पाऊस सुरू झाला, की भटक्या मंडळींना गड किल्ल्यांचे वेध लागतात. पावसाळ्यातल्या जवळजवळ प्रत्येक ‘वीक एंड’ला ही मंडळी सह्य़ाद्रीच्या कुशीत रमतात. याच दिवसांत दरवर्षी मुंबई सीएसटीहून कर्जत कसाऱ्याकडे जाणारी शेवटची लोकल पकडून ट्रेकिंगला जाणारे आम्ही ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळा’ चे भटके या वर्षीही निघालो. पनवेलला पोहोचेपर्यंत रात्रीचे अडीच वाजले होते. पनवेल स्थानकावरच सरकारी पंख्याची हवा घेत अडीच ते पहाटे साडेचार, कुणी गप्पांचा फड रंगवला, कुणी झोपेच्या अधीन झाले होते. पहाट होताच पनवेल एसटी स्थानक गाठले आणि एसटीने ठाकूरवाडी गाठली. गावातील ‘ब्लॅक टी’ आणि एका वाटाडय़ाला सोबत घेत ‘हर हर महादेव’ करीत आम्ही प्रबळगडाकडे प्रयाण केले.
ठाकूरवाडी हे गाव डोंगराच्या ९० अंश कोनात! उंचच उंच डोंगरकडय़ाचा वरचा भाग धुक्यामुळे दिसत नव्हता. काळ्या पहाडाला शुभ्र धुक्यांनी अर्धवट का होईना पांघरलेली चादर डोळ्यांना सुखावत होती.
 डोंगर चढणे सुरू झाले. साधारण दीड तासात एका माचीवर पोहोचलो. गडाकडे जाणाऱ्या पायवाटा फसव्या असल्यामुळे आणि दाट जंगल असल्यामुळे वाटाडय़ा बरोबर घेणं कधीही सोयीस्कर अन्यथा जंगलात चुकणं जिवावर बेतू शकतं. माचीवर पोहोचत असताना वाटेत गणपती आणि मारुतीच्या मूर्तींचे दर्शन घेतले.
माचीवरून गडाकडे निघताच भोवतीचे जंगल आणखी दाट झाले.  काही ठिकाणी अंधार पडल्यासारखं वाटत होतं. तीव्र चढण असल्यामुळे खूप काळजीपूर्वक चढावे लागत होते. गडावर पोहोचेपर्यंत तीन-सव्वातीन तास गेले. गडावर पोहोचल्यानंतर कलावंतिणीच्या बुरुजाचे दर्शन घेण्यासाठी २०-२५ मिनिटे चालावे लागतं. गडावर छोटंसं स्वच्छ पाण्याचं काळ्या दगडात खोदलेलं तळं पाहायला मिळतं. या गडावर अतिशय दाट गवत असून सुंदर नागमोडी पायवाट आहे. गडावर पाण्याचं तळं आणि गणपतीची प्राचीन मूर्ती आहे. काही ठिकाणी तुटलेली तटबंदी या व्यतिरिक्त फारसं काही बघायला मिळत नाही.
प्रबळगड ऊर्फ मुरंजन हा किल्ला त्याच्या शेजारी असलेल्या कलावंतीण सुळक्यामुळे सहज ओळखता येतो. रायगड जिल्ह्य़ातील पनवेल तालुक्यात हा गड येतो. याची पायथ्यापासून उंची ४५० मीटर आहे. किल्ल्यावर फक्त पावसाळ्यात पाणी असते, इतर ऋतूत गडावर पाणी नसते. गडाच्या माथ्यावरून पूर्वेला पेबचा किल्ला आणि माथेरानचे पठार दिसते. पश्चिमेला पनवेल शहर तर उत्तरेला गाढेश्वर तलाव असून दक्षिणेला इर्शाळगड आणि पाताळगंगा नदी दिसते. गडावर राहण्याची व्यवस्था नाही.
या गडाचा फारसा इतिहास ज्ञात नाही. पण तो शहाजीराजांच्या ताब्यात असल्याची एक नोंद आहे. या दरम्यान १६३६ मध्ये शहाजीराजांना नमवण्याची जबाबदारी शहाजहानने जमानखानवर  सोपवली होती. त्याने शहाजीराजांच्या ताब्यातील किल्ले घेण्यास सुरुवात केली. शहाजीराजे मुरंजन ऊर्फ प्रबळागडावर आहेत अशी बातमी कळल्यावर तो तिथे पोहोचला. शहाजीराजे दुसऱ्या वाटेने निघून जाऊ लागले, त्याचवेळी मुघलांनी शहाजीराजांना गाठून त्यांच्या सैन्यावर हल्ला चढवला आणि गड जिंकून घेतला.
इसवी सन १८२८ मध्ये पुरंदर परिसरातील रामोशी लोकांनी ब्रिटिशांविरोधात बंड केले होते. त्या वेळी ३०० लोकांची टोळी तळकोकणात उतरली आणि त्यांनी याच प्रबळगडाचा आश्रय घेतला. या वेळी त्यांनी जाहीरनामा काढला, की त्यांच्या परिसरातील जनतेने ब्रिटिशांना वसूल देऊ नये. प्रबळगड भोवतीच्या भूगोलाच्या आश्रयाने या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना अनेक दिवस सळो की पळो करून सोडले.
या साऱ्या भूगोलात आजही फार फरक पडलेला नाही. प्रबळगडाच्या याच डोंगरदऱ्यातून इतिहासाचा हा अंश घेत आम्ही परतलो. झाडा-डोंगरांच्या दाटीतून माणसांच्या गर्दीत!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabalgad in greenery
First published on: 09-10-2013 at 09:20 IST