स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या प्रभावळीमध्येही सोनगड, चांभारगड, पन्हाळघर, दौलतगड अशाच अनेक लहान किल्ल्यांची वर्णी लागलेली आहे. याच रायगड जिल्हय़ातल्या माणगाव तालुक्यातल्या निजामपूर गावाजवळ एक अतिशय लहानसा किल्ला आजूबाजूच्या सहय़ाद्रीच्या अजस्र डोंगररांगांच्या भाऊगर्दीत आपले स्थान अढळपणे टिकवून उभा आहे. ज्या किल्ल्यामुळे या तालुक्याला माणगाव हे नाव प्राप्त झाले त्या नावाचे उगमस्थान असलेला हा एक अतिशय सुंदर दुर्ग म्हणजे किल्ले मानगड.
मानगडाला भेट देण्यासाठी पुण्याकडच्या ट्रेकर्सनी ताम्हिणी घाटातून माणगावच्या रस्त्यावर असणारे निजामपूर गाव गाठावे (रायगडाच्या पायथ्याला असलेले छत्री निजामपूर आणि हे निजामपूर ही दोन वेगळी गावे आहेत). मुंबईकडच्या दुर्गप्रेमींनी मुंबई-गोवे महामार्गावरच्या माणगाव माग्रे १० कि.मी.वर असलेल्या निजामपूरमध्ये दाखल व्हावे. या निजामपूर गावातून रायगड पायथ्याच्या पाचाड गावात एक रस्ता गेला आहे. या रस्त्याने आपण जाऊ लागलो, की वाटेत बोरवाडी हे छोटे गाव असून त्याच्याच पुढच्या मशिदवाडीतून गडावर प्रशस्त पायवाट गेली आहे. निजामपूर ते मशिदवाडी या संपूर्ण रस्त्यावर मानगडाचा रस्ता दाखवणारे मार्गदर्शक फलक बसविण्यात आले आहेत. निजामपूर गावातून मानगडावर जाण्यासाठी प्रशस्त पायवाट असून, या वाटेने सुमारे पंधरा-वीस मिनिटे सोपी चढण पार केली, की गडाच्या अध्र्यावर असणारे िवझाईदेवीचे कौलारू मंदिर आहे. िवझाई मंदिराच्या जवळच दगडात कोरलेल्या दोन मूर्ती असून शेजारीच एक छोटी दगडी दीपमाळ आहे. िवझाई मंदिरापासून गडाकडे नजर टाकली, की दोन भक्कम बुरुजांच्या मध्ये बंदिस्त झालेला, पण कमान हरवलेला गडाचा दरवाजा दिसतो. मंदिरापासून खोदीव पावटयांच्या मार्गाने पाच मिनिटांत आपण गडाच्या दरवाजात येऊन पोहोचतो. मानगडाच्या या मुख्य दरवाजापासून डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन वाटा फुटल्या आहेत. मुंबईच्या ‘दुर्गवीर’ संस्थेने गडाच्या संवर्धनाचे काम हाती घेतले असून, गडाच्या मूळ वैभवाला धक्का न लावता त्यांनी गडाला नवीन रूप प्राप्त करून दिले आहे. याच संस्थेने संपूर्ण गडावर अवशेषांची दिशा दाखवणारे फलक बसवले आहेत. मानगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराची कमान जवळच असून त्याच्यावर मासा आणि कमळाच्या फुलाचे शिल्प कोरलेले आहे. मुख्य प्रवेशद्वारातून डावीकडे गेल्यास समोरच एक धान्य कोठारसदृश खोली आहे. या कोठाराच्या बाहेर एक व समोरच्या बाजूला एक अशी पाण्याची दोन टाकी आहेत. इथून आपण सरळ गेलो, की गडमाथ्याचा मार्ग दाखवणारी एक पाटी असून तिथून काही खोदीव पावटयांच्या अतिशय सोप्या मार्गाने केवळ दोन ते तीन मिनिटांत आपण थेट गडमाथ्यावर दाखल होतो. मुख्य दरवाजातून उजवीकडे जाणारी पायवाटही आपल्याला गडमाथ्यावरच घेऊन जाते, पण उतरताना त्या बाजूने उतरल्यास चहूबाजूंनी किल्ला बघता येऊ शकतो. गडमाथ्यावर एक ध्वजस्तंभ असून जवळच पाण्याची दोन टाकी आहेत. पायथ्याच्या मशिदवाडी गावाचे तसेच मानगडाशेजारच्या कुंभ्या घाटाजवळच्या धन्वी शिखरांचे अतिशय विहंगम दृश्य या ध्वजस्तंभापासून दिसते.
