News Flash

पर्यटकांना लुभावणारा ‘त्रिपुरा’

भारताच्या पूर्व ईशान्येकडील भाग पर्यटनाच्या दृष्टीने नटलेला, निसर्गदेवतेचे लावण्य लाभलेला आहे.

पर्यटकांना लुभावणारा ‘त्रिपुरा’

भारताच्या पूर्व ईशान्येकडील भाग  पर्यटनाच्या दृष्टीने नटलेला, निसर्गदेवतेचे लावण्य लाभलेला आहे. त्यातले नितांतसुंदर त्रिपुरा पाहण्याचा, अनुभवण्याचा योग आला. जवळ जवळ वर्षभर (विशेषत: सप्टेंबर- मार्च) फिरण्यायोग्य व कोणतीही ‘परमिटची’ गरज नसलेले, तीन बाजूंनी बांगलादेशने वेढलेले त्रिपुरा हे राज्य. दक्षिण-पश्चिम भारतापासून हा परिसर बऱ्याच अंतरावर असल्याने ठरावीक पर्यटकच (शक्यतो जवळचे) येथे फिरत असतात.

‘आगरतळा’ हे त्रिपुराचे राजधानीचे शहर. आगरतळ्यापासून ५५ कि.मी अंतरावर भुवनेश्वरी मंदिर आहे. उदेपूर शहरातील गोमती नदीच्या काठावरील हे धर्मस्थळ आहे. १६६०-१६७६ दरम्यान महाराजा गोविंद माणिक्य याने हे मंदिर बांधले. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘राजश्री आणि विसर्जन’ या नाटकामुळे ते अजरामर झाले आहे. पूर्ण नक्षीकाम केलेले दगडी बांधकाम, त्यावरील कोरीव काम पर्यटकाला आश्चर्यचकित करते.   या मंदिराचा कळस बुद्धाच्या, स्तूपाप्रमाणे आहे. मंदिराच्या भिंतींवर अप्रतिम नक्षीकाम आहे.

चतुर्दशदेवता मंदिर : आगरतळ्यापासून सहा कि.मी.वर  १४ देवतांचे हे मंदिर आहे. १७७० पूर्वी त्रिपुरेश्वर भैरव मंदिराजवळ हे १४ देव दोन देवळांत होते. १७७० मध्ये (उदेपूर) महाराज कृष्ण माणिक्य शमशेर गझीकडून पराभूत झाल्याने त्याने उदेपूरहून आगरतळ्याला आपली राजधानी हलविली व नव्या मंदिरात १४ देवतांची प्रतिष्ठापना केली. (१८४०). या देवळाजवळ जुन्या राजवटीचे राजवाडे आहेत.

१४ देवतांची पूजा ही विशेषत्वाने केली जाते. त्या निमित्ताने मंदिरापाशी मेळा भरविला जातो. त्या पूजेला खर्ची पूजा म्हणतात. अशी आख्यायिका आहे की महाभारताच्या काळी युधिष्ठिराचा ‘मिलोचन’ होता तो त्रिपुराचा राजा होता. तो या १४ देवतांना भजत असे. त्यानंतर त्रिपुराच्या राजवटीत पुढे झालेल्या राजांकडून देखील या पूजेच्या प्रथा अविरतपणे सांभाळली गेली. हा उत्सव जुलै महिन्यात सात दिवस चालतो. पूर्वापार पुजाऱ्यांकडून ही प्रथा चालत असून पुढील पिढय़ांतून देखील तशीच चालू ठेवली गेली आहे. गाभाऱ्यात देवतांच्या पूर्ण मूर्ती नसून त्यांची फक्त शिरेच (Heads) आहेत. भक्तगण देवांना बळी चढवू शकतात.

जम्पुई हिल्स : अत्यंत आल्हाददायी वातावरण व नैसर्गिक सौंदर्य असलेला जम्पुई परिसर पर्यटकाला आकर्षून घेतो. त्रिपुरातील हिरवीगार भूमी व पिवळसर शिखरे असलेले हे ठिकाण आहे. हे तीन हजार फूट उंचीवर असलेले हे ठिकाण आगरतळ्यापासून २२० कि.मी अंतरावर आहे. विस्तृत जंगले, उत्कृष्ट हवामान, फुलांनी बहरलेली ही भूमी पर्यटकाला अक्षरश: वेड लावते.  या टेकडीवरील सूर्योदय-सूर्यास्त कधीही अविस्मरणीयच ठरतो.

