विवाहित महिलांच्या कौमार्य चाचणीवरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कंजारभाट समाजात रुढ असणाऱ्या या प्रथेला विरोध करण्यासाठी याच समाजातील काही तरुण पुढे येत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना समाजातून मोठा विरोध पत्करावा लागत आहे. मागील आठवड्य़ातच पुण्यातील येरवडा भागात राहणाऱ्या काही तरुणांना या विषयाबाबत जनजागृती करत असल्याच्या कारणावरुन मारहाण करण्यात आली. या समाजातील विविध वयोगटातील मुली आणि महिला या प्रथेच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी पुढे आल्या आहेत. त्यांच्याच समाजातून त्यांना या जनजागृती करण्यावरुन विरोध होताना दिसत आहे. असे असतानाही याच समाजातील ९० वर्षांच्या जनाबाई इंदरेकर या प्रथेच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत.

आपल्या पिढीने ज्याप्रमाणे भोगले तसे येणाऱ्या पिढीला भोगायला लागू नये या भावनेने पुण्यातील जनाबाई वयाच्या ९० व्या वर्षी या प्रथेच्या विरोधात भूमिका घेत आहेत. मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार जनाबाई सांगतात, १४ व्या वर्षी लग्न झालं तेव्हा नुकतीच मासिक पाळी सुरु झाली होती. आधी २ वेळा लग्न झालेल्या व्यक्तीशी आपलं लग्न होत आहे इतकीच माहिती होती. लग्न झाल्यावर रात्री नवऱ्यासोबत झोपले आणि सकाळी उठून पाहते तर बेडशीटवर रक्त दिसलं. नवऱ्यानी आपल्याला मारलं असेल म्हणून ते रक्त पाहून मी रडायला लागले. मला अशा अवस्थेत पाहून माझे पती खोलीबाहेर निघून गेले आणि कुटुंबातील एक ज्येष्ठ महिला खोलीत आली. तिने बेडशीट पाहिली आणि बाहेर जाऊन आनंदाने ओरडली, माल खरा आहे. ही आठवण वयाच्या ९० व्या वर्षीही जनाबाईंना जशीच्या तशी आठवते.

लग्न झालं की त्या रात्री नवा नवरा पांढरीशुभ्र चादर घेऊन नवी नवरी असलेल्या खोलीत जातो. बिछान्यावर ही चादर पसरली जाते. शरीरसंबंध झाला की त्या चादरीवर रक्ताचा डाग पडणं सक्तीचं. (ते झालं नाही की ती नवी नवरी ‘खोटी’.) जे काही असेल ते घेऊन तो नवरा मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीच्या बाहेर येतो. पंच मंडळी निवाडय़ाला बसलेलीच असतात. आजही एकविसाव्या शतकात अशाप्रकारे स्त्रीचे कौमार्य तपासण्याची हा पद्धत रुढ आहे. मात्र त्याचा विरोध करण्यासाठी कंजारभाट समाजातील काही तरुण मुली आणि महिला लढत आहेत. इतकेच नाही तर ९० वर्षांच्या जनाबाईही या सगळ्याचा विरोध करण्यासाठी आज ठामपणे उभ्या आहेत. समाजातील ज्येष्ठ असूनही त्यांचा या प्रथेला विरोध आहे हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.