आडवाटांवर चालायची सवय लागली, की खेडोपाडी अनेक कोरीव मंदिरे भेटतात. त्यावरील शिल्पकाम, स्थापत्य थक्क करून सोडते. अहमदनगर ते औरंगाबाद दरम्यानच्या प्रवासात कायगाव टोके येथील सिद्धेश्वर मंदिर समूह असाच भेटतो.
अहमदनगर ते औरंगाबाद या प्रवासात शनीशिंगणापूर, सोनई, नेवासे, देवगड अशी अनेक आकर्षणे आहेत. त्यातील बहुतेकांबद्दल बऱ्यापैकी लिखाणही झाले आहे. पण याच प्रवासात प्रवरासंगम येथे कायगाव टोके गावाजवळ श्री सिद्धेश्वर मंदिर समूह आहे. अद्याप दुर्लक्षित असे हे स्थळ पर्यटकांनी आवर्जून पाहावे असे आहे.
अहमदनगर आणि औरंगाबाद यांची सीमा म्हणजे अमृतवाहिनी प्रवारा नदी आणि दक्षिणगंगा गोदावरी यांचा प्रवरासंगम. कायगाव टोके गावची ही हद्द. तेथेच हमरस्त्यावरील पूल बांधला आहे. त्याच्या अलीकडे एक-दीड किलोमीटरवर डावीकडे श्री सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा फाटा फुटतो. त्यावरून पुढे गेले, की प्रवरा नदीवरील पूल ओलांडून श्रीसिद्धेश्वर मंदिर समूहाकडे जाता येते. नगरहून हे अंतर ६०-७० कि.मी. भरते. हमरस्ता ते खुद्द मंदिर हे अंतर जेमतेम एखाद्या किलोमीटरचे आहे.
मराठवाडा प्रदेश यादवकालीन शिल्पजडीत मंदिरांनी समृद्ध आहे. मंदिरे आणि मूर्ती अभ्यासकांनी त्यांचा अभ्यास करून विपूल लेखन केलं आहे. परंतु १२-१३ व्या शतकातील यादव कालानंतर अशा शिल्पजडीत मंदिरांची बांधणीच थांबली आहे. ती मंदिरे टिकवणंही अवघड झाले. मराठी राज्य स्थिरावल्यावर पेशवाई कालखंडात नवी देवळं उभारली गेली. पण पूर्वीसारखी शिल्पांची रेलचेल त्यात नव्हती. पण पुण्यातील त्रिशुंडय़ा गणपती मंदिर, टोके गावातील श्री सिद्धेश्वर मंदिर समूह ही दोन स्थळे मात्र याला अपवाद आहेत. तेथे भरपूर शिल्पे आहेत. त्यात पौराणिक कथा, सूरसुंदरी, व्याल-शरभासारखी शिल्पे आढळतात. मात्र यादवकाळात मंदिर शिल्पांएवढी नजाकत आणि वैविध्य त्यात नाही. पण यातीलच नुकतेच श्रीसिद्धेश्वर मंदिर पाहिले आणि थक्क व्हायला झाले.
टोके गावाजवळ नदीकाठी बांधलेले खणखणीत चिरेबंदी घाट, त्यावरील चार शिलालेख, तटबंदीसारखा प्रकार भिंतीत शिवमंदिर- देवीमंदिर व विष्णूमंदिरांची दगडी बांधणी, त्यावरील असंख्य शिल्पे, वसई विजयाचं प्रतीक असणारी पोर्तुगीज घंटा हे सारं पाहायला स्थानिकांशिवाय अन्य फारशी माणसं इथे येत नाहीत, कारण हे ठिकाण फारसं परिचितच नाही. विष्णुमंदिराशेजारची महिरपी कमानदार ओवरी तर पाहता क्षणीच खिळवून ठेवते.
तीन मंदिरांच्या या समूहातील मध्यवर्ती आणि मोठे देऊळ आहे श्रीसिद्धेश्वराचे. त्या पूर्वाभिमुख मंदिराची रचना गाभारा आणि १२ स्तंभांनी तोललेलं अंतर्गोल भव्य घुमटकाकृती छत. स्तंभांदरम्यान असलेली कक्षासने म्हणजे बसण्याचे कट्टे, आपलं लक्ष अंतर्गोल घुमटावरच्या अष्टदिकपालांकडे वेधतात. गाभाऱ्यात मोठे शिवलिंग, त्यावरचा पितळी नाग, पाठभिंतीतील पार्वती मूर्ती हे सारे पाहण्यासारखे.
