निसर्ग हा वैविध्याने भरलेला आहे. इतिहास, भूगोल, निसर्ग, पर्यावरण, समाज, साहित्य, संस्कृती असे अनंत विषय या निसर्गाच्या पोटात दडलेले आहेत. सृष्टीतील या अनंत गुपितांचा शोध घेण्यासाठी हाच उत्तम काळ! पदभ्रमणासाठीचा सुवर्णकाळ! म्हणूनच आता उंबरठा ओलांडा- सीमोल्लंघन करा!
निसर्ग आणि आपले सण-उत्सव यांचे घट्ट नातेसंबंध आहेत. खरेतर या निसर्गातून, त्याच्यातील बदलांमधूनच आम्ही सण-उत्सवाच्या प्रेरणा घेत आलो आहोत. भटक्यांच्या जगात आजचा विजयादशमीचा सणही असाच, या काळात निसर्गाकडे चला, सीमोल्लंघन करा हे सांगणारा.
पावसाळय़ाच्या अखेरच्या चरणावर हा विजयादशमीचा सण येतो. या वर्षां ऋतूचे पाणी पिऊन सारी सृष्टी या वेळी तृप्त-हिरवी झालेली असते. हिरवे डोंगर आणि त्यावरून वाहत्या जलधारांनी तारुण्याच्या बहरावर उभी असते. मागील चार महिन्यांतील ढगांचे मळभही आता हळूहळू दूर होत त्यावर प्रकाशाचे नवे कवडसे उतरू लागलेले असतात. सृष्टीच्या, निसर्गाच्या, त्याच्यातील अनंत गुपितांच्या शोधात निघण्यासाठी हाच तो उत्तम काळ! पदभ्रमणासाठीचा सुवर्णकाळ! म्हणूनच आता उंबरठा ओलांडा- सीमोल्लंघन करा!
नागरी वस्तीबाहेरची आमची ही सृष्टी नाना गोष्टींनी भरलेली-व्यापलेली आहे, संपन्न-समृद्ध आहे. डोंगरदऱ्या, गिरिशिखरे, घाटमाथे, त्यालगतची जंगल-झाडी, तिथले वन्यजीवन, पशु-पक्षी, श्रद्धाळू देवराया, नद्या-नाले, ऐतिहासिक गडकोट, प्राचीन लेण्या, कोरीव मंदिरे अशी एक ना दोन असंख्य आकर्षणे या सृष्टीत दडलेली आहेत. परंतु हे पाहायचे, अनुभवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या घराचा उंबरा ओलांडावा लागणार. आडवाटांवर स्वार व्हावे लागणार, डोंगरदऱ्यांमध्ये शिरावे लागणार! यातही भटकंतीच्या या वेडाला उत्तम-पूरक अशा काळ-वेळाची जोड मिळाली तर ही आवड, छंद पुढे उभ्या जीवनाचे व्यसन बनते आणि मग हे शुद्ध व्यसन तुमचे सारे आयुष्यच बदलून टाकते.
मुळात आपल्याकडील भटकंतीचे हे सारे विश्व डोंगररांगा-निसर्गाभोवती फिरणारे. महाराष्ट्राचे तर सारे शरीरच जणू या डोंगररांगांनी बनलेले. थोडे इकडे-तिकडे फिरले, की कुठली ना कुठली डोंगररांग आडवी येते. या डोंगररांगांवरही कुठे उंच गिरिशिखरे, कुठे कोसळणारे खोल कडे, कुठे ‘डाईक’च्या भिंती, कुठे उंच आभाळात घुसलेले एकांडे सुळके असे नाना प्रकार! या डोंगररानीचे जंगल तर आमच्या निसर्ग-पर्यावरणाचा खजिनाच म्हणावा लागेल. छोटय़ा किडय़ांपासून मोठाल्या सस्तन प्राण्यांपर्यंत आणि फुलपाखरांपासून ते उंच उडणाऱ्या पक्ष्यापर्यंत काय नाही इथे. शेकडो वनस्पती, रानफुले, आमरीचे असंख्य प्रकार, बुरशी, अळंबी असे हे अफाट जग एखादा जन्मही अपुरा ठरवतो.
