ट्रेकला जाणाऱ्या बहुतेकांच्या ‘सॅक’ला काळय़ा रंगांच्या काही भेंडोळय़ा अडकवलेल्या दिसतात. या गुंडाळय़ा म्हणजेच ‘कॅरीमॅट’! भटक्यांची ही लाडकी पथारी!
डोंगरदऱ्यांतील भ्रमंती ते हिमालयातील मोहिमा या सर्व पाऊलवाटांवर कुठल्याही साधनसाहित्यामागे एकच नियम-निकष असतो. तो म्हणजे, ‘कमीत कमी वजन-आकार, सोपी हाताळणी, जास्तीत-जास्त उपयुक्तता आणि टिकाऊ अंगभूतपणा’ या साऱ्यांतूनच एकेक वस्तू इथे ठरत-बनत जाते. यातूनच जाडजूड कापडी अंथरूणासाठी पर्याय म्हणून ‘कॅरीमॅट’ पुढे आले. कॅरीमॅट म्हणजे खरेतर ‘फोर्म’पासून बनवलेली एक पट्टी. ‘फोर्म’च्या या असंख्य छोटय़ा-मोठय़ा गोळय़ांपासून ही अखंड पट्टी तयार होते. अशा या ‘फोर्म’पासून बनवलेल्या पट्टीमुळे जमिनीतील गारठा तर लागत नाहीच पण गादीप्रमाणे मऊशार अंथरूणही मिळते. या कॅरीमॅटचे वजन अतिशय कमी आणि ती वागवायलाही सोपी असते. गुंडाळी करत ‘सॅक’ला अडकवले की झाले. साधारणपणे एका व्यक्तीचा विचार करत २ फूट रूंद आणि साडेसहा फूट लांबीच्या कॅरीमॅट सध्या बाजारात उपलब्ध आहेत. याची किंमत १०० ते १४०० रुपयांपर्यंत आहे. ‘फोर्म’च्या दर्जानुसार ही किंमत बदलत जाते. साधारणत: बहुतेक कॅरीमॅट या काळय़ा रंगात उपलब्ध असल्या तरी अन्य रंगातही त्या मिळतात. हिमालयासारख्या बर्फाळ भागात वापरण्यासाठी या ‘कॅरीमॅट’ऐवजी ‘एअर मॅटरेस’चा वापर केला जातो. हवेने भरलेल्या या ‘मॅटरेस’ बर्फात उपयुक्त ठरतात. यांची किंमत मात्र साध्या ‘कॅरीमॅट’ पेक्षा जास्त असते. डोंगरदऱ्यात फिरताना ‘कॅरीमॅट’ला झाडांच्या फांद्या,काटे याच्यापासून वाचवावे लागते. अन्यथा त्या फाटतात. यासाठी ‘कॅरीमॅट’ सॅकला कायम उभ्या बांधाव्यात असा सल्ला दिला जातो. अशी ही कॅरीमॅट; ट्रेकला जायचे म्हटले की भटक्यांची ही लाडकी पथारी सोबत असलीच पाहिजे.
(अधिक माहितीसाठी मुफी लोखंडवाला (९८२२३९७७४१) यांच्याशी किंवाwww.gypsytents.com या संकेतस्थळाला  भेट द्या.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Backpack for trekkers
First published on: 02-04-2014 at 08:37 IST