28 February 2021

News Flash

वेध..‘ल्होत्से-एव्हरेस्ट’चा!

'एव्हरेस्ट'च्या वाटेवर!गेल्या वर्षी 'एव्हरेस्ट'चे यश संपादन करणाऱ्या 'गिरिप्रेमी' संस्थेच्या वतीने यंदा 'ल्होत्से- एव्हरेस्ट' असे आणखी एक साहसी पाऊल टाकले आहे. आठ हजार मीटर पेक्षा उंच

| May 1, 2013 01:31 am

‘एव्हरेस्ट’च्या वाटेवर!
गेल्या वर्षी ‘एव्हरेस्ट’चे यश संपादन करणाऱ्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या वतीने यंदा ‘ल्होत्से- एव्हरेस्ट’ असे आणखी एक साहसी पाऊल टाकले आहे. आठ हजार मीटर पेक्षा उंच असणाऱ्या दोन शिखरांचा एकाचवेळी वेध घेणारी ही पहिली भारतीय नागरी मोहीम! या मोहिमेला नुकतीच सुरुवात झाली असून या मोहिमेचा नेता उमेश झिरपे तिचा थरार आपल्यासाठी सांगत आहे, थेट एव्हरेस्टच्या वाटेवरून!

बरोबर २५ मार्चला काठमांडूमध्ये प्रवेश केला आणि गेल्या वर्षी यशाचे शिखर दाखवणाऱ्या एव्हरेस्ट मोहिमेच्या आठवणींनी मन पुन्हा उचंबळून आले. पुन्हा या एव्हरेस्टच्या वाटेवर स्वार व्हायचे होते. पण यंदा त्याच्या जोडीला गिर्यारोहकांना भीती दाखवणाऱ्या ल्होत्से शिखराचाही समावेश होता.
खरेतर गेल्या वर्षी एव्हरेस्टच्या या शिखराला गवसणी घातली असताना या वर्षी लगेच ही मोहीम कशासाठी असा प्रश्न अनेकांना पडला असेल. म्हटले तर बरोबरही आहे. एव्हरेस्टच्या या यशाच्या भांडवलावर पुढे काही वर्षे तरी हारतुरे आणि सत्कार सोहळय़ात रमता आले असते. पण हेच टाळत यशाच्या या भांडवलाचा पुढील मोहिमांची ताकद म्हणून वापर करत ‘गिरिप्रेमी’ने नवा संकल्प सोडला. ही मोहीम त्याचाच एक भाग!

