कोसळणारा धबधबा..आणि आनंद घेणारा फक्त आपला गट! असा अनुभव फार थोडय़ा ठिकाणी घेता येतो. ट्रेकिंगची, त्यातही पावसाळी भटकंतीची अनेक स्थळे गर्दी, गोंगाटात बुडालेली असतात. प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच जागोजागी पडलेला असतो. मात्र, नाशिक जिल्ह्य़ातील इगतपुरी परिसरात अजूनही काही भन्नाट ठिकाणे आहेत, जी गर्दीपासून अद्याप दूर आहेत. येथील विहीगावनजीकचा अशोका धबधबा हे असेच एक मुद्दाम अनुभवण्याजोगे ठिकाण. ‘सम्राट अशोका’ या चित्रपटाचे चित्रीकरण इथे झाल्याने हा धबधबा त्या नावावरून ओळखला जातो. या धबधब्याकडे जाणारी पायवाट अजून मळलेली नाही. त्यामुळे जरासे हुडकत गेल्यास या धबधब्याच्या कल्लोळाची मजा लुटता येते. हा कल्लोळ अंगावर घेण्याचा अनुभव प्रत्यक्षच घ्यायला हवा. कुटुंबासह तो घेतला तर त्याचा आनंद आगळाच ठरेल.
या धबधब्याशिवाय इगतपुरीत मुक्काम करून वा एक दिवसाची ट्रिप करून बघण्यासारखे बरेच काही आहे. हिरव्यागार निसर्गाच्या साथीने वसलेले जगप्रसिद्ध विपश्यना केंद्र इथेच आहे. तेथे जाऊन शांततेची ओळख करून घेता येते. गर्दीने गजबजणाऱ्या भावली धरणासह बरीच ठिकाणे वर्षांसहल काढून पाहण्यासारखी आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मदतही त्यासाठी गरजूंना घेता येईल. इगतपुरीला जे गेले नाहीत त्यांनी अवश्य एकवार जावे. विहीगावनजीकचा अशोका धबधबा, धरण, इथली हिरवाई आणि विपश्यना आश्रमाची अनुभूती घ्यावी. तुमच्या उत्साहाला आनंदाची लय नक्की सापडेल.