महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतेच शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये साहसविश्वासाठीही दोन पुरस्कार जाहीर झाले. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे आणि पल्लवी वर्तक यांची या जगातील आजवरच्या कामगिरीची दखल घेत या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने या दोन साहसवीरांच्या कामगिरीचा हा आढावा.

गिर्यारोहण जगात उमेश झिरपे हे नाव आता तसे सगळय़ांच्याच परिचयाचे आहे. कसलेला गिर्यारोहक, चांगला नेता, कुशल संघटक, भटक्यांच्या पाठीराखा, अभ्यासू लेखक अशा विविध शीर्षकांनी उमेश झिरपे यांना सगळेच ओळखतात.
झिरपे गेली ३९ वर्षे या डोंगरदऱ्यांमध्ये भटकत आहेत. अगदी सुरुवातीला मित्रांच्या पातळीवर, मग आरोहक संस्थेच्या फलकाखाली आणि आता गिरिप्रेमी संस्थेच्या झेंडय़ाखाली त्यांनी आपला हा साहसवाटांचा परीघ विस्तारत नेला आहे. सह्याद्री आणि हिमालयातील असंख्य मोहिमांमध्ये झिरपे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. तेलबैला, ढाकोबा, खांदकडा, नाफ्ता, नागफणी, खडापार्शी, विसापूर भिंत, लिंगाणा आदी प्रस्तरारोहण मोहिमांमध्ये त्यांनी यश संपादन केले आहे. हिमालयातील प्रियदर्शनी, थेलू, भ्रुगू पर्वत, माऊंट मंदा, बियास कुंड, सुदर्शन पर्वत, शिवलिंग, माऊंट नून, माऊंट चुकुंगरी, श्रीकंठ, माऊंट जॉनली, माऊंट भगीरथी-२, माऊंट देवतिब्बा अशा अनेक मोहिमांमध्ये त्यांनी यशस्वी सहभाग नोंदवला आहे. यातील अनेक मोहिमांचे त्यांनी संयोजन आणि नेतृत्वही केले होते.
झिरपे यांच्या या कामगिरीपेक्षा समाजाला त्यांची खरी ओळख झाली ती गेल्या तीन वर्षांत ‘गिरिप्रेमी’ने यशस्वी केलेल्या महत्त्वाकांक्षी तीन सर्वोच्च मोहिमांमधून. एव्हरेस्ट मोहीम- २०१२, ल्होत्से-एव्हरेस्ट मोहीम- २०१३ आणि माऊंट मकालू मोहीम- २०१४ या तीनही मोहिमांमध्ये मराठी गिर्यारोहकांनी मोठे यश संपादन केले. आंतराष्ट्रीय पातळीवरही या मोहिमेची दखल घेण्यात आली. या तीनही मोहिमांचे संयोजन आणि नेतृत्व झिरपे यांनी यशस्वीरीत्या हाताळले. गिरिप्रेमी आणि नव्यानेच सुरू केलेल्या ‘गार्डियन-गिरिप्रेमी माऊंटेनिअरिंग इन्स्टिटय़ूट’च्या माध्यमातून आता ते गिर्यारोहण खेळाचा प्रसार आणि विकासाचे काम करत आहेत. या विषयावर लेखन, व्याख्याने, विविध उपक्रमांच्या आयोजनातही त्यांचा मोठा वाटा आहे.

गिर्यारोहण हा तसा पुरुषांच्या मक्तेदारीचा छंद-खेळ. पण याच वाटेवर केवळ आडवाटा न धुंडाळता एक ना दोन तब्बल शंभरहून अधिक सुळके-कडे सर करण्याचा मान पल्लवी वर्तकने मिळवला आहे.
पल्लवीची ही डोंगर भटकंती १९९२ मध्ये शिवशक्ती हायकर्सच्या माध्यमातून सुरू झाली. पण भटकंतीच्या पलीकडे जाऊन तिला प्रस्तरारोहणाचे वेड लागले ते मात्र शैलभ्रमर या संस्थेमुळे. मार्च २००१ मध्ये ‘संडे १’ हा सुळका सर करून तिच्या प्रस्तरारोहणाचा श्रीगणेशा झाला. पुढे तिने गोरखगडावर पहिल्यांदाच या प्रस्तरारोहणाचे नेतृत्वही केले आणि मग तिने मागे वळून पाहिलेच नाही. नानाचा अंगठा, अंजनेरीचा नवरी सुळका, भैरवगडाची भिंत, साधले घाटातील सुळके असे २००५ पर्यंत तिने एक ना दोन तब्बल ७५ सुळक्यांवर यशस्वी आरोहण केले.
पुढे काही काळ मंदावलेली तिची ही मोहीम २०१०च्या सुमारास पुन्हा नव्या जोमाने सुरू झाली. या वेळी तिने काही महिला प्रस्तरारोहकांचा संच बांधला. त्यांच्या जोडीने मग इर्शाळ, सीतेचा पाळणा, वानर उडी असे एकामागे एक सुळके सर करणे सुरू केले. २०११ मध्ये अलंग आणि कुलंग गडाच्या रांगेतील काही अस्पर्शी सुळक्यांच्या माथ्यांना तिने स्पर्श केला. २०१२ मध्ये तेलबैलाच्या भिंतींवर महिला प्रस्तरारोहकांच्या मोहिमेचे नेतृत्व पल्लवीने केले. २९ डिसेंबर २०१२ रोजी लिंगाण्यावर एकटीने आरोहण करून आपल्या सुळके सर करण्याच्या मोहिमेचे शतक पूर्ण केले. सह्याद्रीतील सुळके आरोहणाचे शतक पूर्ण करणारी ती महाराष्ट्रातील पहिलीच महिला ठरली आहे. कळकराय सुळका यशस्वी करत तिने आपली ही मोहीम आजही पुन्हा नव्या जोमाने सुरू ठेवली आहे.