जगात आठ हजार मीटरपेक्षा उंचीची १४ हिमशिखरे आहेत. ज्यांना गिर्यारोहण जगात ‘एट थाऊजंडर्स’ असे म्हणतात. या सर्वच्या सर्व १४ शिखरांच्या माथ्यांना स्पर्श करणारे गिर्यारोहक आज जगात हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच आहेत. भारतात तर आजमितीस असा एकही गिर्यारोहक नाही. साहसाचा, धाडसाचा हाच ध्यास ‘गिरिप्रेमी’ने उचलला आणि पुढील काही वर्षांत या १४ हिमशिखरांना साद घालण्याचा संकल्प सोडला आहे. यातीलच एव्हरेस्ट पाठोपाठ दुसरे पाऊल यंदाचे हे ‘एव्हरेस्ट-ल्होत्से’!
माऊंट एव्हरेस्ट उंची २९०३५ फूट, तर माऊंट ल्होत्से उंची २७९७० फूट! एक जगातील सर्वोच्च तर दुसरे त्याचा धाकटा भाऊ असलेले जगातील चार क्रमांकाचे शिखर! एकाच रांगेतील ही दोन्ही शिखरे एकाच मोहिमेत सर करण्याचा ध्यास ‘गिरिप्रेमी’ने घेतला आहे. असे झाले तर ही पहिली भारतीय नागरी मोहीम ठरणार आहे.
पशुपतिनाथाचे दर्शन घेत आम्ही या नव्या धाडसासाठी बाहेर पडलो. एव्हरेस्टच्या वाटेवर लुक्ला हे शेवटचे गाव, जिथे छोटेसे विमानतळ आहे. सामान्यत: गिर्यारोहक काठमांडू ते लुक्ला असा विमानप्रवास करत पुढे ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’कडे चालू पडतात. पण यंदा आम्ही या साचेबंद कार्यक्रमात थोडा बदल करून लुक्लाच्या खूप अलीकडे फापलू गावापासूनच चालण्यास सुरुवात केली. लुक्लाची उंची ९३८३ फूट, तर फापलूची ७९१८ फूट! साहजिकच खूप तळातूनच आम्ही चढाईला सुरुवात केली. फापलू, रिंगमो, ट्रागसिंधो, खारीकोला, सुरखे, लुक्ला, नामचे बझार, टेंगबोचे, डेंबुचे आणि गोरखशेप असा हा प्रवास!
आमच्याप्रमाणेच देशोदेशीचे गिर्यारोहक ही वाट तुडवत होते. या प्रवासात अशा अनुभवी ज्येष्ठ गिर्यारोहकांशी होणाऱ्या ओळखी-गप्पा खूपच महत्त्वाच्या ठरतात. एका गिर्यारोहण कंपनीत काम करणारे लेफ्टनंट टेड अटकिन्स यापैकीच एक! मागील वेळी आम्हाला त्रासदायक ठरलेल्या ऑक्सिजन मास्कच्या वापराबाबत त्यांनी उपयुक्त सूचना केल्या. टेंगबोचे गावी भेटलेला स्पेनचा गिर्यारोहक कार्लिस सोरियाही असाच अनुभवी. आठ हजार मीटर उंचीवरील तब्बल १० शिखरे सर करत तो यंदा कांचनगंगा शिखराला भिडणार होता. त्यानेही या अति उंचीवरील चढाईबाबत काही मौलिक सूचना केल्या. अनुभवी गिर्यारोहकांबरोबरच्या या गप्पादेखील आपल्या पायातील बळ वाढवत असतात.
असंख्य चढउतार करत शेवटी आम्ही गोरखशेप गावी पोहोचलो. या गावातच गेल्या वर्षी ‘गिरिप्रेमी’ने छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा बसवला आहे. जगातील सर्वोच्च उंचीवरील हा पुतळा! गेल्या वर्षभरात आता इथे येणाऱ्या सर्वच पर्यटक-गिर्यारोहकांचे हा पुतळा आकर्षण ठरू लागला आहे. शिवरायांची माहिती इथे लावलेली आहे. ही माहिती वाचत आणि शिवरायांना वंदन करतच जगभरातील गिर्यारोहक पुढे एव्हरेस्टच्या दिशेने पाऊल टाकतात. आम्हा मराठी मुलांना बळ देणारे शिवराय जणू साऱ्या विश्वाचीच साहसाची देवता बनली होती. छत्रपती शिवरायांना आम्हीही वंदन केले आणि ‘बेस कॅम्प’वर पाऊल टाकले.
फापलू ते बेस कॅम्प या पंधरा दिवसांच्या चढाईत आम्ही पाच हजार ते अठरा हजार फुटांपर्यंत अशा विविध उंचीवर वर-खाली केले. या अशा चढाईचा सरावाबरोबरच बदलत्या हवामानाशी शरीराला मिळतेजुळते करून घेणे (अ‍ॅक्लमटायझेशन) सोपे जाते. अशी स्थानिक हवामानाशी मिळतीजुळती झालेली शरीरे पुढील मुख्य मोहिमेसाठी मग निर्धोक बनतात.
‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’! उंची १७७०० फूट! एव्हरेस्ट मोहिमेच्या निमित्ताने दरवर्षी मार्च ते मे मध्ये गिर्यारोहकांचे हे हंगामी गाव वसते. या वर्षीही इथे देशोदेशीच्या दोनशेहून अधिक गिर्यारोहकांनी आपली वस्ती उठवली आहे. यामध्ये आमच्या सात-आठ तंबूंचीही भर पडली. राहण्यासाठी, स्वयंपाक, जेवण, प्रात:र्विधीपासून ते अगदी आपापल्या पद्धतीनुसार प्रार्थनेसाठीही इथे स्वतंत्र तंबू लागले जातात.
हे तंबू लागतात, कामे सुरू होतात, साहित्याची जुळवाजुळव होते, अनुभवी मार्गदर्शक शेर्पाबरोबर बैठका होतात आणि मग मुहूर्त साधत एके दिवशी बौद्ध लामा त्यांच्या या ‘चोमोलुंग्मा’ देवीची पूजा बांधतात. एव्हरेस्टला नेपाळी लोक ‘चोमोलुंग्मा’ या त्यांच्या देवतेच्या नावाने संबोधतात. या पूजेवेळी भोवतीने बौद्ध धर्मातील मंत्र लिहिलेल्या पताका लावलेल्या असतात. असे म्हणतात, की पूजा सुरू असताना या पताका वाऱ्यावर हलल्या तर त्या स्वर्गीय देवतेचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो. तिच्या कुशीत शिरण्यासाठी जणू ती तुम्हाला कौल देते!
..आमच्या पूजेवेळीही या पताका हलल्या आणि जणू त्या ‘चोमोलुंग्मा’चाच आम्हाला आशीर्वाद मिळाला!