ध्वजस्तंभापासून आपण गाव डावीकडे ठेवत पुढे गेलो, की मानगडावरच्या काही जोत्यांचे अवशेष आहेत. हे अवशेष पाहून पुढे गेल्यास डावीकडे एक पिराचे स्थान असून त्याच्यासमोर विस्तीर्ण पटांगण आहे. इथे जवळच अजून काही भग्न जोती आपल्याला बघायला मिळतात. मानगडाचा माथा अतिशय लहान असून साधारणपणे अध्र्या-पाऊण तासात आपला गडमाथा व्यवस्थित पाहून होतो. उतरताना आपण आलो त्याच्या विरुद्ध बाजूने उतरायला सुरुवात केली, की आपण पुन्हा मुख्य दरवाजाच्या जवळ येतो. पण पुन्हा किल्ला उतरायला सुरुवात करण्याच्या आधी थोडे थांबा, कारण मानगडाचे मुख्य आकर्षण असलेला चोर दरवाजा इथूनच पुढे गेल्यावर आहे. गडमाथा थोडासा उतरून आपण पुन्हा निजामपूरच्या दिशेने जाऊ लागलो, की उजवीकडे पाण्याच्या खोदीव टाक्यांची मालिकाच आहे. या वाटेने आपण सरळ पुढे गेलो की मग अखेरीस नजरेस पडतो तो गडाचा छोटा, पण अतिशय देखणा चोर दरवाजा! दुर्गवीरच्या सदस्यांना गडाच्या या बाजूला काम करत असताना काही पायऱ्या आढळून आल्या. उत्सुकता शिगेला पोहोचून त्यांनी त्या भागातील माती दूर केल्यानंतर जमिनीत पूर्णपणे गाडला गेलेला दरवाजा त्यांना सापडला आणि मानगडाचे आणखी एक वास्तुवैभव प्रकाशात आले. मानगडाच्या या चोरदरवाजाला व्यवस्थित पायऱ्या असून स्थानिकांच्या मते इथून खाली उतरणारी वाट चाच या गावी जाऊन पोहोचते. मानगडाचे हे नुकतेच अभ्यासकांच्या नकाशावर आलेले वैशिष्टय़ आपण बघायच आणि माघारी फिरून महादरवाजा गाठायचा. मानगड हा किल्ला म्हणजे वर्षभरात कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही समयी भेट देण्याचा एक उत्कृष्ट पर्याय असून वर्षांकाळी हिरवाईने बहरलेल्या आणि ढगांच्या पुंजक्यात हरवलेल्या सहय़ाद्रीला आडवाटेवरून बघायचे असेल तर मानगडाला पर्याय नाही. कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त दृष्टसुख देणाऱ्या या सुंदर किल्ल्याला तर आवर्जून भेट द्यावीच, पण माघारी येताना डावीकडे वाटेवर लागणारे पुरातन, परंतु भग्न शिवमंदिरही न चुकता नजरेखालून घालावे. मंदिराच्या सुमारे तीन फुटांच्या चौथऱ्यावर एक भव्य आकाराचा नंदी असून जवळच शिविलग आहे. मंदिराच्या शेजारच्या जागेतच अनेक विरगळी उघडय़ावर ठेवलेल्या आहेत. रायगडाच्या दर्शनाला जाताना त्याचा हा छोटेखानी संरक्षक आडवाटेला आपलेसे केल्याचे परिपूर्ण समाधान प्रत्येक गिर्यारोहकाला मिळवून देतो हे मात्र नक्की!
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2013 रोजी प्रकाशित
छोटेखानी मानगड
महाराष्ट्रात अनेक असे किल्ले आहेत, की जे ‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’ या प्रकारात मोडतात. आकाराने आणि विस्ताराने अगदी नगण्य असूनही त्यांचे भौगोलिक किंवा ऐतिहासिक महत्त्व तिळमात्रही कमी होत नाही.

First published on: 03-04-2013 at 02:07 IST
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangad fort