17 December 2017

News Flash

रणथंबोर व्याघ्र प्रकल्प

राजस्थानातील ‘रणथंबोर व्याघ्र प्रकल्प’ हे जगभरात प्रसिद्ध आहे ते तिथे सहजपणे दिसणाऱ्या वाघांसाठी. खरेतर

मुंबई | Updated: January 2, 2013 1:37 AM

राजस्थानातील ‘रणथंबोर व्याघ्र प्रकल्प’ हे जगभरात प्रसिद्ध आहे ते तिथे सहजपणे दिसणाऱ्या वाघांसाठी. खरेतर ही ऐतिहासिक जागा, इथे एक किल्लाही आहे. या किल्ल्याभोवतीच पूर्वीपासून हे जंगल राखण्यात आलेले आहे. १९७४ मध्ये या जंगलाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. या व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रफळ जवळपास १९७४ चौरस कि.मी. एवढे आहे. रणथंबोरचे जंगल तसे विरळ पानगळीचे आहे. यातील प्रमुख वृक्ष आहे ढोक. इथे मोठमोठय़ा पहाडांमुळे जंगलाची भव्यता आणखीच जाणवते. जंगलात सर्वत्र बोर, आवळा, बाभळी अशा काटेरी वृक्षांचा वावर आहे. या विरळ जंगलामुळे इथे वाघ दिसण्याचे प्रमाण जास्त आहे. या व्याघ्र प्रकल्पात पाणी कमीच ठिकाणी असले, तरी यातही पद्मा तलाव, राजबाग तलाव, मिलक तलाव ही निसर्गसौंदर्याची स्थळे आहेत. या तलावांमध्ये उतरून सांबर पाणलीलींची पान खातानाचे दृश्य तर वेड लावणारे असते. मग कधी कधी काठावरच्या उंच गवताआड लपून वाघ या सांबरांचा वेध घेतो. रणथंबोरमधील काही वाघ तर तलावात पाण्यातून धावत यांची शिकार करतात. त्यामुळेच रणथंबोर इतर व्याघ्र प्रकल्पांपेक्षा वेगळा वाटतो. वाघांशिवाय बिबटे, अस्वल, तरस, कोल्हा, चितळ, नीलगाय, चिंकारा, वानर, रानडुक्कर इत्यादी प्राणीही आढळतात. त्याशिवाय जवळपास २५० पेक्षा जास्त स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शनही येथे सहजपणे होऊ शकते. त्यात सर्पगरुड, बोनेलीचा गरुड, स्वर्गनाचन, जलकपोत, टोकरी, शंगी घुबड, लावे, नीलपंख, कक्कू, राजगिधाड, सुतार पक्षी यांचाही समावेश आहे. अशा या रणथंबोर जंगलाच्या भ्रमंतीचे ‘निसर्ग सोबती’तर्फे १२ ते १६ एप्रिल कालावधीत आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७/ ९९३०५६१६६८) यांच्याशी संपर्क साधावा.

First Published on January 2, 2013 1:37 am

Web Title: ranthambor tiger project