धरणासारखा एखादा मोठा प्रकल्प झाला, की त्या भागाचा भूगोल सर्वार्थाने बदलतो. गावे उठतात, रहाळातील जुन्या वाटा बुडतात. नव्या रचना तयार होतात. हे सारे बदलण्यापूर्वी या भागात आपली पावले आणि नजर हिंडली असेल तर या बदलाच्या पाश्र्वभूमीवर चुकल्यासारखे वाटते. जुन्नरच्या पश्चिमेला माळशेज घाटालगत साकारलेल्या पिंपळगाव जोगे आणि खुबी बंधारा या दोन जलाशयांनी या भागाचा नकाशा असाच बदलला आहे. या बदललेल्या नकाशातच हरिश्चंद्रगडाच्या पायाचे खिरेश्वर गावही उठून वर डोंगरालगत आले आणि गावालगतचे प्राचीन शिल्पकलेचा ठेवा असलेले नागेश्वराचे मंदिर उपेक्षेचे धनी बनले.
पावसात भिजणारा-भिजवणारा माळशेज घाट सर्वाच्याच परिचयाचा आहे. या घाटाच्याच अलिकडे हा खुबी बंधारा आहे. या बंधाऱ्यावरून नाहीतर पिंपळगाव जोगे धरण ओलांडत, धरण काठाने या नव्या खिरेश्वर गावातील नागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचता येते. हरिश्चंद्रगडाकडे जाणारे बहुतेक जण या खिरेश्वरमधूनच पुढे जातात.
पुण्याहून आळेफाटामार्गे खिरेश्वरचे हे अंतर आहे साधारण दीडशे किलोमीटर. या खिरेश्वर गावाबाहेर असलेले नागेश्वर मंदिर सुरुवातीला लक्षातच येत नाही. पण त्याच्या जवळ पोहोचलो, की मग त्याची भव्यता आणि नंतर त्याची कोरीव दिव्यता ध्यानी येते.
नागेश्वराचे मंदिर पाहण्यापूर्वी त्याचा इतिहास थोडासा शोधला तर दहाव्या शतकातील एक वेगळीच गंमत आपल्यापुढे येते. या काळात या भागात शिलाहार वंशातील झंज नावाचा राजा राज्य करत होता. शिवभक्त असलेल्या या राजाने गोदावरी ते भीमा नदी दरम्यानच्या प्रमुख बारा नद्यांच्या उगमस्थानी बारा शिवालये उभारली. अत्यंत रेखीव आणि शिल्पकलेने समृद्ध अशी ही मंदिरे. याबाबतचा उल्लेख कोकणातील पन्हाळे येथे मिळालेल्या ताम्रपटात आला आहे, तो असा –
..ध्य: श्री झंझराजो दिवसकर इव ध्वस्तनि:
शेष दोष: शंभर्यो द्वादशोपि व्यरचयद
चिरा त्की तनानी स्वनाम्ना सोपानानी..
गोदावरी ते भीमा दरम्यानच्या या बारा नद्या आणि त्यांच्या उगमस्थळीची ही मंदिरे कुठे-कुठे आहेत- गोदावरी नदीचे त्र्यंबकेश्वरजवळ, वाकी नदीचे त्रिंगलवाडीत, धारणाचे -तऱ्हेळे, बामचे – बेलगाव, कडवाचे – टाकेद, प्रवरा नदीचे – रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळा – हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावती – खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीचे – पूरमधील कुकडेश्वर, मीना – पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीचे – वचपेतील सिद्धेश्वर आणि भीमा नदीचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यातच खिरेश्वरमधील या नागेश्वर  मंदिराचा समावेश आहे.
