केरळमधील एका महिलेचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यामध्ये महिला एका दृष्टीहीन व्यक्तीला सार्वजनिक वाहतूक सेवेच्या बसमध्ये बसवण्यासाठी धडपड करताना आणि त्यासाठी अगदी धावत जाऊन बस थांबवताना दिसत आहे. सुप्रिया नावाच्या या महिलेने केलेल्या मदतीचे स्तरातून कौतुक झालं असून आता तिच्या या कामासाठी तिला तिच्या बॉसने थेट घर भेट दिलं आहे.

अल्लूका ग्रुपचे अध्यक्ष जॉय अल्लूका यांनी या महिलेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर थेट तिच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. जॉय हे सुप्रिया आणि तिचे कुटुंब राहत असलेल्या भाडे तत्वावर घेतलेल्या घरी पोहचले. त्यांनी तोंड भरुन सुप्रियाचे कौतुक केलं. त्यावेळी बोलताना सुप्रिया ही अल्लूका ग्रुपमधील एका कंपनीमध्ये सेल्सवूमन म्हणून काम करत असल्याचे समजले. त्यानंतर जॉय यांनी सुप्रियाला पुढच्या आठवड्यात तिस्सूरमधील कंपनीच्या मेन ऑफिसला येण्यास सांगितले. तिथे तुझ्यासाठी एक खास भेट आहे असंही जॉय यांनी सुप्रियाला सांगितल्याचं हिंदुस्तान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> याला म्हणतात हटके उद्योग : एक बाटली = एक गॉगल; बाप लेकाने सुरु पर्यावरणपूरक बिझनेस

“माझ्यासाठी एवढी मोठी भेट असेल असं मला वाटलं नव्हतं. जेव्हा कंपनीमधील शेकडो कर्मचारी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव करु लागले तेव्हा मला रडूनच आहे. मी जे केलं ते अगदी त्याक्षणी मला सुचलं होतं. त्यासाठी माझं एवढं कौतुक होईल आणि प्रेम मला मिळेल असं वाटलं नव्हतं,” अशा भावना सुप्रियाने व्यक्त केल्या. अल्लूका ग्रुपमध्ये सेल्सवूमन म्हणून मागील तीन वर्षापासून काम करणाऱ्या सुप्रियाला तिच्या मालकांनी नवीन घर भेट दिलं आहे. सुप्रियाचे लग्न झाले असून दोन मुलं आणि पतीसहीत ती एका छोट्या भाड्याच्या घरात राहत होती हे पाहिल्यानंतर जॉय यांनी ही भेट दिल्याचे सांगितले जाते.

“तू याआधीही अशी चांगली कामं केली असतील त्यामुळेच तुला पुन्हा चांगलं काम करावेसे वाटले. चांगुलपणा कधीच वाया जात नाही,” अशा शब्दांमध्ये जॉय यांनी कर्मचाऱ्यांसमोर सुप्रियाचं कौतुक केलं.

नक्की वाचा >> पत्र पोहचवण्यासाठी रोज १५ किमी पायपीट करणारा पोस्टमन ३० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त

सुप्रियाने दृष्टीहीन व्यक्तीला मदत केल्याचा व्हिडिओ अभिनेता रितेश देशमुखनेही ट्विटवरुन शेअर केला होता. “तुम्हाला कोणाही बघत नसताना तुम्ही या महिलेसारखंच वागलं पाहिजे,” अशी कॅप्शन रितेशने या व्हिडिओ दिली होती.

रितेशने शेअर केलेल्या व्हिडिओला १५ हजारहून अधिक रिट्विट मिळाले आहेत.