साहस हा शब्द जरी उच्चारला तरी लगोलग धाडस, पराक्रम, वेड, आवड, ध्यास अशा उपशब्दांचा वास येऊ लागतो. काहीसे आडवाटेवरचे, दुर्लक्ष-कष्टप्रद असे हे जीवन आणि मार्ग. पण या आडवाटांवरूनच गेलेल्या वीरांचा वेध घेऊ लागलो, की तिथे अनेक महिलांच्या पावलांचेही ठसे सापडतात. साहसाच्या विश्वातील या अशाच विलक्षण सत्यकथांची मोट मिलिंद आमडेकर यांनी त्यांच्या ‘साहस हाच ध्यास’ या पुस्तकातून बांधली आहे. यामध्ये मग वाळवंटातून एकटीने प्रवास करणारी रॉबिन डेव्हिडसन, उत्तर ध्रुवाकडे धावणारी हेलन थायर, बर्फातली खडतर शर्यत जिंकणारी सुसान बुचर, सायकलवर जगप्रवास करणारी डव्‍‌र्हला मर्फी, आकाशवेडी अ‍ॅमि जॉन्सन, अमेलिया; सहाराच्या शोधात फिरणारी अलेक्सिन, एकटीने एव्हरेस्ट सर करणारी अ‍ॅलिसन हारग्रेव्हज, परकीयांना प्रवेशबंदी असतानाच्या काळात तिबेटचा शोध घेणारी अलेक्झांड्रा डेव्हिड नील, शीडाच्या होडीने अटलांटिक समुद्र पार करणारी अ‍ॅन डेव्हिसन, कांचनगंगा सर करणारी जिनेट हॅरिसन, अमेझॉनबरोबर प्रवास करणारी इसाबेला गोदीन अशा एक ना दोन तब्बल १६ महिलांचे हे पराक्रम एखादी दंतकथा बनून या पुस्तकातून आपल्याला भेटतात. या कथा वाचताना मग त्यांच्या अंगी असलेली चिकाटी, जिद्द, धाडसी वृत्ती, प्रबळ मनोबल, एकाग्रता, महत्त्वाकांक्षा असे असंख्य स्वभाव पैलू आपल्यालाही स्पर्श करून जातात. प्रेरणेचे नवे पंख देतात. केवळ महिलाच नाहीतर स्वमग्नतेत अडकलेल्या पुरुषांनाही हलवणारे, साहसवाटेवर चालायला लावणारे हे पुस्तक आहे. (साहस हाच ध्यास : लेखक – मिलिंद आमडेकर, परममित्र पब्लिकेशन) manasiamdekar@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adventure is passion
First published on: 05-03-2015 at 07:16 IST