या मंदिराच्या बाह्य़ भिंतीवर पौराणिक कथांमधील देखणी शिल्प आहेत. श्री गणेशाचं पादप्रक्षालन करणारी भक्त स्त्री, हत्तीवर अंबारीत बसून सिद्धेश्वर मंदिराकडे आलेले नानासाहेब पेशवे, मत्स्य- कूर्म- वराह- नृसिंह- परशुराम रामकृष्ण आदींच्या शिल्पांनी हा भाग नटलेला आहे. श्री मारुतीरायांनी केलेलं भीमाचं गर्वहरण अशी असंख्य शिल्पे पाहताना वेळ कसा जातो, हेच लक्षात येत नाही.
अतिशय वेगळ्या पद्धतीचा तळविन्यास (ग्राऊंड प्लॅन) असणार हे पाचकोनी चांदणीसारखं श्री गजरादेवीचे मंदिर निश्चितपणे आगळं वेगळं आहे. या मंदिराची ही रचनाच कोडय़ात टाकते. अतिशय देखणे खांब व प्रमाणबद्ध महिरपी यांनी बनलेलं उघडय़ा सभामंडपाचं प्रवेशद्वार; वेगळय़ा धाटणीची देवकोष्ठे (कोनाडे) व त्यावरील छोटी शिल्पे निरखून पाहिली तर ओळखून येतात. तारकाकृती आकाराच्या चार पाकळ्यांवर बाहेरच्या बाजूने ८-१० देवी शिल्प सप्तमातृकांमधील मूर्तीची आठवण करून देतात. त्याच्या कळसाकडील भागांवर वेगवेगळ्या अवस्थेतील गजशिल्पे आवर्जून पाहण्याजोगी.
या नंतर शेजारच्या विष्णू मंदिराकडे वळायचे. इथले उंच शिखर, उघडय़ा सभामंडपाच्या तीन देखण्या कमानी आणि तेथील छतावरचं नाजूक कोरीव काम लक्ष देऊन पाहण्याजोगे आहे. गाभाऱ्यात मध्यवर्ती जागी त्रिविक्रम विष्णूची काळ्या दगडातील प्रतिमा आणि थोडी बाजूला असणारी पांढऱ्या संगमरवरी दगडातील आयुधज्ममाची अधोक्षज विष्णू प्रतिमा अशी जोडी आहे. मंदिराबाहेर थोडय़ा अंतरावर एक गरुडमूर्ती हात जोडून बसलेल्या अवस्थेत आहे. तिच्या पाठीशी एक शेंदूरचर्चित हनुमान मूर्तीही आहे. याही मंदिराच्या बाह्य़ांगावर चतुर्भूज देवांचं त्यांच्या वाहनांसह केलेलं चित्रण थोडय़ा अभ्यासू वृत्तीनंच पाहायला हवं.
श्रीसिद्धेश्वर मंदिर समूहाच्या पूर्वेकडील दाराशेजारील छोटय़ा ओवरीत एक मोठी घंटा टांगलेली आहे. तीन कडय़ांची ही वजनदार घंटा साखळदंडांनी छताला लटकवली आहे. या घंटेच्या दर्शनी भागावर कोणतीही चिन्हे नाहीत. परंतु त्याच्या भिंतीकडील बाजूवर १७३० हा निर्मिती वर्षांचा आकडा, वैशिष्टय़पूर्ण क्रॉस आणि मदरमेरीचं शिल्पांकन दिसते. या मंदिरसमूहाच्या उत्तर प्राकारभिंतीत दिवे ठेवण्यासाठी छोटे कोनाडे केले आहेत.
जायकवाडी प्रकल्पामुळे इथला बराच भाग जलफुगवटय़ात बुडून जातो. त्यातच इथली काही मंदिरे, नदीकाठचे देखणे दगडी घाट हे सारं पाण्याखाली असतं. या वर्षी धरणातील पाण्याचा साठा कमी असल्याने, ते सारं पाहता येऊ शकेल. या घाटांची उभारणी वेगवेगळ्या मंडळींनी केली, त्याची माहिती तेथील चार शिलालेखांमुळे मिळते. शक्य झाले तर श्री. गौतमेश्वर, श्री संगमेश्वर, श्री हरेश्वर ही छोटी मंदिरे, नदीपल्याडचे श्री मुक्तेश्वर आणि श्रीरामेश्वराचे मंदिर अशी इतर मंदिरेही पाहता येतात.
महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर स्थान येण्याची योगता असणारा श्रीसिद्धेश्वर मंदिर समूह आज तरी उपेक्षेच्या गर्तेत ढकलला गेला आहे. वेळात वेळ काढून हा अठराव्या शतकातील शिल्पांकित मंदिरांचा ठेवा पाहायलाच हवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– प्र. के. घाणेकर

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on sidheshwar temple
First published on: 19-11-2015 at 06:53 IST