बारामुरा ईको पार्क : पर्यावरणाशी निगडित हे उद्यान आहे. आगरतळ्यापासून ३७ कि.मी. अंतरावरील हे ठिकाण. भरपूर झरे, धबधबे व हिरवीगार जंगले यांनी भरलेले व भारलेले ठिकाण. या उद्यानाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रवाहावर लाकडी पूल बांधले असून तेथे विशिष्ट प्रकारची घरे बांधली आहेत. त्यात राहून सभोवतालचा निसर्ग अवलोकिता येतो.

हे उद्यान पर्यावरणाशी निगडित असल्याने, सर्व नैसर्गिक वस्तूंचाच वापर तेथे केला जातो. जंगलात पर्यटकांच्या वास्तव्यासाठी लाकडी खांबांचे आधार देऊन मचाणं उभारली आहेत. उंचावरून निसर्गरम्य देखावा पाहाण्याची (observation tower) सोय केली आहे. लाकडाचेच तरंगते पूल बांधले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने पर्यटक पूर्णपणे निसर्गाच्या कुशीत पहुडतो व मौजेत असतो.

सेपाहीजाला वन्य जीवन अभयारण्य : १८.५३ वर्ग कि.मी.चे क्षेत्रफळ लाभलेले त्रिपुराचे प्रसिद्ध अभयारण्य आगरतळ्यापासून २८ कि.मी.वर आहे. सतत वाढणाऱ्या नागरी विकासाने येथील जंगल संपविण्याच्या विचारात असतानाच १९७२ साली हे अभयारण्य म्हणून विकसित केले गेले. वनस्पतीचे उद्यानासोबत येथे हरिणांचे व वन्य प्राण्यांचे उद्यान आहे. आता १९८७ पासून हे वन्य प्राण्यांचे देखील अभयारण्य विकसित केले गेले आहे. या अभयारण्यात सुमारे ५००च्या वर वनस्पतींच्या विविध जमाती आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या बांबू व गवताच्या जमाती विकसित केल्या गेल्या आहेत. नवनवीन वनस्पतीदेखील वाढविल्या जात आहेत. येथे ४ हजार ५०० घन मीटर्सचे लाकडाचे जंगल विकसित केले गेले आहे.

पाणथळी व वेगवेगळ्या वातावरणात या अभयारण्यांत वानर, चित्ता, डुकरे, हत्तींची प्रकर्षांने उपस्थिती जाणवते. या अभयारण्यात केलेली कॉफीची व रबराची लागवड पर्यटकांना आकर्षित करते. त्याचप्रमाणे तलावातील नौकानयन, छोटय़ांची गाडी उपलब्ध आहे.

त्रिपुरातील द. पूर्व कोपऱ्यातील दुसऱ्या क्रमांकावरील गोमती वन्य जीवन अभयारण्य आगरतळ्यापासून ११० कि.मी. अंतरावर आहे. सुमारे ३०० कि.मी.चा परिसर या अभयारण्यापाशी आहे. येथे विशाल जलाशय आहे. या विशाल जलाशयामुळे स्थलांतरित जलपक्षी व स्थानिक पक्षी दिसू शकतात. त्याचप्रमाणे हत्ती, सांबर, हरिणे, जंगली बकरा व सरपटणारे प्राणी आहेत.

ऊज्ज्यंता पॅलेस : त्रिपुराच्या राजधानीच्या शहरांतील पांढरा शुभ्र ऊज्ज्यंता पॅलेस पर्यटकाचे आकर्षण आहे. हा पॅलेस पाहताना उदेपूरचा (राजस्थान) लेक पॅलेसची आठवण येते. उदेपूरचा लेक पॅलेस नावाप्रमाणे पाण्यांत (सरोवरात) उभा आहे एवढेच. पण तेच सौंदर्य जणू त्याला काढावे व याला बसवावे.

त्रिपुराच्या महाराजांची ही मोठी आठवण आहे. दोन मजली भरपूर खिडक्या, छज्जे व दरवाजे असलेला हा राजवाडा पाहता क्षणींच नजरेत भरतो. राजवाडय़ाच्या अंत:भाग म्हणजे राजेरजवाडय़ांच्या इतिहासाचा जणू साक्षीदार आहे. इ. स. १९०१ मध्ये हा राजवाडा बांधलेला आहे. तिथे भरपूर सरोवरे आहेत. महाराजा राधा किशोर माणिक्येने हा दुमजली सफेद मारबलचा सुरेख राजवाडा बांधला. या राजवाडय़ास ८३ फूट उंचीचे तीन कळस आहेत. चमकणाऱ्या टाइल्सचा तळभाग. गोलाकार लाकडी तक्तपोशी व आश्चर्यकारक कोरलेले दरवाजे ही या राजवाडय़ाची विशेषता म्हणायला हवी. तळाशी भरपूर मंदिरे बांधली आहेत. रात्रीचे प्रकाशझोत प्रखर व नर्तन करणारे झरे आणखीनच राजवाडय़ाची शोभा वाढवीत असतात.