‘गिरिप्रेमी’ची मोहीम

*   ल्होत्से शिखराची उंची ८५१६ मीटर किंवा २७९४०फूट. जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर.

*   हे शिखर सर करण्यासाठी १९५५ मध्ये पहिला प्रयत्न झाला. तर पुढच्याच वर्षी १९५६ साली स्वीस गिर्यारोहकांकडून या शिखरावर पहिली यशस्वी चढाई झाली.

*   ल्होत्से आणि एव्हरेस्ट या दोन शिखरांसाठी एकाच वेळी चढाई करणारी ही पहिली भारतीय नागरी मोहीम.

*   ‘एव्हरेस्ट’साठी ‘गिरिप्रेमी’ची सलग दुसऱ्या वर्षी मोहीम. २०१२ मध्ये शिखर सर करण्यात थोडक्यात अपयश आलेल्या गिर्यारोहकांचा यंदाच्या मोहिमेत समावेश.

*   उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यांचा मोहिमेत सहभाग.

*  मोहिमेसाठी एकूण ९० लाख रुपयांचा खर्च. उद्योग क्षेत्राकडून या निधीची उभारणी सुरू.

*   ल्होत्से शिखराच्या ‘नॉर्थ-वेस्ट’ बाजूने चढाई होणार. यातील शेवटच्या टप्प्यातील दोन हजार फुटांची चढाई ७० अंश कोनात आहे.  

*   एव्हरेस्ट शिखर सर केल्यावर ल्होत्सेच्या दिशेने चढाई केली जाणार.

*   मोहिमेस भारतीय हवामान विभाग, डीआरडीओ, डीपास, जिप्सी टेन्ट्स संस्थांकडून विशेष साहाय्य.

ता. क.
.. बेस कॅम्प लागला. चांगले वातावरण मिळताच आता चढाईच्या सरावाला सुरुवात होणार आहे. आज-उद्याच ही ‘कॅम्प-३’ (उंची २४५०० फूट) पर्यंतची चढाई सुरू होणार आहे. कदाचित हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत (दि. १ मे) आम्ही ‘कॅम्प-१’ (उंची १९९०० फूट) वर पोहोचलो असू. ‘कॅम्प-३’ पर्यंतच्या चढाईचा हाच थरार पुढील भागात अनुभवूयात!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 1:31 am

Web Title: view on lhotse and everest
Next Stories
1 भटिंडय़ाचा गोविंदगड
2 ट्रेक डायरी: भैरवगड-कोयना जंगल ट्रेक
3 हिवरेची हिरवाई
Just Now!
X