खोपोलीहून पनवेलकडे जाऊ लागलो, की उजव्या हाताला एक सुळका असलेला डोंगर सगळय़ांचेच लक्ष वेधून घेतो. इर्शाळगड असे या गिरिदुर्गाचे नाव. पुणे-मुंबई महामार्गावरील चौक गावातून या गडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. पायथ्याशी इर्शाळवाडी नावाचे गाव आहे. या गावातून दोन तासात आपण गडमाथ्यावर पोहोचतो. चौकीवजा ठाणे असलेल्या या गडावर नेढे आहे. हे नेढे म्हणजे इर्शाळची जणू खिडकीच. या गडावरून कर्नाळा, प्रबळगड, माणिकगड, माथेरान असा मोठा मुलुख दिसतो. इर्शाळगडचा सुळका चढण्यासाठी मात्र गिर्यारोहणातील तंत्र अवगत असणे आवश्यक आहे.