अंतराळ, गर्भगृह आणि कोरीव शिखर अशी रचना असणाऱ्या या मंदिराचा सभामंडप फार पूर्वीच कधीतरी ढासळला आहे. त्याजागी नव्याने कौलारू छताचा मंडप उभा केलेला आहे. परंतु, प्राचीन मंदिरालगतची ही रचना विजोड वाटते. या नव्या मंडपातून नंदीचे दर्शन घेत अंतराळात आलो की नागेश्वरची कोरीव श्रीमंती पुढे येते. विविध भौमितिक आकारातील स्तंभ, त्यांना छताशी दिलेले यक्षांचे आधार, भिंतीतील देवकोष्ठे आणि विविध निसर्ग रुपकांनी सजलेले गर्भगृहाचे कोरीव द्वार आपले लक्ष वेधून घेते. यातील दरवाजावरील शिल्पकाम पाहात असतानाच लक्ष जाते ते दरवाजाच्यावर असलेल्या एका मोठय़ा आडव्या शिल्पपटाकडे! शेषशाही विष्णूचा हा देखावा. तब्बल पाच फूट लांबीचा. शेषावर विराजमान झालेला विष्णू आणि त्याचे पाय चुरणारी लक्ष्मी! उठावातील हा देखावा डोळय़ांत साठवत असतानाच याच अंतराळाच्या छताला आणखी सोळा शिल्पपट दिसतात आणि आपण आश्चर्यचकितच होतो. रेखीव नक्षीच्या सोळा चौकोनांमध्ये हे शिल्पपट कोरलेले, जडवलेले.
विविध वैदिक देव-देवता, त्यांचे गण, वाहने, आयुधे अशा साऱ्यांचे हे शिल्पपट. एकेक करत हे शिल्पपट पाहू लागलो, की मग त्यांची ओळख पटत जाते. मूषकवाहन गणेश-गणेशानी, वृषभवाहन शिव-पार्वती, हंसवाहन ब्रह्म -सरस्वती, मयूरवाहन स्कंद-षष्टी, नरवाहन कुबेर -कुबेरी, मकरवाहन मदन-रती..जणू सारा स्वर्गलोकीचा देखावा पुढय़ात उलगडू लागतो.
हे सर्व शिल्पपट कोरीव-रेखीव तर आहेतच; पण त्याहून ते दुर्मिळही आहेत. दुर्लक्ष-उपेक्षेनंतरही आज हा सर्व ठेवा सुदैवाने अद्याप शाबूत आहे. त्याला वेळीच संरक्षण देत तसेच त्याची माहिती आणि महत्त्व इथे लावले जाणे आवश्यक आहे.
गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. याबरोबरच परिसरातही काही शिवलिंगे, वीरगळ, कोरीव अवशेष पडलेले दिसतात. मंदिराच्या आतील बाजूस दिसणारे शिल्पकाम बाह्य़ अंगावर फारसे दिसत नाही. पण यातही पाठीमागच्या बाजूच्या भिंतीत एका कोष्टकात विहार करणाऱ्या देवतेची मूर्ती दिसते. तिच्या पायाखाली पुन्हा वादन-कलेतील तीन छोटय़ा प्रतिमा दाखवल्या आहेत. या संपूर्ण मूर्तीचा ताल आणि तोल थक्क करणारा आहे.
नागेश्वराचा हा सारा कोरीव देखावा पाहताना ते मंदिर जागोजागी मोडकळीस आल्याचे जाणवते. अनेक चिरे, शिल्पपट सरकले आहेत. हा सारा डोलारा वेळीच दुरुस्त न केल्यास तो कधीही कोसळण्याचा धोका आहे. पुरातत्त्व आणि पर्यटन विभागांनी आपल्या कार्यालयाबाहेर पडून अशा मंदिरांचे तातडीने सर्वेक्षण करत त्यांचे जतन, संरक्षण करायला हवे. खरेतर या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या साहाय्याने हे मंदिर व्यवस्थितरीत्या आहे तसे पुन्हा उभारता येईल. धरणाकाठी या मंदिराभोवती एखादे उद्यान फुलवता येईल, ज्यातून एखादे शांत, पवित्र, रमणीय स्थळ तयार करता येईल. एका गौरवशाली इतिहासाचे जतन होईल आणि खऱ्याखुऱ्या पर्यटनाचा विकास होईल. पण त्यासाठी तशी दृष्टी, इच्छाशक्ती हवी ..खरी शोकांतिका इथेच कुठेतरी आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trek it desolate nageshwar of khireshwar
First published on: 25-12-2013 at 12:10 IST