उन्हाळ्याच्या दिवसात गड भ्रमंतीस निघताना, डोक्यावर तळपणारा सूर्य व समोर न संपणारी चढण दिसू लागते आणि मग गिर्यारोहणाचा बेतच रद्द करावा लागतो. अशावेळी सागरी किल्ले पाहणे तसे सोयीस्कर असतात. मुंबई-पुणे परिसरातील किल्ल्यांवर गिर्यारोहकांच्या अनेक वाऱ्या झाल्या असतील पण परवानगीवाचून त्यांना खांदेरी व उंदेरीवर जाणे शक्य होत नव्हते. ‘जिद्द’ मासिकाच्या वतीने या दोन्ही जलदुर्गाच्या भेटीची मोहीमचे आयोजन केले आहे.
खांदेरी बेटावर १६७२ मध्ये शिवाजीराजांनी किल्ला बांधायला घेतला. तोपर्यंत इंग्रजांनी मुंबई बेटावर आपले बस्तान बऱ्यापैकी बसवलं होतं. त्यांनी या किल्ल्याचा उपयोग त्यांच्यावर वचक बसवण्याकरिता होईल हा धोका ओळखून, या किल्ला बांधणीस जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मराठय़ांनी तात्पुरती माघार घेतली. १६७९ मध्ये महाराजांनी पुन्हा खांदेरीचा ताबा घेऊन किल्ला बांधणीस सुरुवात केली. परत इंग्रजांनी विरोध करण्यास सुरुवात केली. पण मराठय़ांनी दाद तर दिली नाहीच. उलट मराठय़ांच्या आरमारांनी इंग्रजांच्या आरमारावर हल्ला केला. या आरमार युद्धात इंग्रजांचं एक जहाज मराठय़ांना मिळालं. शेवटी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. जंजिऱ्याच्या सिद्धी कासम या हबशी नवाबालाही शिवाजीराजांचं वर्चस्व मान्य होणार नव्हतं. त्यानं १६७९-८० दरम्यान खांदेरीवर हल्ला करता करता उंदेरी बेटच बळकावलं. लगोलग त्यानं उंदेरीवर किल्लाही बांधला. हा उंदेरी किल्ला घेण्याचा प्रयत्न मराठय़ांनी बऱ्याच वेळा केला, पण त्यांना त्यात यश आलं नाही. पुढे १७६० मध्ये पेशव्यांनी उंदेरी मिळवला.  खांदेरी किल्ल्यावर १८९१ सालातील मोठी घंटा पाहावयास मिळते. या बेटावर १८६७ मध्ये पोर्तुगीजांनी बांधलेले दीपगृह आहे. लोखंडाचा आवाज करणारा एक दगड आहे. गडावर महादेव,एकवीरा, गणपती, मारुती, बुद्धविहार, क्रूस अशी अलीकडे बांधलेली धर्मस्थळं आहेत. गडावर काही तोफा आहेत. उंदेरी किल्ल्यावर उतरण्याकरिता पूर्ण ओहोटी असताना ईशान्येस पुळणीत घुसून अथवा तटाला भिडून बोट लावावी लागते. दरवाजा बऱ्यापैकी शाबूत असून धक्क्य़ाच्या जवळच एक छोटंसं लेणं आहे. अशा या दोन्ही जलदुर्गावर भ्रमंतीचा बेत पनवेलच्या ‘जिद्द’ तर्फे शनिवार १७ मे रोजी आयोजित केला आहे. अधिक माहितीसाठी सुनील राज, पनवेल (९८६९३३१६१७) यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mission of khanderi underi
First published on: 14-05-2014 at 07:46 IST