ट्रेक हा शब्द जरी उच्चरला तरी डोळ्यांपुढे अगदी सुरुवातीला येणारी वस्तू म्हणजे सॅक ऊर्फ पाठपिशवी! ट्रेक, गिरिभ्रमण, गिर्यारोहण किंवा कुठलीही जंगलभ्रमंती करताना बरोबरचे साहित्य हे अशा सॅकमध्ये भरले की, या आडवाटांवर चालणे सोपे, निर्धोक होते. चालताना दोन्ही हात रिकामे राहतात आणि पाठीवर समतल प्रमाणात विभागलेल्या वजनामुळे तोलही स्थिर राहतो. या साऱ्यांमुळेच ‘ट्रेकिंग’ मध्ये पायात बूट आणि पाठीवर सॅक पाहिजे असा जणू दंडकच बनला आहे.
‘सॅक’ चे ट्रेकिंग आणि अन्य भटकंतीच्या छंदाबरोबरचे हे नाते फार पूर्वीपासूनचे आहे. तिची रचना, उत्पादन, बनविण्यासाठीचे साहित्य, आकार यात कालपरत्वे बदल होत गेला आहे. बदलत्या काळाबरोबर या ‘सॅक’ जास्तीत जास्त भक्कम, वजनाला हलक्या, अधिकाधिक सुविधा देणाऱ्या अशा तयार होऊ लागल्या आहेत.
‘सॅक’ मधील एक गंमत अगदी सुरुवातीला सांगतो, जी ट्रेक करणाऱ्या मंडळींनाही फारशी माहिती नाही. जगातील सर्व ‘सॅक’चे आकारमान हे लिटरमध्ये मोजतात. एक दिवसासाठीची ‘सॅक’ अमूक लिटरची तर दोन-चार दिवसांची त्याहून जास्त लिटरची. ‘ब्रॅन्डेड सॅक’ची खरेदी-विक्री ही अशी लिटरच्या भाषेत सुरू असते.
‘सॅक’च्या उत्क्रांतीत कापड हा एक महत्त्वाचा घटक ठरला आहे. अगदी सुरुवातीच्या ‘सॅक’ या ‘कॅनव्हास’ पासून बनवलेल्या होत्या. पण मुळात या कापडाच्या अंगी वजन आहे. यातच हे कापड भिजल्यावर आणखी जड होते. यामुळे पुढे काही वर्षांतच या कापडाला नवनवे पर्याय शोधले गेले. सध्या बाजारात ‘नायलॉन फॅब्रिक’ पासून बनवलेल्या ‘सॅक’ आलेल्या आहेत. हे कापड एकतर वजनाला हलके असते आणि भिजून ते जडही होत नाही.
‘सॅक’ ची बांधणी, शिलाई देखील आता अधिक चांगल्या पद्धतीने केली जाते. गिर्यारोहणासाठी वापरल्या जाणाऱ्या जवळपास प्रत्येक सॅकसाठी आता पाठीशी कुशन्स असतात. बाजूचे कप्पेही (साईड पाऊचेस) आता काढघालीचे बून लागले आहेत. पूर्वी केवळ वरच्या दिशेने (टॉप लोिडग) काढघाल करता येणाऱ्या सॅकमध्ये आता समोरून (फ्रन्ट लोडिंग) देखील कुठलीही वस्तू काढता-घालता येते. यामुळे तळातील एखादी वस्तू काढण्यासाठी संपूर्ण सॅक रिकामी करावी लागत नाही.
भटकंतीच्या प्रकारानुसार आजकाल बाजारात ‘सॅक’ उपलब्ध असतात. भटकंतीचा कालावधी, गरज आणि प्रकार यानुसार सॅक बदलत जाते. या अशा वैशिष्टय़पूर्ण सॅकची माहिती पुढील भागात पाहुयात.
(अधिक माहितीसाठी मुफी लोंखडवाला (९८२२३९७७४१) यांच्याशी किंवा www.gypsytents.com या संकेतस्थळाला भेट द्या.)
  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sack
First published on: 05-02-2014 at 09:38 IST