जलभ्रमण – नीरमहाल : नीर म्हणजे जल/पाणी. पाण्यामध्ये असलेला महाल म्हणजे नीरमहाल. उदेपूर (राजस्थान)ला सरोवरात जलमहाल आहे. त्याच धर्तीवर येथेही आहे. आगरतळ्यापासून ५३ कि.मी. अंतरावर हा महाल आहे. परिकथेतल्यासारखा पण प्रत्यक्षात असलेला हा जल महाल रुद्रसागर सरोवराच्या मधोमध हा महाल आहे. महाराज बीर बिक्रम किशोर माणिक्य याने १९३० मध्ये हा महाल त्याच्या उन्हाळी वास्तव्यासाठी बांधला. नैसर्गिक गारवा मिळण्याच्या उद्देशाने हा पाण्यात बांधला गेला आहे. हा उदेपूर (राज.)च्या पिचोला सरोवरातील ‘जग्नीवास’ महालाची आठवण करून देतो. या महालाचे सुरेख प्रतिबिंब पाण्यात पडत असल्याने ते आणखीनच मनाकर्षक असते. डोमच्या आकाराचे राजवाडय़ाचे मनोरे किल्ल्याची जाणीव करून देतात. तेथील दरबार हॉल आजही तत्कालीन राजवैभवाची आठवण करून देत असतो. रुद्रसागर हा सुमारे ५.३ वर्ग कि.मी. परसिराचा असून स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान नक्कीच आहे. सरोवर असल्यामुळे नौकानयन व जलक्रीडा उपलब्ध असतात. जुलै/ ऑगस्टमध्ये रुद्रसागर येथे बोटींची शर्यत असते.

तेथे कसे पोचावे?

मुंबई / पुणेवाल्यांना भारताचा अती ईशान्येकडील भाग खरोखरीच लांबलचक असून प्रवासपण कंटाळवाणा आहे. मुंबईपासून हे अंतर जवळजवळ चार हजार कि.मी. आहे. ते देखील टप्प्या टप्प्याने. सलग प्रवास नाही. म्हणून शक्यतो समूहाने प्रवास करावा.

विमानाने- दिल्ली/ कोलकत्ता/ चैनै/ गुवाहाटी/ इंफाळ येथून विमानाने आगरतळा येथे जाता येते.

कोलकाता/ गुवाहाटी आगरतळा दैनंदिन सेवा असते.

रेल्वेने – कोलकाता/गुवाहाटी येथे लॅण्िंडगहून रेल्वेने आगरतळा येथे जाता येते.

मुंबई/ दिल्ली/ पुण्याहून कोलकाता/ गुवाहाटीस येतो व  तेथून पुढे रेल्वेने आगरतळ्यास जाणे.

बसने एनएच४४ हा राष्ट्रीय महामार्ग असून बसने कोलकाता (१८०८ कि.मी), गुवाहाटी (५९७ कि.मी), शिलाँग (४९९ कि. मी.)आहे. गुवाहाटीहून आगरतळ्यास दिवस-रात्र बस सेवा उपलब्ध आहे ती सोईचीदेखील आहे. कोलकात्याहून -ढाक्का (बांग्लादेशमार्गे) आगरतळा येथे येता येते व पुढे ढाक्का-ते- आगरतळा बसेस आहेत. बसेसचे मोठे जाळे आहे.

आगरतळ्याहून ठिकठिकाणी जाण्यासाठी विविध प्रकारच्या नियोजित सहली कंडक्टेड टूर्स आहे. कुल्र्याहून (मुंबई) गुवाहाटीस साप्ताहिक गाडी आहे. रेल्वेने जवळजवळ ५५ तास लागतात. पुढे बस वा रेल्वेने १२-१४ तास लागतात. मुंबई-कोलकातासाठी दिवसातून बऱ्याच रेल्वे गाडय़ा आहेत. तेथून आगरतळा (गुवाहाटी) मार्गे जाता येते. (हा सारा लांबलचक प्रवास करताना सुरक्षित मार्जिन म्हणून तीन-चार दिवस राखून ठेवावेत. कोणत्याही कारणांनी दिरंगाई होते व प्रवासाचा विचका होऊ शकतो. त्यांसाठी केव्हाही उपयुक्तच वाटते.
रामकृष्ण अभ्यंकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2015 1:04 am

Web Title: tripura
टॅग : Tripura
Next Stories
1 का धरिला परदेश?
2 सफर मिठाच्या खाणीची
3 आनंदी लोकांचा देश
Just Now!
X