंवा १०१ रुपये मुलाने मुलीला द्यायचे असतात. लग्नाचा खर्च दोन्ही बाजू मिळून करतात. परंतु मुलीकडच्या जेवणासाठीचे धान्य नवरामुलाकडून
पुरविले जाते. महिलांच्या पुनर्विवाहास मान्यता नाही. प्रेमविवाहासाठी पळून जाणे मान्य नाही. जातपंचायतीत महिलांना स्थान नाही.
जन्मानंतर १२ व्या दिवशी नाव ठेवण्याचा कार्यक्रम केला जातो. छठीला मटकीची भाजी करून आईला खाऊ घालतात. मृत्यूनंतर मृतदेह पुरण्याची परंपरा आहे. पूर्वी नदीच्या काठाकाठाने किंवा जंगलात जागेची समस्या नव्हती. अलीकडे आलेल्या भूमिहीनता व भटकेपणामुळे तसेच शहरातल्या जागेच्या अभावामुळे काहीजण नाइलाजाने मृतदेह दहन करीत आहेत.
राजस्थानात हे लोक ‘हाडोती’ बोलीभाषा बोलतात. बिहार, बंगाल, उत्तर प्रदेश या भागात मागधी, मेथाली, भोजपुरी या भाषा बोलल्या जातात. इतरत्र ते कोठून आले आहेत त्यावर त्यांची भाषा अवलंबून आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी स्थानिक भाषेचा वापर करतात. यांच्यात भूत-पिशाच्च, जादू-टोणा यावर विश्वास ठेवणारे लोक बहुसंख्य आहेत.
यांच्यात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे, महिलांत तर फारच कमी आहे. बहुसंख्य लोक गरीब आहेत. सरकारी नोकरीत नगण्य आहेत. शैक्षणिक, आर्थिक विकासाची निकड असली तरी सर्वागीण विकासासाठी संधी व साधने उपलब्ध करण्यात सरकारी साहाय्य होण्याची गरज आहे. सरकारी सोयी-सवलतींचा लाभ घेण्यासाठी यांना सुलभपणे यांची ओळख देण्याचे आणि समाजातल्या वाईट शोषणकारी प्रवृत्तींपासून यांचे संरक्षण करण्याचे आव्हान समाज व शासनापुढे आहे.
अ‍ॅड. पल्लवी रेणके – pallavi.renke@gmail.com

First Published on September 26, 2015 1:01 am

Web Title: kewat community living