आमच्या या डोंगरांना इतिहासाचेही मोठे वेड! इथे कुठल्याही डोंगररांगेवर नजर टाका, चार-दोन डोंगराआड एकाच्या तरी शिरी तटबंदीचे शेलापागोटे चढवलेला गड हमखास दिसेल. कुठे ऐन कडय़ाच्या पोटात खोदलेले ते लेण्यांचे पिंपळपान चमकेल, कुठे कोरीव कलेचा मनोरा होत उमललेले कातळशिल्पातील मंदिर पाय थांबवेल.
हे सारे सांगायचे कारण असे, की महाराष्ट्र, त्यातही त्याचा सहय़ाद्री हा सतत खुणावणारा आहे. त्याची ही ‘सोन्या’सारखी उधळण लुटण्यासाठी तुम्ही या, तुमच्या डोळय़ांत, मनात तिला साठवून घ्या. स्वत:भोवतीचा परिघ सोडत निसर्गात शिरा, बघा ही सारीच भटकंती तुम्हाला कुठल्या विश्वात घेऊन जाईन.
निसर्गात अनेकांना जावेसे वाटते, काहींना पदभ्रमणाला सुरुवात करायची असते, कुणाला गडकोटांच्या वारीला जोडून घ्यायचे असते..अशांचे ते पहिले पाऊल उचलण्यासाठी हाच उत्तम काळ! यासाठीच हे विजयादशमीचे सीमोल्लंघन!
या दिवसांतली भटकंती निसर्गाशी मैत्र जोडते, इतिहासाची गोडी लावते, भूगोलाची ओळख करून देते. वातावरणातील आल्हाद मनाला आधार देतो- पायांना बळ पुरवतो. निसर्गातली हिरवाई डोळय़ांना शांत-प्रसन्न करते.
पावसामुळे साऱ्या वातावरणातीलच धूळ-मळभ नाहीसे झालेले असते. असे हे स्वच्छ-पारदर्शी दृश्य छायाचित्रकारांना भुरळ पाडते आणि चित्रकारांनाही रंग पुरवते. निसर्ग याच दिवसांत अभ्यासकांसाठी त्याचे ज्ञानाचे भांडार खुले करतो. तर कवी-साहित्यिकांचे लाडही तो याच समयी पुरवतो.
काय नसते या दिवसांत..हिरवा निसर्ग, पाण्याने भरलेल्या नद्या-नाले आणि वाहते निर्झर! धुक्याची चादर, कोवळय़ा प्रकाशाचे कवडसे आणि लख्ख दृश्ये! उणावलेला पाऊस, न बोचणारे ऊन आणि काठावरची थंडी! काजव्यांची रात्र, चांदण्यांचे आकाश आणि कोजागरीचा चंद्र! न्हाऊन नितळ झालेले गडकोट, पवित्र झालेली राऊळे आणि धुऊन नव्या झालेल्या घाटवाटा! ..काय-काय म्हणून नाही या दिवस-रात्रींच्या कलांना!
दृश्य, चित्र, प्रकाश या साऱ्यांत जणू चैतन्य संचारलेले असे हे दिवस. सराईत पायांना अडकवणारे आणि नवख्यांना गोंधळात टाकणारे. आल्हाददायक, मनाला भुरळ पाडणारे, स्वप्नांच्या भेटी घडवणारे!
तेव्हा उठा ‘सॅक’मध्ये वही, पेन, कॅमेरा घेऊन बाहेर पडा, जवळचीच एखादी निसर्गाची अनवट वाट पकडा. कान, नाक आणि डोळय़ांची इंद्रिये उघडी करा आणि ‘आशक मस्त फकीर’ होत स्वत:ला मुक्त करा. निसर्ग त्याचे ते सोन्याचे दान भरभरून तुमच्या पदरात टाकेल!
-अभिजित बेल्हेकर
(abhijit.belhekar@expressindia.com)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on crossing the border of nature
First published on: 22-10-2015 at 04:15 IST