पबजी या गेमच्या नादात एका १६ वर्षीय मुलाला जीव गमावावा लागल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. या मुलाला पबजी गेमचे व्यसन लागलं होतं. मागील अनेक दिवसांपासून तो केवळ गेम खेळत होता. त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला.

लॉकडाउनमुळे हा मुलगा मागील अनेक महिन्यांपासून घरीच होता. मात्र घरी वेळ घालवण्यासाठी त्याने ऑनलाइन गेम खेळण्यास सुरुवात केली आणि त्याला या गेमचे व्यसनच लागले. तो पबजी गेम खेळू लागल्यानंतर तर त्याने गेमसाठी अन्न पाण्याचाही त्याग केला. गेम खेळण्याच्या नादात तो अनेक दिवस जेवायचाही नाही, असं इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

गेमच्या नादात योग्य प्रमाणात पाणी न पिणं आणि जेवण टाळणं किंवा वेळेत जेवण न घेतल्याने या मुलाची प्रकृती बिघडली. त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आणि त्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला इलूरूमधील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डायरिया म्हणजेच शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण सतत कमी होत गेल्याचे त्याची प्रकृती आणखीन खालावली आणि उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला.

यापूर्वीही अशाप्रकारे पबजी गेमच्या व्यसनामुळे २५ वर्षीय मुलाला प्राण गमावावे लागल्याची घटना पुण्यात घडली होती. गेम खेळता खेळता तरुणाला ‘मेंदू घाता’चा (ब्रेन स्ट्रोक)  झटका आला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पुण्यात मरण पावलेल्या या मुलाचे नाव हर्षल मेमाने असं होतं. गेम खेळताना अचानक हर्षलला आपल्याला उजवा पाय किंवा हात हलवता येत नसल्याचं जाणवलं. त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होता. तिथे त्याच्या मेंदूवर सतत गेम खेळल्याने गंभीर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यातच उपचारादरम्यान त्याला मृत्यू झाला.

पबजी गेम हा दक्षिण कोरियामधील कंपनीने विकसित केला असला तरी त्यामध्ये चीनमधील टेनसेंट या कंपनीचा मोठा वाटा आहे. हा गेम खेळणाऱ्याला व्यसन लागल्यास त्याच्या वागणूकीमध्ये मोठा बदल होत असल्याचे अनेक घटनांमधून वेळोवेळी दिसून आलं आहे.